Tuesday, July 23, 2024
Homeताज्या घडामोडीरेशन कार्डवर सरकारने बिअर, व्हिस्की द्यावी

रेशन कार्डवर सरकारने बिअर, व्हिस्की द्यावी

चंद्रपुरातील महिला उमेदवाराचे मतदारांना आश्वासन

मुंबई : राज्यात सध्या लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी उडाली आहे. १९ एप्रिल रोजी म्हणजे पहिल्या टप्प्यात चंद्रपुरात लोकसभेसाठी मतदान पार पडणार आहे. त्यामुळे सर्वच उमेदवारांनी जोरदार प्रचार करण्यास सुरुवात केली आहे. प्रचारादरम्यान उमेदवार सामान्यतः अनेक विकास कामे करण्याचे आश्वासन देत असतात. मात्र चंद्रपूरातील एका महिला उमेदवाराने दिलेल्या आश्वासनाने सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या आहेत.

चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यातल्या पेंढरी येथे राहणाऱ्या वनिता राऊत यांनी हे अनोखे आश्वासन दिले आहे. अखिल भारतीय मानवता पक्षाच्या वनिता राऊत या चंद्रपूर लोकसभेच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या १५ उमेदवारांमधील एक आहेत. वनिता राऊत यांनी उमेदवारी अर्ज सादर केल्यानंतर खासदार झाल्यास त्यांच्या आश्वासनांच्या यादीत स्वस्त धान्य दुकानातून आनंदाचा शिधासह दारू व बियरची विक्री करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. यासोबतच बेरोजगार युवकांना दारूचे परवाने वितरित करण्याबाबतही त्यांनी भाष्य केले आहे.

याआधी वनिता राऊत यांनी चिमूर विधानसभेची निवडणूक लढवत मद्याविषयीची आपली आश्वासने लोकांपुढे ठेवली होती. मात्र त्यांची अनामत रक्कम जप्त झाली होती. देशाचे भाग्य ठरवणारी निवडणूक म्हणजे लोकसभा निवडणूक. देशाशी निगडित जनतेच्या ज्वलंत प्रश्नावर उमेदवार सभा – मैदान गाजवत असतात. मात्र वनिता राऊत यांनी दिलेल्या आश्वासनांची चर्चा लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात चांगली रंगली आहे.

दारिद्र्यरेषेखालील लोकांना बिअर, व्हिस्की मिळावी

मागच्या विधानसभा निवडणुकीत मी चिमूर मतदारसंघातून उभी होती. दारुचा उल्लेख आश्वासनात यासाठी घेतला, कारण चंद्रपुरात बंदी आहे आणि नागपुरात नाही. चंद्रपूरच्या लोकांनी कोणते पाप केले आहे. चंद्रपूरचे लोक कायदेशीर मार्गाने दारु पिऊ शकत नाही आणि नागपुरातील पिऊ शकतात. त्यासाठी मी चंद्रपुरातून दारु बंदी हटवण्याचा विषय मांडला होता. दारुबंदी हटवण्यात आली आहे. पण माझे जे काही मुद्दे राहिले होते ते म्हणजे बिअर बार, बेरोजगारांना दारु विक्रीचे परवाने, जे दारिद्र्य रेषेखाली येतात त्यांना रेशन कार्डवर बिअर, व्हिस्की मिळावी. या राहिलेल्या मागण्या मी लोकसभा निवडणुकीच्या माध्यमातून पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहे, असे वनिता राऊत यांनी म्हटले.

‘आनंदाचा शिधासोबत बिअर द्या’

‘सरकार सणासुदीला आनंदाचा शिधा देते. त्या आनंदाच्या शिधासोबत सरकारने गोरगरिबांना भारी भारी ब्रॅण्डच्या बिअर, व्हिस्की द्याव्यात. चंद्रपूर लोकसभा क्षेत्रातील लोकांनी मला खासदार बनवले तर खरंच सांगते की, माझ्या खासदार निधीतून दारु पिणाऱ्या गोरगरिब लोकांना आनंदाच्या शिधासोबत बिअर, व्हिस्की देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन देत आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -