- क्राइम : अॅड. रिया करंजकर
डॉक्टरांनी चुकीचं औषध दिलेलं होतं, या मतावर ते ठाम होते. त्यांना गाईच्या बदल्यात गाय किंवा पैसे देतो, अशी ऑफर करण्यात आलेली होती. पण त्यांनी ती धुडकावली. कारण, त्यांनी स्वतःच्या डोळ्यांनी गाईला तडफडून मरताना बघितलं होतं. आता गाईला न्याय पाहिजे, यासाठी त्यांची धडपड चालू आहे.
ग्रामीण भागातील लोक आपला उदरनिर्वाह हा शेतीवर आणि पाळीव प्राण्यांवर करत असतात. शेतीतून अन्नधान्य पिकवले जाते, तर गाई-म्हशींकडून त्यांना दुधाचे उत्पन्न मिळते व त्यातून आपली आर्थिक बाजू ते सांभाळतात. अजूनही ग्रामीण भागामध्ये आपल्या प्राण्यांवर पोटच्या मुलाप्रमाणे प्रेम करणारे शेतकरी आहेत. दिवसातील काही तास ते आपल्या प्राण्यांसाठी राबत असतात. प्राणीही आपल्या मालकावर तेवढाच जीव लावत असतो.
संगमेश्वर तालुक्यातील दिनकर आपल्या गाईवर मुलासारखं प्रेम करत होते. त्यांच्याकडे जर्सी गाय होती. आपल्या वयोमनाप्रमाणे आपल्याला आता जनावर सांभाळता येत नाही म्हणून जनावरांच्या प्रेमाखातर घरामध्ये एक तरी गाय असावी म्हणून ती गाय त्याने ठेवलेली होती. त्यांची जर्सी गाय आठ महिन्यांची गाभण होती. दिनकरांसह घरातील सर्वजण आनंदी होते, कारण त्यांच्या गाईसोबत आता एक लहान वासरू येणार होतं. एवढेच नाही, तर त्याच्यानंतर दुधाच्या व्यवसायातून त्यांना चार पैसे मिळणार होते. म्हणून ते गाभण गाईची व्यवस्थितपणे काळजी घेत होते.
काही दिवसांत त्यांच्या लक्षात आलं की, त्यांची गाय पहिल्यासारखी चारापाणी खात नाही. म्हणून त्यांनी संगमेश्वर तालुक्यातील प्राण्यांच्या डॉक्टरांना बोलवून त्यांना दाखवले असता तिचे तोंड दुखत असल्यामुळे ती खात नाही, असं निदान केलं व तिला एक विशिष्ट औषध दिल्यावर ती बरी होईल. त्यावेळी दिनकरांनी गाभण गाईच्या काळजीपोटी विचारलं, “ती नक्की बरी होईल ना? कारण ती गाभण आहे.” त्यावेळी डॉक्टरांनी ती “१००% बरी होईल, काळजी करू नका आणि ती चांगली खायलाही लागेल”, असं आश्वासन दिनकर यांना दिलं.
डॉक्टरांनी औषध-उपचार केल्यानंतर जर्सी गाय बरी न होता लगेच तिचं निधन झालं. दिनकर यांच्या डोळ्यांसमोर ती तडफडून तडफडून मेली, याचं दुःख दिनकर यांना झालं. डॉक्टरांनी आपल्याला ती बरी होईल, अशी गॅरंटी दिलेली असतानाही असं कसं झालं. त्यावेळी त्या औषधाबद्दल चौकशी केली असता, ते औषध ताकत वाढवणारं होतं. गाय गरोदर असल्यामुळे अगोदरच तिच्या अंगामध्ये हिट होती आणि वरून हे ओव्हरडोस दिल्यामुळे त्यांच्या गाईचे निधन झालं, असा त्यांचा पक्का मानस झालेला होता. म्हणून त्यांनी डॉक्टरांविरुद्ध संगमेश्वर पोलीस ठाण्यामध्ये तक्रार केली तसेच जिल्हा परिषद मध्येही त्यांनी तक्रार नोंदवली. या दोन्ही ठिकाणी त्यांच्या तक्रारी घेण्यात आल्या, पण त्याच्यावर काहीही मार्ग काढण्यात आला नाही म्हणून त्यांनी वर्तमानपत्रात बातमी छापून आणली. एवढेच नाही, तर पशुसंवर्धन विभागातही त्यांनी तक्रार नोंदवली. त्यावेळी तिथून असं कळवण्यात आलं की, “दिलेल्या औषधामुळे गाईचे निधन होऊ शकत नाही. दिलेली औषधे योग्य होती, असं नमूद करून तुम्हाला त्याच्या बदली दुसरी गाय देतो, तुम्ही अर्ज करावा” असं लिहून आलेलं होतं. पण दिनकर यांचे मत होतं की, “माझी गाय एवढी आजारी नव्हती की, ती पटकन जाईल. तिची मी चांगली काळजी घेत होतो. पण औषध दिल्यानंतरच ती लगेच गेली.” डॉक्टरांनी चुकीचं औषध दिलेलं होतं, या मतावर ते ठाम होते. त्यांना गाईच्या बदल्यात गाय किंवा गाईच्या बदल्यात पैसे देतो अशी ऑफर करण्यात आलेली होती. पण त्यांनी ती धुडकावली. कारण, त्यांनी स्वतःच्या डोळ्यांनी गाईला तडफडून मरताना बघितलं होतं. माझ्या गाईला न्याय पाहिजे, यासाठी त्यांची आता धडपड चालू आहे.
दिनकर आता आपल्या गाईला न्याय मिळण्यासाठी न्यायालयाचे दरवाजा ठोठावण्याच्या मार्गावर आहेत. मला समाजातून न्याय मिळाला नाही. पण न्यायालय मला न्याय देईल, अशी त्यांची आशा आहे.
(सत्यघटनेवर आधारित)