- गजानन महाराज : प्रवीण पांडे, अकोला
अनंत कोटी ब्रह्मांड नायक l
महाराजाधिराज योगिराज l
परब्रह्म सच्चिदानंद l
भक्त प्रतिपालक l
शेगांव निवासी l समर्थ सद्गुरू l
श्री गजानन महाराज की जय ll
गजानन महाराजांच्या जयजयकाराचा (जयकारा) नाद मंदिरात सदैव घुमत असतो आणि तसाच तो भक्तांच्या अंतर्मनात देखील सदैव निनादत असतो.
या जयजयकारावरचे अत्यंत सुंदर असे निरूपण अकोला येथील सुनील देशपांडे हे आपल्या कीर्तनातून अत्यंत सुंदर रीतीने सांगतात. हे भक्त प्रतिपालक श्री गजानन महाराज निरूपण ऐकण्यासारखे आहे.
अनेक लेखांतून असे आढळून येते की, श्री गजानन महाराजांची प्रचिती भक्तांना नित्य मिळत असते आणि बहुधा त्यामुळेच भक्त मंडळींची महाराजांवर असीम श्रद्धा आणि निष्ठा आहे.
अनेक भक्तमंडळींना श्री महाराजांच्या आलेल्या अनुभवाची पुस्तकेदेखील प्रसिद्ध झाली आहेत. त्यामुळे या लेखामालेत भक्तवत्सल महाराजांचे मी स्वतः अनुभवलेले काही प्रसंग येथे वाचकांच्या माहितीस्तव विनम्रपणे विषद करतो.
या लेखांमधून कोणतीही अतिशयोक्ती नाही. हे जे काही लिहिले आहे या माझ्या जीवनात घडून गेलेल्या काही घटना आहेत. त्या कथा रूपात आपल्या समक्ष मांडण्याचा हा एक छोटासा प्रयत्न.
माझ्या काकांना देवाज्ञा झाली असा निरोप आला, त्यावेळी मी शाळेत काम करत बसलो होतो. लगेच निघालो. अकोट येथून माझा बंधू प्रशांत याला निरोप मिळताच त्याने भ्रमणध्वनीवरून माझ्याशी संपर्क केला व तो मुंबई येथे जाण्याकरिता अकोला येथे येण्यास निघाला. आम्ही दोघे बंधू गाडीने मुंबई येथे पोहोचलो. स्व. काकांचे अंत्यविधी पार पडले. भावाला ऑफिसचे काम असल्यामुळे तो चौथ्या दिवशी परत येण्यास निघाला. मला पुढील विधीकरिता थांबवायचे होते. त्याप्रमाणे मी तिथे राहिलो.
सर्व विधी संपन्न झाल्यावर व शौच (सुतक) फिटल्यावर डोंबिवली येथे माझ्या मामांकडे जाण्यास निघालो. मामांना मी माझ्या परतीचे आरक्षण करावयास सांगितले होते. त्यांनी वेगवेगळ्या आठ गाड्यांमधील आरक्षणाचे अर्ज भरून ठेवले होते. मी डोंबिवली येथे पोहोचलो तो मला घेण्यास मामा स्टेशन वर हजर होते. (हे माझे मामा म्हणजे गिरीश पिटके जे श्री गजानन महाराजांचे भक्त आहेत, तसेच डोंबिवली येथील गजानन महाराजांच्या मठाचे सदस्य देखील आहेत.)
मी डोंबिवलीला पोहोचताच मामांनी मला सर्व गाड्यांचे आरक्षण अर्ज दाखवून यांपैकी कोणत्या गाडीचे आरक्षण करावे, अशी मला पृछा केली. स्टेशनवर विचारणा केली असता कोणत्याही गाडीत आरक्षण उपलब्ध नव्हते, म्हणून वेटिंग रिझर्व्हेशन केले, ती गाडी होती मुंबई-अमरावती अंबा एक्स्प्रेस गाडीची वेळ रात्री ८.३०-९ वाजता होती. मामांसोबत त्यांच्या घरी जाऊन जेवण, आराम, गप्पा-गोष्टी असे सर्व पार पडले. संध्याकाळी कल्याण येथे गाडीत बसण्याकरिता हजर झालो. वेळेनुसार गाडी आली.
बी – २ या डब्यात दाखल झालो. जागा उपलब्ध नव्हतीच. मग तिकीट परीक्षकांना जागा मिळावी म्हणून विनंती केली, पण त्यांनी असमर्थता दर्शविली. रात्री ११.३० वाजेपर्यंत जिथे कुठे जागा मिळेल तिथे बसलो. १२ वाजता झोप येऊ लागली म्हणून जाण्या-येण्याच्या कॉरिडॉरमध्ये अंथरूण(टॉवेल) टाकून आडवा झालो. निद्रादेवीने आपला अंमल दाखविला. रात्री सुमारे ३ वाजता जाग आली. उठून थोडे पाय मोकळे केले. कॉरिडॉरमध्ये एक वृद्ध गृहस्थ आडवे झाले होते. धोतर आणि अंगरखा एवढेच वस्त्र परिधान केले होते त्यांनी. ते मला म्हणाले, “आज थंडी खूप आहे बाबा.”
तो दिवस होता १४ जानेवारी २०१७. म्हणजेच संक्रांतीचा ब्राह्म मुहूर्त. त्या दिवशी प्रचंड थंडी होती. पुन्हा येऊन आपल्या जागेवर पहुडलो. गाडीचे खालचे फ्लोअरिंग बर्फाप्रमाणे गार पडले होते. पण झोप येत होती. थोड्या वेळाने काय झाले? माझी मेंदूची नस फुटली (वैद्यकीय भाषेत ब्रेन हॅमरेज). डोक्यात थोडीशी वेदना जाणवली. उठायचा प्रयत्न करू लागलो. उठणे तर सोडा, साधी हालचाल देखील करणे शक्य होईना. असा थोडा प्रयत्न करून पाहिला. बर्थ वर चढण्याकरिता असणाऱ्या शिडीचा आधार घेण्याचा प्रयत्न एकदा केला. सपशेल घसरून पडलो. निपचित झालो. जाणीव हळूहळू मावळू लागली होती. मनात मात्र होते “आता शेगाव येईल.” पण बसून श्री महाराजांना नमस्कार करणे देखील शक्य नव्हते. श्री महाराजांची करुणा भाकली. श्री मारुतीरायांना विनवणी केली की, “काय होत आहे काही कळत नाही. आपणच रक्षण करावे.”
मी ज्यावेळी उठण्याचा प्रयत्न करीत होतो आणि पडलो, हे गाडीत असणाऱ्या एका सुहृद व्यक्तींनी पाहिले. त्यांच्या हे लक्षात आले होते की, काहीतरी गडबड आहे. ते माझ्या जवळ आले. माझ्या खिशातील रोख रक्कम, भ्रमणध्वनी काढून माझ्या कानाशी ओरडून मला त्यांनी सांगितले, “भाईसहाब, मैंने आपका फोन और कॅश निकालकर मेरे पास रखा हैं.” मला त्यांनी सांगितलेले ऐकू आले, पण मला काहीच प्रतिक्रिया देता येणे शक्य नव्हते. हळूहळू जाणीव संपूर्ण मावळली. (ग्लानी अथवा बेशुद्धी). पहाटे पहाटे ही गाडी अकोला येथे पोहोचते. मी अजून घरी का पोहोचलो नाही म्हणून माझी पत्नी विद्या माझ्या फोनवर संपर्क साधण्याकरिता वारंवार प्रयत्न करू लागली. आता फोन आल्याचे मला कळणे शक्य नव्हते आणि माझा फोन तर माझ्याजवळ नव्हताच. त्या सद्गृहस्थाने फोन उचलला. माझी पत्नी वार्तालाप करू लागली. त्या गृहस्थाने तिला सांगितले की, “हा फोन ज्या व्यक्तीचा आहे, तो गाडीत आजारी झाला असून, सद्यस्थितीत बेशुद्ध अवस्थेत आहे.” हे ऐकून पत्नी एकदम घाबरून गेली आणि त्या गृहस्थाला विनवू लागली, “कृपया आपण लक्ष द्या आणि अकोला स्टेशन आले की यांना उतरवून घेण्यास मदत करा.”
यावर त्या सद्गृहस्थ महोदयांनी माझ्या पत्नीस सांगितले की, “गाडीने अकोला बऱ्याच वेळापूर्वी सोडले असून, आता गाडी माना-कुरुम स्थानकादरम्यान आलेली आहे. आपले कोणी नातेवाईक अथवा परिचित असतील, तर त्यांना त्वरित अमरावती स्थानकावर पाठवा आणि बोगी क्रमांक बी – २ जवळ येऊन या फोनवर संपर्क साधण्यास सांगा आणि जर आपले अमरावती येथे कोणी नसेल तरीही काळजी करू नका. मी स्वतः यांना दवाखान्यात दाखल करेन व आपण लोक येईतोवर काळजी घेईन.” हे ऐकून पत्नी सैरभैर झाली. पण समयसूचक निर्णय घेऊन तिने माझ्या भावास फोन केला. तो देखील त्वरित आकोट येथून अमरावती येथे येण्यास निघाला. अमरावती येथील माझे दोन भाऊ शेखर पावडे व श्रीरंग पीटके हे प्लॅटफॉर्मवर तत्परतेने येऊन उभे होते. गाडी अमरावती येथे पोहोचताच माझ्या दोन भावांनी मला डॉक्टर सावदेकर यांच्या सुयश हॉस्पिटल येथे भरती केले. डॉ. हृषिकेश आणि डॉ. योगेश या डॉक्टरांनी आणि त्यांच्या डॉक्टर पत्नीने माझ्यावर तातडीने उपचार सुरू केले.
दुसऱ्या दिवशी गाडीत भेटलेले ते सद्गृहस्थ दवाखान्यात मला भेटावयास जातीने हजर झाले. त्यावेळी माझ्या बंधूंनी “दादा, तू यांना ओळखलेस का?” असा प्रश्न केला; परंतु अर्धवट जागृती अथवा बेशुद्ध अवस्थेत मी त्यांना पाहू शकलो नव्हतो. पण त्यांनी माझ्याकडे पाहून हलकेसे स्मित केले आणि “अब कैसे है आप?”, अशी माझी चौकशी केली. (क्रमश:)