आत अडकल्याने ऑक्सिजनची कमतरता; अथक परिश्रमानंतर…
धुळे : पाणी आणि भक्ष्याच्या शोधात आलेल्या मादी बिबट्याची (Leopard) मान पाण्याच्या हंड्यात अडकल्याची घटना साक्री तालुक्यातील धुकशेवड गाव शिवारातील गोठ्यात घडली. बिबट्या पाणी शोधत असताना त्याने हंड्यात पाहिले आणि त्याची मान आत अडकून राहिली. त्यामुळे त्याला श्वास घ्यायलाही प्रचंड त्रास होत होता. काल रात्रीच्या सुमारास ही घटना घडली. घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे अधिकारी, कर्मचारी व पशुवैद्यकीय डॉक्टर घटनास्थळी दाखल झाले.
पशुवैद्यकीय डॉक्टरांनी बिबट्याला भुलीचे इजेक्शन देऊन बेशुध्द केले. त्यानंतर हंडा काढून बिबट्याची सुटका करण्यात आली. त्याला पिंजऱ्यात ठेवून जंगलात सोडण्यात येणार असल्याची माहिती कोंडाईबारी वनविभागाच्या वनपरिक्षेत्र अधिकारी सविता सोनवणे यांनी दिली.
नेमकं काय घडलं?
साक्री तालुक्यातील कोंडाईबारी वन क्षेत्रातील जयरामनगर पैकी धुकशेवड शिवारातील कृष्णा नारायण चौरे (रा.देवळीपाडा) यांच्या शेतात गुरांच्या वाड्यात भक्ष व पाण्याच्या शोधात एक मादी जातीचा बिबट्या आला. तांब्याच्या हंड्यात पाणी असावे म्हणून त्याने पिण्यासाठी मान आत घातली, मात्र त्याची मान या हंड्यात अडकली. त्यानंतर तो वाड्याच्या आजूबाजूला सैरावैरा पळत सुटला. शेवटी बिबट्या पूर्णतः हैराण होऊन दमून वाड्यात जाऊन बसला.
ही घटना पाहून शेतमालकाने पहाटे तीन वाजता वन अधिकारी सविता सोनवणे यांना फोनद्वारे माहिती दिली. त्यांनी ही बाब उपवनसंरक्षक नितीन कुमारसिंग यांना कळवली. त्यानंतर पिंजऱ्यासह वन कर्मचारी व वन्यजीव संस्था, पिंपळनेरचे पथक व पिंपळनेर पोलीस ठाण्याचे सपोनि सचिन कापडणीस, तसेच पशुवैद्यकीय अधिकारी घटनास्थळी पोहोचले. बिबट्याची मान अडकल्यामुळे तो थकला होता. त्याला पुरेसा ऑक्सिजन मिळत नव्हता.
वैद्यकीय अधिकाऱ्यांनी इंजेक्शनद्वारे भूल देऊन त्यास बेशुद्ध केले. पिंजऱ्यामध्ये टाकून त्याला पिंपळनेर वनविभागाच्या आवारात आणण्यात आले. या ठिकाणी साक्री तालुक्याचे पशुधन आयुक्त अधिकारी डॉ.योगेश गावित, डॉ.मंगेश हेमाडे, डॉ.संदीप कोकणी, डॉ.शंकर आस्वार, डॉ. राहुल पाटील यांनी या बिबट्यास पुन्हा इंजेक्शन द्वारा भूल दिली. बिबट्यास ऑक्सिजन देण्याचा प्रयत्न केला मात्र बिबट्याची मान आतमध्ये अडकल्याने तो अतिशय बेभान झालेल्या असल्यामुळे शक्य झाले नाही. त्यानंतर येथील कारागीर मुस्ताक शेख यांनी कटरच्या साह्याने तांब्याच्या हंड्याला दोन ते तीन ठिकाणी चरे देऊन ऑक्सिजन आत पोहोचेल अशी योजना केली. बिबट्याला ऑक्सिजन मिळताच बिबट्या सुस्थितीत आला.
अखेर बिबट्याला हंड्यातून बाहेर काढण्यात यश
एकीकडे हंडा पकडून व एका बाजूने बिबट्याची शेपूट पकडून हंडा ओढला असता बिबट्याची मान सुखरूप बाहेर निघाली. पुन्हा बिबट्याला पिंजऱ्यात ठेवण्यात आले. त्याच्यावर वैद्यकीय उपचार सुरू असून त्याच्या तब्येतीत आता सुधारणा आहे. बिबट्यास सुरक्षितपणे जंगलात सोडण्यात येणार असल्याचे वन अधिकारी सविता सोनवणे यांनी सांगितले.