
मेघवाल समाजदेखील शिवसेनेसोबत जोडला गेला
मुंबई : लोकसभा निवडणुका (Loksabha Election) जवळ आलेल्या असताना काँग्रेस पक्ष (Congress party) मात्र चांगलाच अडचणीत सापडला आहे. महाराष्ट्रात मिलिंद देवरा (Milind Deora), बाबा सिद्दीकी (Baba Siddiqui) आणि अशोक चव्हाण (Ashok Chavan) या तीन बड्या नेत्यांनी काँग्रेसची साथ सोडली. यानंतर आता मुंबईत काँग्रेसला पुन्हा एक मोठा धक्का बसला आहे. काँग्रेसच्या तीन माजी नगरसेविकांनी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या उपस्थितीत शिवसेनेत (Shivsena) जाहीर प्रवेश केला. यावेळेस काही दिवसांपूर्वीच शिवसेनेत प्रवेश केलेले मिलिंद देवरा देखील उपस्थित होते.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जनकल्याणकारी व नागरी विकास कार्यपद्धतीने प्रभावित होऊन, त्यांच्यावर विश्वास ठेऊन व शिवसेना खासदार मिलिंद देवरा यांच्यावर विश्वास ठेऊन काँग्रेसच्या माजी नगरसेविका सुषमा विनोद शेखर, माजी नगरसेविका शहांना रिझवान खान व माजी नगरसेविका राबिया शैख यांनी काल रात्री वर्षा निवासस्थानी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसोबत शिवसेना पक्षात प्रवेश केला. तसेच मेघवाल समाजाचे अध्यक्ष रवी धारिया आणि किशोर कुमार, पदाधिकारी विनोद मकवाना यांनी देखील शिवसेनेत पक्षप्रवेश केला. मुख्यमंत्र्यांनी सर्वांचे शिवसेनेत स्वागत केले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, मेघवाल समाजाचे आणि आमचे नाते खूप जुने आहे. धर्मवीर आनंद दिघे होते तेव्हापासूनचे हे नाते आहे. ठाण्यामध्ये सुद्धा मेघवाल समाज खूप मोठ्या प्रमाणात आहे. आपल्या सरकारने काही दिवसांपूर्वी मुंबईत जे डीप क्लीन ड्राइव्ह सुरु करण्यात आले होते, त्यात हे सफाई कामगार मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते. मुंबईचे खरे हिरो हे सफाई कामगार आहेत. मुंबई स्वच्छ सुंदर करण्याचे काम हे सफाई कामगार करतात. मेघवाल समाज मोठ्या प्रमाणात मुंबईत राहतो. त्यामुळे मी मनापासून त्यांचे पक्षात स्वागत करतो आणि तिन्ही माजी नगरसेविका भगिनी यांचे देखील मी शिवसेना पक्षामध्ये स्वागत करतो.
आज नगरसेवक शिवसेनेत आले आहेत कारण त्यांना त्यांच्या विभागात चांगले काम करायचे आहे. फक्त त्यांना ती संधी आजतागायत मिळाली नव्हती. जो विश्वास त्यांनी माझ्यावर दाखवला आहे, तो विश्वास सार्थ ठरेल अशी मी खात्री देतो. आज शिवसेनेमध्ये ५३ सीटिंग नगरसेवक झाले आहेत. आपले सरकार सर्वसामान्य लोकांचे आहे. जनतेला आमच्यावर विश्वास आहे. त्यामुळेच रोज नवनवीन पक्षप्रवेश होत आहेत. आपल्या सरकारने जे लोककल्याणकारी काम मागील दीड वर्षांत केले. ही त्याचीच पोचपावती आहे, असं मुख्यमंत्री म्हणाले.
मुंबई महानरपालिकेतील काँग्रेसच्या माजी नगरसेविका सुषमा विनोद शेखर, शहाना रिजवान खान, शाबिया इकबाल शेख यांनी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह काल #शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. यांच्यासह मेघवाल समाजाचे रविकुमार धाडिया व किशोर कुमार यांनीही शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.
यावेळी… pic.twitter.com/Ww3kfXc3NZ
— Eknath Shinde - एकनाथ शिंदे (@mieknathshinde) February 29, 2024
मिलिंद देवरा काय म्हणाले?
खासदार मिलिंद देवरा म्हणाले की, सर्व माजी नगरसेविकांचे हार्दिक स्वागत करत आहे. मी त्यांना आश्वासन देऊ इच्छितो की,मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या माध्यमातून तुम्हाला तुमच्या विभागामध्ये जास्तीत जास्त विधायक कामे करण्याची संधी मिळेल. आज मेघवाल समाज सुद्धा शिवसेनेशी जोडला गेलेला आहे. मी मुख्यमंत्री शिंदे साहेबांना आश्वस्त करू इच्छितो मुंबईतील समस्त सफाई कर्मचारी तनाने मानाने शिवसेनेसोबत आहेत.