Monday, April 21, 2025
Homeताज्या घडामोडीप्रवाहाच्या विरोधात लढणारा रायगड लोकसभा मतदारसंघ

प्रवाहाच्या विरोधात लढणारा रायगड लोकसभा मतदारसंघ

रायगड लोकसभा मतदारसंघातून कोण बाजी मारणार याकडे सर्वांचेच लक्ष

सुभाष म्हात्रे

अलिबाग : देशासह महाराष्ट्रात कोणत्याही पक्षाची लाट असली तरी त्या प्रवाहाच्या विरोधात कौल देण्याची परंपरा रायगड जिल्ह्यातील मतदारांनी आजतागायत जपली आहे. यावेळी रायगड लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे आणि महाविकास आघाडीचे उमेदवार अनंत गीते यांच्यात तिसऱ्यांदा थेट सरळ होणार असल्याने या निवडणुकीत कोण बाजी मारणार, याकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे.

राज्याच्या राजकारणात अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत रायगडच्या राजकारणात नेहमीच वेगळेपण दिसून आले आहे. विशेष करुन जिल्ह्यात फार पूर्वीपासून काँग्रेस विरुद्ध शेकाप अशीच तुल्यबळ लढत होत आली आहे. सध्या शेकापचा अधिकृत उमेदवार नसला, तरी शेकापने व्होट बँकेच्या जोरावर कुणाला दिल्लीत पाठवायचे आणि कुणाला गल्लीत हे धोरण ठरवून आपले अस्तित्व आजही दाखवून दिलेले आहे. केंद्रात आणि राज्यात एकाच पक्षाची सत्ता असतानाही रायगडच्या जनतेने वेगळेच कौल देऊन राज्यकर्त्यांना विचार करण्यास भाग पाडले आहे. मग ती २०१९ मध्ये असलेली मोदी लाट असो किंवा विद्यमान केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शिवसेना सोडल्यानंतर निर्माण झालेली लाट असो. या दोन्ही वेळेला विरोधात निकाल देत येथील मतदारांनी आपले वेगळेपण जपले आहे. १९५२ ते १९८९ पर्यंत कधी काँग्रेस, तर कधी शेकाप असे आलटून पालटून खासदार लोकसभेवर निवडून गेल्याचा इतिहास आहे. सन १९८९ नंतर मात्र जिल्ह्यात राजकारण बदलत गेले. १९८९, १९९१ व १९९६ असे सलग तीनवेळा काँग्रेसचे ए.आर. अंतुले विजयी झाले. मात्र याच अंतुलेंना १९९८ च्या लोकसभा निवडणुकीत अवघ्या ९,१२६ मतांनी शेकापच्या रामशेठ ठाकूर यांनी पराभूत केले. विशेष म्हणजे त्यावेळी केंद्रात आणि राज्यात काँग्रेसची पूर्ण सत्ता होती. तरीही रायगडच्या जनतेने प्रवाहाच्या विरोधात जात शेकापच्या ठाकूर यांना दिल्लीत पाठविले. सन १९९९ मध्ये केंद्रात आणि राज्यात शिवसेना, भाजपची सत्ता होती. केंद्रात वाजपेयी सरकार, तर राज्यात नारायण राणे व गोपीनाथ मुंडे हे सत्तारुढ होते, तरीही पुन्हा शेकापचेच रामशेठ ठाकूर विजयी झाले. त्यांनी शिवसेनेचे उमेदवार दि. बा. पाटील यांचा ४३ हजार ०९७ मतांनी पराभव केला.

रामशेठ ठाकूर यांच्या लोकसभा निवडणुकीतील सहभागाने जिल्ह्याचे राजकारणच बदलून गेले. यावेळी शिवसेनेनेही रायगडात चांगला जम बसविला होता. शिवसेनेकडून ठाण्याचे माजी महापौर सतीश प्रधान यांनी प्रथमच लोकसभा निवडणूक लढविली. त्यानंतर ठाण्याचे माजी महापौर अनंत तरे हे दोनवेळा निवडणुकीच्या रिंगणात होते. १९९१ च्या निवडणुकीत त्यांनी अंतुले यांना अक्षरशः घाम फोडला होता. अवघ्या ४००७ हजार मतांनी तरेंचा पराभव झाला. १९९८ मध्ये ए.आर. अंतुले आणि शिवसेनेचे अनंत तरे यांचा शेकापचे उमेदवार रामशेठ ठाकूर यांनी पराभव केला. १९९९ च्या मध्यावधी निवडणुकीत शेकापचे दिग्गज नेते दि. बा. पाटील यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यावेळी शिवसेनेचे उमेदवार दि. बा. पाटील व शेकापचे उमेदवार रामशेठ ठाकूर या गुरुशिष्यांमध्ये झालेल्या चुरशीच्या निवडणुकीत शेकापचे रामशेठ ठाकूर यांनी दि.बां. पाटील यांचा ४३ हजार ०९७ मतांनी पराभव केला.

शिवसेनेला रायगडमध्ये २००९ च्या लोकसभेत यश मिळाले. त्यावेळी रायगडमध्ये शिवसेना-शेकाप अशी युती होती. मतदार संघाच्या पुनर्रचनेमुळे नव्याने अस्तित्वात आलेल्या रायगड लोकसभा मतदार संघाच्या पहिल्याच निवडणुकीत शिवसेनेचे अनंत गीते हे विजयी झाले. त्यांनी काँग्रेसच्या ए.आर. अंतुलेंचा एक लाख ४६ हजार ५२१ मतांनी दणदणीत पराभव केला. सन २०१४ मध्ये शिवसेनेतर्फे पुन्हा एकदा अनंत गीते यांची लढत राष्ट्रवादीचे सुनील तटकरेंसोबत झाली. त्यावेळी झालेल्या चुरशीच्या निवडणुकीत गीते यांनी तटकरेंचा अवघ्या २,११० मतांनी पराभव केला. त्यावेळी शेकापने चिपळुणचे माजी आमदार रमेश कदम यांना निवडणुकीत उमेदवारी दिली होती.

वेगळा कौल देण्याची परंपरा

सन २०१९ मध्ये देशात नरेंद्र मोदी यांची मोठी लाट असतानाही रायगडात मात्र या लाटेचा काहीही परिणाम दिसून आला नाही. राष्ट्रवादीचे सुनील तटकरे हे शेकाप व काँग्रेसच्या पाठिंब्यावर विजयी झाले. त्यांनी शिवसेनेचे अनंत गीते यांचा ३१,४३८ मतांनी पराभव करीत मागील पराभवाचा वचपा काढला. याचाच अर्थ असा की प्रवाहाच्या विरोधात नेहमीच वेगळा कौल देण्याची परंपरा रायगडच्या मतदारांनी पाळली आहे. त्याची पुनरावृत्ती यावेळीही होईल की, प्रवाहाच्या दिशेने रायगडचे मतदार जातील हे निवडणूक निकालानंतर समोर येणारच आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -