नवी दिल्ली: काँग्रेस पक्षाने(congress) आगामी लोकसभा निवडणूक २०२४साठी(loksabha election 2024) आपली दुसरी यादी जाहीर केली आहे. या यादीत एकूण ४३ उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. यात आसाम, मध्य प्रदेश आणि राजस्थानातील उमेदवारांचा समावेश आहे.
या यादीत तीन मुख्यमंत्र्यांच्या मुलांचा समावेश आहे. मध्य प्रदेशच्या छिंदवाडा जागेवरून सध्याचे खासदार नकुलनाथ यांना काँग्रेसने पुन्हा तिकीट दिले आहे. सोमवारी नवी दिल्लीत पक्ष अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या अध्यक्षतेखालील झालेल्या काँग्रेसच्या निवडणूक समितीच्या बैठकीत उमेदवारांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले होते.
या ४३ उमेदवारांमध्ये १३ जण ओबीसी गटातील आहेत. तर १० उमेदवार एससी आणि ९ उमेदवार एसटी प्रवर्गातील आहेत. काँग्रेसने आपल्या या यादीत एका मुस्लिम चेहऱ्याला मैदानात उतरवले आहे. ८ मार्चला आंतरराष्ट्रीय महिला दिवसाच्या निमित्त काँग्रेसने पहिली यादी जाहीर केली होती. त्यात राहुल गांधी, शशी थरूर यांच्यासह ३९ उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात आली होती. आज जाहीर करण्यात आलेल्या दुसऱ्या यादीत ४३ उमेदवारांमध्ये १० राजस्थानातील आहेत.
३ मुख्यमंत्र्यांच्या मुलांना संधी
काँग्रेस पक्षाने आपल्या दुसऱ्या यादीत तीन मुख्यमंत्र्यांच्या मुलांना संधी दिली आहे. मध्य प्रदेशातून छिंदवाडा येथून माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांचा मुलगा नकुलनाथला तिकीट देण्यात आले आहे. राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचा मुलगा वैभव गेहलोत यांनाही तिकीट देण्यात आले आहे. २००१-२०१६ पर्यंत आसामचे मुख्यमंत्री राहिलेले तरूण गोगई यांचे सुपुत्र गौरव गोगोई यांनाही काँग्रेसने आपल्या दुसऱ्या यादीत स्थान दिले आहे.