Wednesday, April 30, 2025

महाराष्ट्रताज्या घडामोडी

Suicide case : अभ्यास करत नसल्याने आई रागावली म्हणून १३ वर्षांच्या मुलाने गळफास घेत संपवले जीवन

Suicide case : अभ्यास करत नसल्याने आई रागावली म्हणून १३ वर्षांच्या मुलाने गळफास घेत संपवले जीवन

पिंपरी चिंचवडमधील धक्कादायक घटना

पुणे : पिंपरी चिंचवडमधून (Pimpri Chinchwad) एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. केवळ १३ वर्षांच्या मुलाने एका क्षुल्लक कारणावरुन गळफास घेत आपले आयुष्य संपवले (Suicide case) आहे. अभ्यास करत नसल्याने आई रागावली याचं दुःख त्या मुलाला सहन झालं नाही आणि त्याने टोकाचं पाऊल उचललं. ही घटना ३१ जानेवारीची असून एक फेब्रुवारी रोजी या मुलाचा मृत्यू झाला. त्याच्या या कृत्यामुळे परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.

जतीन सोमनाथ कुदळे असं आत्महत्या केलेल्या मुलाचं नाव आहे. जतीन इयत्ता आठवीत शिक्षण घेत होता. ३१ जानेवारी रोजी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास जतीनची आई त्याला अभ्यास करण्यावरून रागावली. मग, त्याची आई मुलीला ट्यूशनला सोडायला गेली होती. घरी कोणीच नसल्याचे पाहून चिडलेल्या जतीनने दरवाजा बंद करून गळफास घेतला.

त्याने गळफास घेतला त्याच दरम्यान त्याचे वडील घरी आले. दरवाजा ठोठावला पण आतून प्रतिसाद येत नसल्याने त्यांनी पाठीमागील दरवाजाच्या फटीतून पाहिले. समोरील दृश्य पाहिल्यानंतर त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. मुलाने गळफास घेतला असून त्याचे पाय जमिनीवर लागत असल्याचे दृश्य त्यांना दिसले. हादरलेल्या वडिलांनी तात्काळ दरवाजाच्या आतून हात घालून कडी उघडली. जतीनला तात्काळ महानगरपालिकेच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, काही तासांच्या उपचारादरम्यान जतीनचा मृत्यू झाला असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या प्रकरणी पुढील तपास पोलीस करत आहेत.

अभ्यास केला नाही म्हणून पालकांनी रागावणे ही साधी आणि फार गरजेची गोष्ट आहे. पण हल्लीच्या काळात मुलं फार हळवी झाली आहेत. कोणत्याही गोष्टीचं त्यांना लगेच वाईट वाटतं. त्यात नैराश्याबद्दल समाजमाध्यमांमध्ये वारंवार देण्यात येणार्‍या माहितीमुळे नैराश्याची भावना मुलांच्या मनात येत राहते. मात्र, यातून मुलं इतकं टोकाचं पाऊल उचलत आहेत की पालकांनी मुलांना समज देणेही आता कठीण होऊन बसले आहे. पिंपरी चिंचवडमधील या घटनेमुळे मुलांच्या तणावाबाबत आणि त्यांच्या हळवेपणाबाबत पुन्हा चर्चा सुरू झाली आहे.

Comments
Add Comment