नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यापासून काळ्या पैशांवर कठोरतेने कारवाई झाली आहे. ईडी काळ्या पैशांवर कारवाई करत आहे. ईडीने जेवढी संपत्ती जप्त केली आहे, त्यांतील केवळ ५ टक्के संपत्तीच राजकीय पक्षांशी संबंधित लोकांची आहे. उर्वरित ९५ टक्के काळा पैसा असलेले लोक आहेत, असे प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केले.
ते आज एका वृत्तवाहिनीच्या रायजिंग भारत समिटमध्ये बोलत होते. यावेळी त्यांना नेत्यांच्या घरांवरील ईडी, सीबीआय आणि इनकम टॅक्स डिपार्टमेंटच्या छाप्यांसंदर्भात प्रश्न विचारण्यात आला होता. यावेळी त्यांनी विरोधकांवर थेट हल्ला चढवला.
अमित शहा म्हणाले, ‘राजकीय नेत्यांविरोधात कारवाईच होऊ नये, असे विरोधी पक्षांना वाटते. मात्र मी स्पष्टपणे सांगू इच्छितो की, ९५ टक्के कारवाया अशा लोकांविरोधात झाल्या आहेत, ज्यांचा राजकारणाशी काही संबंधच नाही हे सांगताना शहा यांनी ममता बॅनर्जी सरकारमधील एका मंत्र्याच्या घरावर झालेल्या कारवाईचा उल्लेख केला. ते म्हणाले, ममता बॅनर्जी सरकारमधील एका मंत्र्याच्या घरावर टाकण्यात आलेल्या धाडीत ५५ कोटी रुपये मिळाले आहेत. तर, एका कारवाईत काँग्रेसच्या एका खासदाराच्या घरातून ३५५ कोटी रुपये मिळाले. एसबीआयच्या १० मशिन नोटा मोजता-मोजता थकल्या, गरम झाल्या. तरीही कारवाई होऊ नये, असे विरोधी पक्षांच्या नेत्यांना वाटते.
अमित शहा म्हणाले, ‘छाप्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करू नका. मोठा प्रश्न असा आहे की, काँग्रेसच्या खासदाराकडे ३५० कोटी आणि ममता बॅनर्जींच्या मंत्र्याकडे ५५ कोटी रुपये कुठून आले? नोटांचे बंडल भरण्यासाठी मॅटाडोर आणावा लागला. एक मॅटाडोर कमी पडला, म्हणून पहाटे ४ वाजता नोटा भरण्यासाठी दुसरा मॅटाडोर आणावा लागला. जनता सर्व काही बघत आहे, हे विरोधक विसरत आहेत. हा पैसा कुठे जाणार होता? हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी देशातील जनतेला सांगू शकतील का? एवढेच नाही, तर त्यांच्या खासदाराच्या घरातून जप्त करण्यात आलेले ३५५ कोटी रुपये कुणाचे आहेत? याचे उत्तरही त्यांनी द्यायला हवे, असेही शहा यावेळी म्हणाले.
केंद्र सरकारने नागरिकत्व सुधारणा कायदा (सीएए) लागू केल्यानंतर विरोधक सातत्याने सरकारवर टीका करत आहेत. तसेच, या कायद्याला मुस्लिमविरोधी कायदा असल्याचे सांगितले जात आहे. पण, या कायद्याद्वारे कोणाचेही नागरिकत्व हिरावून घेतले जाणार नाही, असे सरकारकडूनही वारंवार सांगितले जात आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी पुन्हा एकदा याचा पुन्नरुच्चार केला. अमित शहा पुढे म्हणाले की, सीएए मंजुर झाल्यानंतर देशात मोठा गैरसमज पसरला. जेव्हा सत्याबद्दल गैरसमज पसरवले जातात, तेव्हा सत्य लोकांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी सत्तेत असलेल्या पक्षाची असते. विरोधकांनी मुस्लिम समाजाची दिशाभूल केली. सीएएमुळे मुस्लिमांचे नागरिकत्व जाणार, त्यांचा मतदानाचा अधिकार हिरावून घेतला जाईल, असा गैरसमज विरोधकांनी पसरवला. पण, देशातील मुस्लिमांना घाबरण्याची अजिबात गरज नाही. सीएए हा नागरिकत्व घेण्यासाठी नसून, तो निर्वासितांना नागरिकत्व देण्याचा कायदा आहे.