मुंबई : राज्यात बळीराजासाठी (Farmers) अजूनही दुष्टचक्र सुरुच आहे. काल बंगालच्या उपसागरावरून आलेल्या बाष्पयुक्त वाऱ्यामुळे राज्यातील विदर्भ (Vidarbha) आणि मराठवाड्यातील (Marathwada) काही भागांत पावसाच्या सरी कोसळल्या. काही तुरळक ठिकाणी गारपीटही झाली. या अवकाळी पावसामुळे (Unseasonal Rain) आणि वादळामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले. विदर्भातील अमरावती, वर्धा, यवतमाळ, चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये शनिवारी वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस व गारपिटीने तडाखा दिला. आजही विदर्भामध्ये अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे
हवामान विभागाने (IMD) वर्तविलेला अंदाज खरा ठरवत पावसाने रविवारी उपराजधानीसह ग्रामीण भागांतही जोरदार हजेरी लावली. भंडारा, चंद्रपूर, वर्धा जिल्ह्यांसह नागपूर जिल्ह्यातील मौदा, कुही व कामठी तालुक्यांना गारपिटीने जोरदार तडाखा दिला, तर शहरातही विजांसह वादळी पावसाने हजेरी लावली. विदर्भात आजही पावसाचा इशारा असल्याने बळीराजाची चिंता व धाकधूक कायम आहे.
यक्लोनिक सर्क्युलेशनमुळे सध्या विदर्भात पावसाळी वातावरण आहे. यामुळे रब्बी पिकांसह भाजीपाला, फळबागा व उन्हाळी धान्याचे नुकसान झाले आहे. या अवकाळीमुळे आंब्याचा मोहोर झडला असून शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे.
नागपूरलाही मध्यरात्रीच्या सुमारास वादळी पावसाने झोडपले. रात्री बारानंतर उत्तर नागपुरातील गोधनी, मानकापूरसह अनेक भागांमध्ये ताशी ३० ते ४० किमी वेगाने आलेल्या सोसाट्याचा वाऱ्यासह जवळपास अर्धा तास टपोऱ्या थेंबांचा पाऊस पडला. हवामान विभागाने सोमवारीसुद्धा नागपूरसह विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह वादळी पावसाचा (येलो अलर्ट) इशारा दिला आहे. उद्या मात्र हळूहळू आकाश निरभ्र होऊन तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे.