मोठ्या प्रमाणात गुंतवणुकीच्या नावाखाली भारत आणि भारताबाहेरील एक हजारहून अधिक गुंतवणूकदारांचे शेकडो कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने उत्तराखंडमधील चार्टर्ड अकाऊंटंट आणि गुंतवणूक सल्लागार अंबर दलाल याला अटक केली आहे. आतापर्यंत ६०० हून अधिक गुंतवणूकदारांनी ३८० कोटींहून अधिक रुपयांची फसवणूक झाल्याचा दावा करत मुंबई पोलिसांकडे तक्रार केली आहे. पीडितांचा हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे.
जुहू येथील एका फॅशन डिझायनरने रिट्झ कन्सल्टन्सी सर्व्हिसेस कंपनीचा मालक असलेल्या अंबर दलाल याच्याविरुद्ध फसवणुकीची तक्रार याच मार्च महिन्यात दाखल केली होती. दलालने डिझायनरला तिचे पैसे विविध जोखीम-मुक्त बाजारपेठांमध्ये गुंतवण्याचे आश्वासन दिले होते. त्याबदल्यात १.५-१.८ टक्के मासिक परतावा देण्याचे वचन दिले होते.पारदर्शकतेचा कारभार असल्याने सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली जाईल, असे दलालने तिला सांगितले होते. फॅशन डिझायनरसह अनेक गुंतवणूकदारांनी सुरुवातीला अल्प प्रमाणात गुंतवणूक केल्यानंतर वेळेवर परतावा मिळाला होता. त्यामुळे गुंतवणूकदारांनी दलालवर विश्वास ठेवला आणि आणखी पैसे गुंतवले. मात्र काही काळानंतर गुंतवणुकदारांना परतावा मिळेनासा झाला. पत्नीच्या आरोग्याच्या समस्यांसारखी एक ना नानाविध कारणे देऊन त्याने गुंतवणूकदारांना टाळण्याचा प्रयत्न केला. दलालच्या कंपनीने काही गुंतवणूकदारांना पोस्ट-डेटेड चेक सुपूर्द केले होते; परंतु ज्यांनी त्यांचे पैसे काढण्यासाठी बँकेत संपर्क केला, त्यावेळी कंपनीच्या बँक खात्यात फक्त ५० हजार रुपये असल्याचे त्यांना आढळले. १४ मार्च दलाल पळून गेल्याचे गुंतवणूकदारांना माहिती मिळाली. त्यानंतर अनेक गुंतवणूकदारांनी एकत्र येऊन पोलिसांकडे धाव घेतली. तो देशातून पळून जाऊ नये म्हणून लुकआऊट परिपत्रक जारी करण्यात आले होती. दलालाने ज्यांना फसवले, त्या गुंतवणूकदारांमध्ये अभिनेते, व्यापारी, वकील आणि चार्टर्ड अकाऊंटट यांचा समावेश होता, तर पैसे गमावलेल्या पीडितांमध्ये अभिनेता अन्नू कपूरच्या कुटुंबाचाही समावेश असल्याची माहिती पुढे आली. अनेक ज्येष्ठ नागरिक होते, त्यांच्यापैकी काहींनी त्यांच्या पेन्शनचे पैसेही त्याच्याकडे गुंतवले होते. एवढेच नव्हे, तर “हे गुंतवणूकदार केवळ भारतातील नाहीत, तर ब्रिटन, यूएस, ऑस्ट्रेलिया, चीन आणि दुबई येथील अनिवासी भारतीय असल्याची माहिती पुढे तपासात पोलिसांना मिळाली. या सर्व तक्रारीनंतर मुंबई आर्थिक गुन्हे शाखेने या प्रकरणाचा समांतर तपास केला. दलालच्या अधिकृत आणि निवासी जागेची झडती घेतली आणि त्याच्याशी जोडलेली २०हून अधिक बँक खाती गोठवली. आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस पथक जुहू, दहिसर आणि अंधेरीसह विविध ठिकाणी दलालच्या परिसराची झडती घेत असताना, दुसरे पथक उत्तराखंडला पोहोचले होते. चार दिवस पाळत ठेवून दलालाला उत्तराखंडच्या तपोवन परिसरातून ताब्यात घेण्यात आले. दलाल याला भारतीय दंड संहिता कलम ४२० (फसवणूक आणि अप्रामाणिकपणा), ४०६ (गुन्हेगारी विश्वासभंग) आणि ४०९ (विश्वासाचा गुन्हेगारी उल्लंघन) तसेच महाराष्ट्र ठेवीदारांच्या हितसंरक्षण कायद्याच्या कलमांखाली अटक करण्यात आली. त्याच्या ताब्यातून दोन मोबाइल फोन आणि एक लॅपटॉप जप्त करण्यात आला. त्याला मुंबईत आणण्यात आल्यानंतर न्यायालयात हजर करण्यात आले असता १ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी ठोठावण्यात आली आहे. त्याने गुंतवणुकीतील पैसे नेमके कुठे वळवले आणि त्याचा वापर कसा केला याची माहिती मिळवण्याचा प्रयत्न पोलीस करत आहेत. तसेच, त्याने गुंतवणूकदारांच्या पैशांचा बेकायदेशीरपणे मालमत्तेसाठी वापर केला आहे का? हे शोधण्याचाही प्रयत्न सुरू आहे. दलालच्या पीडितांना आर्थिक गुन्हे शाखेच्या युनिट-१२ च्या कार्यालयाला भेट देऊन त्यांच्या गुंतवणुकीचा तपशील सादर करण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. महाराष्ट्र ठेवीदार हितसंरक्षण कायद्यात आरोपींच्या मालमत्ता जप्त करून त्याचा लिलाव करण्याची आणि वसूल केलेली रक्कम पीडितांमध्ये वाटण्याची तरतूद आहे; परंतु हे सर्व न्यायालयाच्या देखरेखीखाली होते आणि ही प्रक्रिया वेळखाऊ असते. त्यामुळे भविष्यात पैसे कधी परत मिळतील याची खात्री देता येत नसल्याने, पैसे गुंतवणूकदारांनी अशा पॉन्झी योजनेपासून सावध राहायला हवे.
maheshom108@ gmail.com
नाशकात दुपारी १ ते ४ दरम्यान ट्रॅफिक सिग्नल राहणार बंद; प्रशासनाचा मोठा निर्णय! नाशिक :…
नेटकऱ्यांनी केला कमेंट्सचा पाऊस मुंबई: सध्या मराठी कलाविश्वात सई ताम्हणकरच्या ‘आलेच मी’ या लावणीची जोरदार…
बीड : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बीड जिल्ह्याला हक्काचे पाणी मिळवून देण्याचे तसेच गहिनीनाथ गडाला…
निरोगी त्वचा असणे ही सर्वांचीच इच्छा असते. मात्र, निरोगी आणि सुंदर दिसणाऱ्या त्वचेची योग्य काळजी…
पुणे : चितळे प्रकरण ताजे असतानाच पुण्यामध्ये ब्रँडेड कंपन्यांच्या नावे बनावट कपडे विकल्याची माहिती समोर…
बीड : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धनंजय मुंडे यांना बेल्स पाल्सी (Bell's palsy) हा आजार झाला…