Friday, March 28, 2025
Homeसाप्ताहिककोलाजदेवालयांचे गाव - देवळे

देवालयांचे गाव – देवळे

कोकणी बाणा: सतीश पाटणकर

रत्नागिरी जिल्ह्यातील ‘अलकनंदा’ आणि ‘वरुणा’ या दोन नद्यांच्या संगमावर वसलेले ‘संगमेश्वर’ हे ‘कसबा संगमेश्वर’ म्हणून ओळखले जाते. त्या गावात दोन गोष्टी प्रमुख आहेत, त्या म्हणजे चालुक्यकालीन श्रीकर्णेश्वर मंदिर आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचे तेथील वास्तव्य. कसबा हे गाव समुद्र किनाऱ्यालगत नाही, पण तेथील नव्वद ते पंच्याण्णव टक्के घरांमधील तरुण हे होड्या बांधणीचे काम करतात. कसब्याची ती एक महत्त्वपूर्ण ओळख आहे.

देवळे हे रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील एक गाव. हे देवालयांचे गाव म्हणून संगमेश्वर तालुक्यात प्रसिद्ध आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात देवळे महाल हे सुभ्याचे ठिकाण होते. देवळे गावात श्री भवानी खड्गेश्वराचे पुरातन देवस्थान आहे. प्रतिवर्षी महाशिवरात्रीला येथे मोठा उत्सव असतो. स्वामी रंगावधूत महाराजांचे हे मूळ गाव आहे. देवळे गावात खड्गेश्वर, गावदेवी काळेश्वरी, विठ्ठल मंदिर, भैरी भवानी, रवळनाथ, श्रीकृष्ण, गणेश, मारुती पार, कालिका आणि दत्त मंदिर अशी प्रमुख नऊ, तर लहान-मोठी अनेक मंदिरे आहेत. त्यांपैकी गणेश मंदिर हे पेशवेकालीन आहे, तर खडगेश्वर मंदिराला अधिक जुना इतिहास आहे. कालिका मंदिराचे नाते थेट कोलकात्याच्या कालिका मंदिराशी आहे. ते मंदिर उघड्या स्थितीत आहे. बांधकाम करण्याचा प्रयत्न पूर्वी झाला होता पण ते बांधकाम लगेच पडले, असे जुने लोक सांगतात. त्यावरून त्या मंदिराचे बांधकाम टिकत नाही, अशी आख्यायिका पसरली आहे.

देवळे गाव हे रत्नागिरी-कोल्हापूर महामार्गाला लागून आहे. देवळे गावात जाण्यासाठी फाटा नाणीज गावापासून पुढे आठ किलोमीटरवर डावीकडे लागतो. तो रस्ता थेट खड्गेश्वर देवालयासमोर येतो. तेथेच गावातील बाजारपेठ आहे. गावात लहान-मोठ्या सतरा वाड्या आहेत. खडगेश्वर देवालयापासून सुरू होणारा दुसरा रस्ता वीस किलोमीटरवर असलेले तालुक्याचे ठिकाण, देवरुख येथे जातो. देवळे गाव हे रत्नागिरीपासून चाळीस किलोमीटर, तर कोल्हापूरपासून सुमारे नव्वद किलोमीटर अंतरावर आहे. खड्गेश्वर मंदिरात म्हणे एक गाय रोज येऊन पान्हा सोडायची. गाईच्या मालकाने त्या जागी खणण्यास सुरुवात केली आणि त्याची पहार एका दगडावर आपटली. त्यात त्या दगडाचा तुकडा पडला. ती पिंड शंकराची होती! खडगेश्वराच्या देवळातील पिंडीचा वरचा कोपरा उडालेला दिसतो, त्याची कहाणी अशी सांगितली जाते. त्या मंदिराचे बांधकाम चालुक्यकालीन आहे. गावातील आठल्ये परिवार हे त्या देवळाचे परंपरागत कारभारी आणि मानकरी आहेत.

शिवरात्री उत्सवाप्रमाणे गावातील शिमगोत्सव तालुक्यात प्रसिद्ध आहे. गावाच्या पालखीबरोबर दाभोळे, मेघी, करंजारी आणि चाफवली या गावांच्या पालख्या, तेव्हा एकत्र आणल्या जातात आणि पाच गावांच्या पालख्यांच्या भेटीचा सोहळा पार पडतो. गावातील कुंभार समाजाचा उत्सव प्रसिद्ध आहे. तो उत्सव शेतीचा हंगाम सुरू होण्याआधी मे महिन्यात पंधरा दिवस सुरू असतो. उत्सवात पूजा कुंभार समाजात परंपरेने करतात. त्यांचा खापरीचा नाच प्रसिद्ध आहे. त्या उत्सवात सतीची परंपरा आहे. जमिनीवर जाळ करून कुंभार समाजातील कोणी पुरुष स्त्री वेशात त्या जाळावरून उड्या घेतो. तो नाच पाहण्यासाठी आसपासच्या अनेक गावांतील लोक मोठ्या संख्येने जमा होतात. देवाचा आशीर्वाद मिळाला की, येणाऱ्या शेतीच्या हंगामात भरभराट होते, अशी श्रद्धा आहे.

रवळनाथ मंदिरालाही आख्यायिका आहे. त्या ठिकाणी आधी एक शेत होते. शेताचा मालक शेतात धान्य मोजत असताना धान्य मोजून संपेना. शेवटी कंटाळून, त्याने धान्य मोजण्याची पायली जमिनीवर आपटली. त्या जागी जमिनीतून रक्त येऊ लागले! शेतकऱ्याने त्या जागी खणून पाहिले असता तेथे पिंड मिळाली. रवळनाथ मंदिरात जी पिंड आहे तिच्या वरील भागाचे तीन तुकडे उडालेले दिसतात. याशिवायही, देवळे गावाला मोठा ऐतिहासिक वारसा आहे. देवळे गावात जेथे प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. त्याच्याजवळ दगडी बांधकामाची खूप जुनी विहीर आहे. ती भोकरीची विहीर या नावाने प्रसिद्ध आहे. विहिरीचा आकार लंबवर्तुळाकार म्हणजे पिंडीच्या आकाराचा आहे. विहिरीला पाणी उन्हाळ्यातही मुबलक असते. पेशवे घराणे हे गणेशभक्त. त्यांच्या काळात देवळे गावात गणेश मंदिर बांधण्यात आले. मंदिराला लागून पूल आहे. त्याचे बांधकामही पेशवेकालीन आहे, असे बांधकाम तज्ज्ञांचे मत आहे. त्याशिवाय गावातील एका टेकडीवर वीरगळ आहेत.

शिवाजी महाराजांच्या काळात देवळे गावाला महत्त्व होते. त्या गावातून आसपासच्या सुमारे चाळीस गावांचा कारभार चाले. गावात जेथे हायस्कूल आहे, तेथे बाजूला पूर्वी खलबत खाना होता. तेथे सरदारांच्या आणि कारभाऱ्यांच्या मसलती होत असत. खलबत खान्याच्या चौथऱ्याचे भग्न अवशेष दिसतात. देवळे गावात शिवाजी महाराज स्वत: येऊन गेल्याचा उल्लेख ग्रंथात आहे. देवळे गावाला लागून चाफवली नावाचे गाव आहे. तेथे स्वराज्य काळात पाटोळे नामक सरदार राहत होते. त्यांच्याशी स्वराज्यातील काही सरदारांचे वाद होते. ते मिटवून पाटोळे यांनाही स्वराज्यात घेण्यासाठी स्वत: राजे रायगडावरून देवळे येथे येण्यासाठी निघाले. ते गावात पोहोचले. पण तेवढ्यात सेवक अत्यंत महत्त्वाचा निरोप घेऊन आल्यामुळे राजांना परत जावे लागले. तो उल्लेख गावातील काही घराण्यांच्या ऐतिहासिक पुस्तकात आहे. गावाला लागून आणखी एक गाव म्हणजे मेघी. देवळे आणि मेघी या गावाच्या हद्दीवर खिंड आहे. तिला घोडखिंड म्हणतात. संभाजी राजे संगमेश्वरात वास्तव्याला असताना, त्यांनी स्वत:चे घोडदळ उभारले. ते घोडदळ परिसरावर नजर ठेवण्यासाठी फिरत असताना त्या खिंडीत अनेक वेळा विश्रांतीसाठी थांबत असे. म्हणून त्या खिंडीला घोडखिंड असे नाव पडले. (लेखक मुख्यमंत्र्यांचे माजी माहिती अधिकारी आहेत.)

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

Previous article
Next article
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -