सचिन जोग, पुणे
पुण्यात एफसी रोडच्या मागे आपटे प्रशालेजवळ असलेल्या आशा डायनिंगमध्ये नेहमी जात असतो. घरगुती जेवण थाळी पद्धतीने उत्तम मिळते. किमान १५ वर्षांपासून जातो. काही दिवसांपूर्वी गेलेलो, तेव्हा जिन्यातून खाली उतरताना एक ओळखीचा चेहरा दिसला. हसून नमस्कार केला. हे काका गेल्या तीन-चार वर्षांत जितक्या वेळा गेलो, साधारण एक वाजता तर नक्की भेटतात. सोबत खाली आलो आणि तिथे एक पुस्तकांच छोटे दुकान आहे. तिथे उभा राहिलो. अगदी सहज काकांना विचारले, “तब्येत बरी आहे का? काय चाललंय?” त्यांच्या उत्तरावरून त्यांना बोलावेस वाटले म्हणून बाकड्यावर बसलो शेजारी. जे काही ऐकलं ते असं आहे.
काका पुण्यातल्या कॉलेजमध्ये प्राध्यापक होते. निवृत्त होऊन १२ वर्षे झालीत आणि त्यांची पत्नी शाळेत शिक्षिका होती. त्याही निवृत्त झाल्या ८ वर्षांपूर्वी. त्यांच्या पत्नीच निधन झालंय ४ वर्षांपूर्वी. कुठलाही आजार आणि व्याधी नसताना. दोन मुले आहेत. दोन्ही उच्चशिक्षित व परदेशात स्थायिक. काकांचा जवळच बंगला आहे वडिलोपार्जित. ४००० स्क्वेअर फूट प्लॉट आणि प्रशस्त बंगला. घरात म्हातारा-म्हातारी दोघेच. १० वर्षांपूर्वी दोन्ही मुलं परदेशात गेली नि जोडपं अगदी एकाकी झालं. किरकोळ तब्येतीच्या तक्रारी सुरू झाल्या.
मुलांनी जवळच्या पोलीस ठाण्यात आणि एका हॉस्पिटलला सांगून ठेवलेय. पोलीस ४ दिवसांनी येऊन हे जिवंत आहेत का? ते पाहून जातो. हॉस्पिटलवाले काही जास्त झालं, तर दाखल करतात व ४ दिवसांनी घरी सोडतात. मुलांना काहीही विचारलं, तर “किती पैसे ट्रान्सफर करू” असं म्हणून संभाषण समाप्त. दोघेही नवरा-बायको आयुष्यभर माणसांत राहिलेले. तरुण मुलांमध्ये वावरलेले. हे एकटेपण खायला उठायचं. किती वेळ एकमेकांशी बोलणार आणि किती वेळ टीव्ही पाहणार. या एकटेपणाने म्हातारी हाय खाऊन गेली. नातेवाईक, मित्र कुणालाच वेळ नाही थांबायला. मुलांना फोन केला, तर दोघंही बोलले, “आता यायला जमणार नाही, तुम्ही उरकून घ्या. आम्ही श्राद्धाला येतो, अंत्यविधीला पैसे किती पाठवू.” म्हाताऱ्याने फोन ठेवला आणि बायकोला ४ लोक सोबत घेऊन पोहोचवून आला. सोबत त्याच्यातला जगण्याचा उरलासुरला उत्साह जाळून आला.
पैसे, सुविधा आहेत. सुख म्हणायला आहे. पण माणसांची कमी आहे, म्हणून समाधान नाही. केवळ माणसं भेटावीत, कुणाशीतरी बोलता यावे म्हणून हे काका व त्यांच्यासारखे बरेचजण ठरवून रोज दुपारी आशा डायनिंगमध्ये येतात, चार शब्द बोलतात व जेवण करून घरी जातात. ३-४ वर्षांत बरेच जोडीदार वर गेलेत. काका वाट पाहताहेत बोलवणं कधी येतं त्याची. मी सुन्न झालेलो होतो. मिनिटभर दोघेही गप्प होतो. मग त्यांनी माझी विचारपूस केली. कोण कुठला? आणि मग प्रश्न विचारला, “तुझे आई-वडील कुणाबरोबर राहतात?” मी म्हटले, “काका, मी त्यांच्याबरोबर राहतो, त्यांच्या घरात.” काका बोलले, “नशीबवान आहेत तुझे आई-वडील.” मी म्हटले, “काका ते नाही, मी नशीबवान आहे.” काकांना प्रॉमिस केलंय, आल्यावर नेहमी गप्पा मारायच्या. पण बरेच प्रश्न मनात आले.
आपण नक्की काय ध्येय ठेवून जगतो? आपल्या सुखाची व्याख्या काय? सगळी भौतिक सुखं हात जोडून उभी राहिली, तर माणूस सुखी होतो? समाधानी होतो? पोटाची भूक पैशाने भागेल, पण या लोकांची कुणीतरी आपल्याशी २ शब्द बोलावेत ही भूक कशी भागणार? सर्वात भयानक आहे की, या अशा एकाकी पडलेल्या ज्येष्ठांची संख्या वेगाने वाढतेय. आपल्याकडे एकत्रित उत्तर नाहीये यावर. मग खरंच आपण करतोय ती प्रगती आहे?