
काय आहे त्या वीटेमागची कहाणी?
मुंबई : अनेक राजकीय नेते एकमेकांना महागड्या वस्तू भेट म्हणून देत असल्याचे आपण पाहिले आहे. पण मनसे नेते बाळा नांदगावकर (Bala Nandgaonkar) यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना (Raj Thackeray) एक आगळीवेगळी भेटवस्तू दिली आहे. ही भेटवस्तू एका महागड्या वस्तूपेक्षाही अधिक मौल्यवान आहे. कारण बाळा नांदगावकर यांनी ती ३२ वर्षे आपल्याजवळ जपून ठेवली होती. शिवाय त्या वस्तूला एक इतिहासही आहे. आज बाळा नांदगावकर यांनी राज ठाकरेंचं निवासस्थान असलेल्या ‘शिवतीर्थ’ बंगल्यावर जाऊन त्यांना एक खास वीट (Brick) भेट म्हणून दिली.
३२ वर्षांपूर्वी ६ डिसेंबर १९९२ ला जेव्हा बाबरीचा (Babri Masjid) ढाचा पडला तेव्हा महाराष्ट्रातून जे शिवसैनिक गेले होते, त्यामध्ये बाळा नांदगावकरही होते. जेव्हा बाबरी पाडली तेव्हा त्यातून ही वीट बाळा नांदगावकरांनी आणली होती. त्यांनी दोन वीटा आणल्या होत्या. त्यापैकी एक वीट त्यांनी माजगावचं कार्यालय बांधताना त्याखाली ठेवली होती. मनसेत प्रवेश केल्यानेतर त्यांनी हे कार्यालय शिवसेनेकडे सुपूर्त केलं. तर दुसरी वीट त्यांनी जपून ठेवली होती व आज ती राज ठाकरेंना त्यांनी भेट म्हणून दिली.
आठवणी ताज्या करताना काय म्हणाले बाळा नांदगावकर?
राज ठाकरेच आपल्यासाठी बाळासाहेब ठाकरे असल्याची प्रतिक्रिया यावेळी बाळा नांदगावकर यांनी दिली. ते म्हणाले, “तो प्रसंग फार बाका होता. तो प्रसंग आठवला की, फक्त जय श्रीराम घोषणा ऐकू यायच्या. तेव्हा माहित नव्हतं की परत जिवंत येऊ की नाही. त्यावेळी काय सुचलं माहिती नाही पण, मी बाबरीची वीट सोबत आणली होती. त्याला आता ३२ वर्षं झाली.
माझी इच्छा होती की जेव्हा राम मंदिर तयार होईल तेव्हा ही वीट मी बाळासाहेब ठाकरेंना सुपूर्त करेन. २२ जानेवारीला राम मंदिर लोकांसाठी खुलं झालं आणि २३ तारखेला बाळासाहेबांचा जन्म दिवस आहे. आज बाळासाहेब ठाकरे नाहीयेत. पण आमच्या दृष्टीने आमचे बाळासाहेब राज ठाकरेच आहेत. त्यामुळे माझा शब्द पूर्ण झाला”, असं बाळा नांदगावकर म्हणाले.
राज ठाकरे म्हणाले, वीट हातात घेऊन बघितली तर...
राज ठाकरे म्हणाले, “बाबरीचा ढाचा पडला तेव्हा महाराष्ट्रातून जाणाऱ्या शिवसैनिकांमध्ये बाळा नांदगावकरही होते. तिथल्या दोन विटा ते घेऊन आले होते. त्या विटांचं वजन जास्त होतं. तुम्हाला लक्षात येईल की तेव्हाची बांधकामं कशी होती. ही वीट हातात घेऊन बघितली तर तुम्हाला याचा अंदाज येईल. तेव्हाची बांधकामं का चांगली असायची? कारण तेव्हा कंत्राटं निघायची नाहीत”, अशी मिश्किल टिप्पणीही राज ठाकरेंनी यावेळी करताच उपस्थितांमध्ये हशा पिकला. आज बाळासाहेब ठाकरे असते तर त्यांना खूप आनंद झाला असता, असंही राज ठाकरे म्हणाले.