Sunday, May 11, 2025

महाराष्ट्रताज्या घडामोडी

उबाठा गटाच्या उमेदवारीमुळे हातकणंगलेत राजू शेट्टींचा पराभव अटळ

उबाठा गटाच्या उमेदवारीमुळे हातकणंगलेत राजू शेट्टींचा पराभव अटळ

खासदार धैर्यशील माने यांना विश्वास


मुंबई : हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीचा पाठिंबा मिळावा, यासाठी मातोश्रीचे उंबरठे झिजवणाऱ्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांना नाकारुन उबाठा गटाने सत्यजित पाटील यांना उमेदवारी दिली आहे. यामुळे हातकणंगलेत राजू शेट्टींचा पराभव अटळ असल्याचा विश्वास खासदार धैर्यशील माने यांनी व्यक्त केला आहे.


हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून महायुतीने खासदार धैर्यशील माने यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यानुसार धैर्यशील माने यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे. या माने यांचे तगडे आव्हान असल्याने राजू शेट्टी यांचे महाविकास आघाडीचा पाठिंबा मिळविण्याचे प्रयत्न सुरु होते. हा मतदारसंघ उबाठा गटाकडे असल्याने शेट्टी यांनी मातोश्रीचे उंबरठे झिजवले. मात्र उबाठा गटाकडून शेट्टी यांना बेदखल करत आज सत्यजित पाटील यांना उमेदवारी जाहीर केली आहे. या उमेदवारीमुळे  हातकणंगलेत राजू शेट्टींचा पराभव अटळ असल्याचा विश्वास माने यांनी व्यक्त केला आहे.


माने यांनी मतदारसंघात प्रचाराला प्रारंभ केला असून प्रमुख नेत्यांच्या भेटीगाठी घेण्यास सुरुवात केली आहे. आमदार विनय कोरे यांची माने यांनी भेट घेऊन लोकसभा निवडणुकीची दिशा कशी असेल याबाबत चर्चा केली. महायुतीशी संबंधित सर्व पक्षांचे कार्यकर्ते प्रचारात सहभागी होत असून भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी अजित पवार गट या पक्षांनी कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार माने यांनी प्रचारात आघाडी घेतली असल्याने त्यांचा विजय निश्चित मानला जात आहे.

Comments
Add Comment