विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नवीन घोषणा होण्याची शक्यता
मुंबई : आजपासून विधीमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन (Legislative Budget Session 2024) सुरू होत आहे. या अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी २०२३-२४ च्या पुरवणी मागण्या मांडल्या जाणार आहेत. तर, दुसऱ्या दिवशी २७ फेब्रुवारी रोजी पुरवणी मागण्यांवर चर्चा आणि मतदान होणार आहे. यानंतर शासकीय कामकाज होणार असून दुपारी २ वाजता उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) २०२४-२५ चा अंतरिम अर्थसंकल्प (Interim budget) सादर करतील. आगामी विधानसभा निवडणुकांच्या (Vidhan Sabha Election) पार्श्वभूमीवर काही लोकप्रिय घोषणा होतील, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.
अजित पवार पुढील चार महिन्याचा अंतरिम अर्थसंकल्प सादर करणार आहेत. यामध्ये पुढील चार महिन्यातील आवश्यक खर्चाची तरतूद केली जाईल. त्यात सरकारी कर्मचाऱ्यांचे वेतन आणि भत्ते, कर्जाचे हप्ते, व्याज तसेच निवडणुकीला लागणाऱ्या खर्चाचा समावेश आहे.
विधानसभा निवडणूक होऊन नवे सरकार सत्तेवर येईपर्यंत देशाचा आर्थिक गाडा चालवण्यासाठी खर्चाची परवानगी देण्यासाठी हे लेखानुदान मांडले जाईल. त्यामुळे लेखानुदानामध्ये मोठ्या आर्थिक बदलांची शक्यता नाही. मात्र विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काही समाजघटकांना आकर्षित करणाऱ्या घोषणा केल्या जाऊ शकतात.
अर्थसंकल्पात ‘या’ घोषणा होण्याची शक्यता
पायाभूत सुविधा क्षेत्र, ग्रामीण भागातील रस्ते यासारख्या योजनांसाठीच्या तरतुदीत वाढ केली जाण्याची शक्यता आहे. रोजगार निर्मितीच्या दृष्टीने सरकारकडून मोठ्या घोषणा केल्या जाऊ शकतात. तर सामाजिक सुरक्षेच्या योजनांसाठी भरीव तरतूद केली जाऊ शकते. मराठा समाजाला सवलती देणे, आशा सेविकांच्या आर्थिक अनुदानात वाढ, निवासी डॉक्टरांच्या अनुदानात वाढ, शेतकऱ्यांना सवलती देणे यासारख्या मोठ्या घोषणा होण्याची शक्यता आहे.