Raj Thackeray : बाहेर वेगळे पण आतून सगळे एकच

Share

राज ठाकरेंचे कार्यकर्त्यांना संयम बाळगण्याचे आवाहन

नाशिक : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी शरद पवार (Sharad Pawar) आणि अजित पवार (Ajit Pawar) गट बाहेर वेगळे, पण आतून सगळे एकच आहेत, असा मोठा दावा केला आहे. मनसेच्या १८ व्या वर्धापन दिनानिमित्त राज ठाकरे यांनी नाशिकमध्ये कार्यकर्त्यांना संबोधित केले. यावेळी राज ठाकरेंनी सर्वच राजकीय पक्षांवर जोरदार निशाणा साधला.

राजकारणामध्ये टिकायचे असेल तर ‘संयम’ महत्त्वाचा आहे, हा मूलमंत्र देताना पक्षात जातीपातीला थारा नसेल, असेही राज ठाकरे यांनी ठणकावून सांगितले. सध्या राज्यात सुरू असलेले राजकारण म्हणजे अळवावरचे पाणी आहे. आपल्याला यश मिळणार थोडा संयम ठेवा, असे म्हणताना त्यांनी ‘मला माझ्या कडेवर माझी पोरं खेळवायची आहेत. आणि तेवढी धमक मी ठेवतो’ असे सूचक वक्तव्य केले.

राज ठाकरे यांनी म्हटले की, राष्ट्रवादीचे काही कार्यकर्ते मला भेटण्यासाठी आले होते. तेव्हा सांगताना राष्ट्रवादीचे कार्यकर्ते असे त्यांनी मला सांगितले, म्हणून कोणत्या गटाचे विचारले तर, तीन शरद पवार, दोन अजित पवार गटाचे होते, पण भेटायला मात्र एकत्र आले होते. माझे ठाम मत आहे, हे सर्व आतून एक आहेत, असा दावा राज ठाकरे यांनी केला.

लोकसभा निवडणूका आता अगदी कधीही जाहीर होऊ शकतात अशी स्थिती आहे. काही पक्षांकडून उमेदवार याद्या जाहीर होण्यास सुरूवात झाली आहे. अशात मनसे महायुती मध्ये सहभागी होण्याबाबत आज राज ठाकरे काही घोषणा करतात का? याकडे अनेकांचे लक्ष लागले होते. मात्र त्याबाबत निवडणूकांमध्ये बोलणार आहोत आणि अन्य विषयांवर सविस्तर ९ एप्रिलला गुढी पाडव्याच्या दिवशी शिवतीर्थ मैदानावर आपण बोलू, असे ते म्हणाले.

मनसेच्या स्थापनेनंतर यंदा पहिल्यांदाच राज ठाकरे यांनी नाशिक मध्ये मनसेचा वर्धापन दिन सोहळा आयोजित केला होता. या निमित्ताने ते ३ दिवसीय नाशिक दौर्‍यावर आले आहेत. काल महाशिवरात्री दिवशी त्यांनी काळाराम मंदिरात प्रभू श्रीरामाची आरती देखील केली.

मनसेच्या १८ वर्षांच्या प्रवासात अनेक चढ उतार आले पण या प्रवासात साथ दिलेल्या त्यांच्या सहकार्‍यांचे त्यांनी आभार मानले. यावेळी राज्यात खऱ्या अर्थांने जर कोणते पक्ष स्थापन झाले असतील तर, त्यात पहिला जनसंघ, शिवसेना आणि त्यानंतर मनसे हा पक्ष आहे, असे सांगितले. एनसीपी म्हणजे शरद पवारांनी निवडून येणार्‍या लोकांची बांधलेली मोळी आहे, असे म्हणत पुन्हा त्यांच्यावर हल्लाबोल केला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नाही. निवडून येणाऱ्या माणसांची मोळी आहे. शरद पवार हेच करत आलेत. ते वेगळे झाले तरी निवडून येणार, असेही राज ठाकरे यांनी म्हटले.

‘अरबी समुद्रात शिवरायांचे स्मारक अजून का झाले नाही’

राज ठाकरे म्हणाले की, अरबी समुद्रात शिवाजी महाराजांचे स्मारक अजून का झाले नाही. पंतप्रधान आले फुले वाहून गेले, त्या फुलांचे काय झाले. पण त्या वेळेत वल्लभभाई पटेल याचा पुतळा उभा राहिला.

अरबी समुद्रातील शिवाजी महाराज यांचा पुतळा उभा करण्याचा विषय आला, तेव्हा मी सांगितले असे होणार नाही. समुद्र आहे, तिथे भर घालण्यासाठी किमान २५ ते ३० हजार कोटी लागतील. छत्रपती शिवाजी महाराजांनी उभे केलेले गड किल्ले स्मारक आहे. येणाऱ्या पिढीला पुतळे दाखविणार का, असा सवाल यावेळी राज ठाकरे यांनी उपस्थित केला. गड-किल्ले उभे राहिले तर इतिहास दाखवू शकू, असेही त्यांनी म्हटले.

मनसे सुरू करते तसा शेवटही करते. आमची भूमिका स्वच्छ प्रामाणिक होती व आहे. उद्धव ठाकरेचे (Uddhav Thackeray) सरकार होते त्यावेळी राज्यातील १७ हजार मनसैनिकांवर गुन्हे दाखल झाले होते. आणि हे स्वत:ला हिंदुत्वावादी समजतात. काय चुकीचे केले होते. प्रार्थना स्थळावरील भोंगे काढले. प्रार्थना करू नका, असे आम्ही म्हणत नाही. आपल्या आंदोलनानंतर सर्व बंद झाले होते पण सरकार ढीले पडल्यानंतर पुन्हा सुरु झाले, असे राज ठाकरे यांनी स्पष्ट केले.

‘सरकार डरपोक आहे, माझ्या हातात सरकार द्या, सर्व भोंगे काढतो’

सरकार डरपोक आहे. मुस्लिम समाजातील लोकांनाही त्रास होतो. माझ्या हातात सरकार द्या, सर्व भोंगे काढतो. समुद्रात दर्गा बांधला, तो एका रात्रीत काढला. प्रार्थना करू नको, असे आम्ही म्हणतो का?

मनसेने अनेक कामे केली, अनेक यशस्वी आंदोलन केली. माझ्यासकट अनेक महाराष्ट्र सैनिकांनी तुरुंगवास भोगला, मराठी माणसांसाठी लाठ्या काठ्या खाल्ल्या. आपले विरोधक चुकीच्या गोष्टी पसरवतात. राज ठकारे सुरुवात करतो आणि शेवट करत नाहीत. पण एक आंदोलन दाखवा ज्याचा शेवट केला नाही. बाकींना प्रश्न विचारणार नाहीत, असे राज ठाकरे म्हणाले.

आमच्यामुळे मोबाईवर मराठी ऐकू यायला लागले, टोलनाके बंद झाले. आमची स्वच्छ भूमिका होती टोलमधून किती पैसे येतात आणि कुठे जातात. मुंबई-गोवा रस्ता अजूनही भीषण आहे. मुंबई-नाशिक रस्ता भीषण झाला आहे. रस्ते नीट करता येत नाहीत आणि टोल वसूल करतात, अशी टीका राज ठाकरे यांनी केली.

हे यश मोदींचेच पण..

यावेळी राज यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवरही भाष्य केले. ते म्हणाले की, राजकारणात प्रचंड संयम लागतो. राजकीय कार्यकर्त्यांमध्ये संयम असलाच पाहिजे. आज मोदींच्या रूपात भाजपा जे यश अनुभवतोय त्यात मोदींचे श्रेय आहेच पण अनेक दशकांच्या कार्यकर्त्यांचीही मेहनत, संयम आणि संघर्ष पण आहे. भाजपच्या यशामागचे २० टक्के यश हे त्या पक्षासाठी इतके वर्ष झटत आलेल्या आणि खस्ता खाल्लेल्यांचे यश आहे. वाजपेयी, अडवाणी, महाजन, मुंडे या लोकांची ज्या खस्ता खाल्ल्या, हे त्याचे यश असून ते असे अचानक आलेले नाही, याची आठवण देखील राज यांनी करुन देत कार्यकर्त्यांना संयम बाळगण्याचे आवाहन केले.

Recent Posts

पुस्तकांचे पालकत्व

गीतांजली वाणी ज्ञानदायी स्रोत असते पुस्तक आवड जयास उजळ मस्तक नवी जीवनाची प्रगती आणि विकास…

2 hours ago

बाल गुन्हेगार कसे तयार होतात?

फॅमिली काऊन्सलिंग : मीनाक्षी जगदाळे आजकाल आपण दररोज बघतोय की, अगदी लहान अथवा तरुण मुलं…

2 hours ago

कुरुंदकरला जन्मठेप; खाकी वर्दीवर काळा डाग

महिला पोलीस अधिकारी अश्विनी बिद्रे-गोरे यांच्या हत्येप्रकरणी खाकी वर्दीतला एकेकाळचा सहकारी पोलीस अधिकारी अभय कुरुंदकरला…

3 hours ago

LSG vs DC, IPL 2025: के एल राहुलची तडाखेबंद खेळी, दिल्लीचा लखनऊवर ८ विकेटनी विजय

मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ४०व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने लखनऊ सुपर जायंट्सवर ८ विकेट्सनी विजय…

4 hours ago

हिंदी अनिवार्य नाही तर ऐच्छिक ठेवणार; शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्याकडून भूमिका स्पष्ट

मुंबई : महाराष्ट्रात पहिली ते पाचवीपर्यंत इंग्रजीबरोबर हिंदी भाषाही सक्तीची करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावर टीकेची…

5 hours ago

Pahalgam Terror Attack: पहलगाम हल्ल्यामध्ये महाराष्ट्रातील दोघांचा मृत्यू

मुंबई: जम्मू-काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम येथे आज, मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सुमारे २७ जणांचा मृत्यू…

5 hours ago