ओंजळ: पल्लवी अष्टेकर
आपल्या प्रत्येकाच्या जीवनात कधी ना कधी भावनिक आणि मानसिक आघात घडत असतात. याचे कारण म्हणजे आयुष्यात घडणारे दु:खद प्रसंग किंवा वाईट घटना. भावनिक व मानसिक आघातांनी व्यक्तीच्या मनातील सुरक्षिततेची भावना बिघडते. त्यामुळे एकलकोंडेपणा वाढणे, धोकादायक जगात असहाय्य वाटणे अशा गोष्टी घडतात. बालपणातील दुर्लक्ष, घरगुती हिंसाचार, गुंडगिरी अथवा एखाद्या जीवघेण्या आजाराशी लढा देणे. जर यासारखी एखादी घटना व्यक्तीच्या आयुष्यात घडली आणि ती त्या व्यक्तीच्या स्मृतीपटलावर तशीच राहिली, तर हा ताण ती व्यक्ती कायम बाळगून राहाते. जवळच्या व्यक्तीचा अचानक मृत्यू, महत्त्वपूर्ण नातेसंबंध तुटणे यातूनही जीवनात ताण निर्माण होतो. बालपणातील आघात व भविष्यातील आघात होण्याचा धोका यामुळेही ताण वाढतो. असुरक्षित वातावरण, पालकांपासून वेगळे होणे, उपेक्षा, गंभीर आजार, अनाहूत वैद्यकीय प्रक्रिया, विविध प्रकारचे अत्याचार यांनी मनावर दीर्घकाळ परिणाम होऊ शकतो.
चीड, टीका, दोष, भीती या चार गोष्टी आपल्या आयुष्याचे नुकसान करतात. या भावना इतरांना दोष देण्यामुळे व स्वत:ची जबाबदारी झटकून टाकल्यामुळे निर्माण होत असतात. मध्यंतरी माझ्या वाचनात ‘यू कॅन हील युवर लाइफ’ हे ‘लुईस. एल. हे’ या लेखिकेचे पुस्तक आले. लेखिका या तत्त्वज्ञानाच्या व्याख्यात्या व शिक्षिका आहेत. त्या म्हणतात, “नकारात्मक विचार मालिकांचा शरीरावर अनिष्टं परिणाम होत असतो. उदा. मनात सतत चीड बाळगली तर ती शरीर खायला लागते. यालाच आपण कॅन्सर म्हणतो. स्वत:वर सतत टीका केली, तर संधिवात होतो. अपराधीपणाची भावना शिक्षेच्या शोधात असते आणि ही शिक्षा म्हणजे वेदना. भीती व तणावामुळे केस गळतात, आंत्रव्रण होतो व पायांना व्रण होतात. मात्र लेखिकेच्या मतानुसार जर तुम्ही क्षमाशील झालात व संतापापासून मुक्ती मिळवलीत, तर सर्व आजार बरे होऊ शकतात.”
अनेक व्यक्तींना आपल्या आयुष्यात घडणाऱ्या घटना, प्रसंग, गोष्टी यांची जबाबदारी दुसऱ्याच्या माथ्यावर टाकण्याची सवय असते. असे न करता, जर आपण आपल्या आयुष्यात घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीची जबाबदारी स्वीकारली, तर त्याचं खापर दुसऱ्यावर फोडण्याची गरज नाही. एक खूपच सुंदर विचार या पुस्तकात प्रकट केला आहे. तो म्हणजे भूतकाळ विसरून जाण्यासाठी आपण सर्वांना, अगदी आपल्यासकट क्षमा करण्याची गरज आहे. तशी आपली इच्छा नसते, पण तशी इच्छा व्यक्त केली, तर बरे होण्याची प्रक्रिया सुरू होते. स्वत:ला सुधारण्यासाठी सर्वांना क्षमा करण्याची गरज आहे. “माझ्या अपेक्षेनुसार तू वागला नाहीस, तरी मी तुला क्षमा करीत आहे, तुला मुक्त करीत आहे”. असा विचार प्रत्येक व्यक्तीने केल्यास तो अनेक ओझ्यांतून मुक्त होऊ शकेल.
कित्येक लोक स्वत:सहित इतरांना क्षमा करू शकत नाहीत व अनेक लहान-सहान कारणांनी सतत त्रस्त राहतात. मात्र क्षमा करणे, सोडून देणे, मुक्त करणे ही प्रक्रिया जीवनात होणे अत्यंत महत्त्वाची आहे. आपल्या वेदना आपल्याला माहीत असतात, मात्र ज्यांना आपण क्षमा करणार आहोत, त्यांना पण तितक्याच वेदना असतात, हे आपल्यापैकी कितीजण समजून घेतात? त्यावेळेस त्यांनी त्यांच्या समजुतीनुसार, त्यांना जसं वाटतं तसं, त्यांच्या क्षमतेनुसार ते वागले हे ज्याला उमगते, तो खऱ्या अर्थाने मुक्त झाला.
भावनिक व मानसिक लक्षणांसोबत चिंताग्रस्त, अस्वस्थ व्यक्ती अनेक शारीरिक लक्षणे दर्शवितात. यात निद्रानाश किंवा भयानक स्वप्ने, थकवा, सहज चकित होणे, तीव्रता व आंदोलन, ठणका व वेदना, स्नायूंचा ताण व लक्ष केंद्रित करण्यात अडचण दिसून येते. आघाताची लक्षणे सामान्यत: काही दिवसांपासून काही महिन्यांपर्यंत टिकतात. आपल्याला अस्वस्थ करणाऱ्या घटनेवर प्रक्रिया करत असताना हळूहळू लुप्त होत जातात, पण त्यासाठी मन इतर गोष्टीत गुतंविणे जरुरीचे आहे. दररोज अर्धा तास किंवा अधिक व्यायाम करण्याचा प्रयत्न करा. चालणे, धावणे, पोहणे, बास्केटबाॅल, नाचणे यांसारखे लयबद्ध, तुमचे हात व पाय दोन्ही गुंतवून ठेवणारा व्यायाम उत्तम कार्य करतो.
आधुनिक काळात – EMDR नावाची थेरपीमधील तज्ज्ञांनी पुनर्प्रक्रिया व दुरुस्ती यांना महत्त्व दिले आहे. जेव्हा तुम्ही EMDR मधून जात असता, तेव्हा तुम्ही अत्यंत विशिष्ट मार्गांनी ट्राॅमा इव्हेंटच्या (धक्कादायक अथवा दुःखद प्रसंग) आठवणींमध्ये प्रवेश करता. डोळ्यांच्या हालचाली व मार्गदर्शक सूचनांसह एकत्रितपणे, त्या आठवणींमध्ये प्रवेश केल्याने तुम्हाला नकारात्मक प्रसंगातून काय आठवते ते पुन्हा प्रक्रिया करण्यात मदत होते. त्या पुनर्प्रक्रियेमुळे त्या स्मृतीमधील मानसिक इजा दुरुस्त होण्यास मदत होते व संबंधित भावना आटोपशीर राहतात.
आपल्या भारतीय संस्कृतीत आध्यात्माला विशेष महत्त्व आहे. मानसिक संतुलन, मनावर ताबा मिळवण्यासाठी नामस्मरण, जप इ. मार्ग संतांनी सांगितले आहेत. या मार्गांचे अवलंबन करून काही लोकांनी मनाची स्थिरता राखण्याचा प्रयत्न केला आहे. स्वत:वर प्रेम करणं, स्वत:ला स्वीकारणं हे महत्त्वाचं आहे. एक सुरक्षित, आश्वासक, तुमच्या हक्काची व स्वीकारण्याजोगी जागा तुम्ही तयार करता, तेव्हा मनामध्ये एक आयोजन होतं. आयुष्यात प्रेमळ नाती तयार व्हायला लागतात. ही सकारात्मक बदलाची गुरुकिल्ली आहे. समाजात मिसळणे, आपल्या सुखदु:खांची त्यांच्यासमवेत देवाण-घेवाण करणे यातून मनाला निश्चितपणे ‘फुंकर’ मिळू शकते. एक अशी हळुवार फुंकर की ज्यामुळे तुमच्या मनाच्या जखमा भरून येऊ शकतात.
दु:खाचा सामना करण्यास, आघातातून बरे होण्यास, जीवनात पुढे जाण्यास, मनाला उभारी प्राप्त करण्यास-स्वप्रतिमा उंचावण्याची गरज आहे. त्यामुळे अंतर्मुख होऊन साक्षीभावनेने सर्व घटनांचा विचार करून आयुष्याला सामोरे जा. सामाजिक उपक्रमात सहभागी व्हा. इतर लोकांसोबत सामान्य वार्तालाप करा. तुमच्या भावना समोरासमोर मांडण्यासाठी तुमच्याकडे कोणीतरी असणे आवश्यक आहे, जो तुमचा न्याय न करता लक्षपूर्वक ऐकेल असा कुटुंबातील विश्वासू सदस्य, मित्र सल्लागार किंवा पालक यांच्याकडे वळा.
स्वत:वर प्रेम करणं म्हणजे स्वत:वर कधीही टीका न करणं. स्वत:शी प्रेमळपणे वागल्याने, स्वत:ला समजून घेतल्याने आपण त्या विरोधातूनच बाहेर पडतो. मनाची स्वच्छता करणं वेळोवेळी गरजेचं असतं. एखादा विचार, एखादी समजूत तुमच्या कामाची नसेल, तर ती टाकून द्या. वर्तमानकाळातच शक्ती साठवलेली असते. आजचा वर्तमानकाळ हा तुमच्या भूतकाळातील विचारांनी तयार झाला आहे. सकारात्मक विचारसरणीने तुम्ही जीवनातील समाधान व आनंद यांची अनुभूती घेऊ शकाल. जर व्यक्तीला स्वत:वर फुंकर घालता आली, तर ती व्यक्ती स्वत:च्या दु:खाला किंवा व्यथांना विसरून इतरांच्या मदतीला धावून येऊ शकते. चला तर मग, हा क्षण माझ्यासाठी नवीन सुरुवात घेऊन आला आहे. या जगात सगळं काही चांगलं आहे अशी उभारी घेऊन जगा. मग आनंदाचा, समाधानाचा मोरपंखी क्षण तुमच्यापासून दूर नाही.