नवी दिल्ली : राममंदिराचे लोकार्पण झाल्यापासून २३ जानेवारीपासून ते १२ फेब्रुवारीपर्यंत सुमारे ३० लाखांहून अधिक भाविकांनी रामलल्लाचे दर्शन घेतल्याचे राम मंदिर ट्रस्टकडून सांगण्यात येत आहे. सकाळी ६ वाजता राम मंदिर खुले करण्यात येते. तर रात्री १० वाजता मंदिर बंद होते.
राम मंदिरातील भाविकांचा वाढता ओघ पाहता रामदर्शनासाठीची वेळ वाढवण्यात आली होती. मात्र, बालस्वरुपातील रामलल्ला अनेक तास भक्तांना दर्शन देत असल्यामुळे रामलल्ला प्रभूंना आराम मिळत नसल्याचे सांगितले जात आहे.
रामलल्ला पाच वर्षांच्या बालरूपात विराजमान आहेत. १५ तास अखंड दर्शन देत आहेत. त्यांना विश्रांतीही मिळत नाही. तसेच ते शास्त्रसंमत आणि समर्थनीय नाही. रामलल्ला प्रभूंना दुपारी किमान एक ते दोन तास विश्रांतीची गरज आहे, असे आचार्य सत्येंद्र दास यांनी म्हटले आहे. लोकांचे असा मत आहे की ५ वर्षांच्या बालरुपात पूजल्या जात असलेल्या प्रभू श्रीरामांना चांगल्या विश्रांतीचीदेखील आवश्यक आहे. भगवंताचे बालस्वरूप १४ तास जागे राहणे कितपत व्यावहारिक आहे? असा सवाल चंपत राय यांनी केला आहे.
राम मंदिर दर्शनाची वेळ काही तासांनी कमी केली जाऊ शकते, अशी शक्यता असल्याचे सांगितले जात आहे. याबाबत ट्रस्ट विचारविनिमय करत आहे. बालस्वरुपातील रामलला प्रभूंना आराम मिळण्यासाठी ट्रस्टकडून काही व्यवस्था केली जाऊ शकते, असे म्हटले जात आहे.