Tuesday, March 25, 2025
Homeब्रेकिंग न्यूजChandrabhaga : चंद्रभागेत 'मैला' आणि वाळवंटावर 'उकिरडा'

Chandrabhaga : चंद्रभागेत ‘मैला’ आणि वाळवंटावर ‘उकिरडा’

  • चंद्रभागा अर्थात भीमा नदीच्या काठावरील १२० गावांचे सांडपाणी नदीत मिसळते
  • दशक्रिया विधीनंतर केस, ब्लेड, कपडे, पिंडदान केलेले भाताचे गोळे, अस्थी, कपडे चंद्रभागेत सोडून दिले जाते
  • नगरपालिका आणि मंदिर समितीने नेमका काय खर्च केला?
  • ‘नमामि चंद्रभागा’ प्रकल्पाचेही वाजले ‘तीनतेरा’

पंढरपूर : विठ्ठल दर्शनासाठी येणारे लाखो भाविक पहिल्यांदा चंद्रभागेत (Chandrabhaga River) पवित्र स्नान करून तिचे तीर्थ तोंडात घेतात आणि मग विठुरायाच्या दर्शनाला जात असतात. मात्र गेल्या अनेक वर्षांपासून चंद्रभागेची अत्यंत वाईट अवस्था झाल्याने वारकरी संतप्त आहेत. लाखो वारकऱ्यांचे श्रद्धास्थान असणाऱ्या चंद्रभागेची अवस्था अत्यंत दयनीय बनली असून प्रशासनाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे चंद्रभागा ‘गटारगंगा’ बनली आहे. तर वाळवंटाचा उकिरडा बनू लागला आहे.

चंद्रभागेच्या याच घाण पाण्यात स्नान करावे लागते आणि तेच घाण पाणी तोंडात घ्यावे लागत असल्याने विठ्ठल भक्त निराश होत आहेत. चंद्रभागा अर्थात भीमा नदीच्या काठावर साधारण १२० गावे आहेत. ज्याचे सांडपाणी नदीत मिसळते. या नदीकाठच्या काठावरील गावातील सांडपाणी नदीत मिसळू नये यासाठी या १२० गावात स्वच्छ भारतमिशन योजनेतून शोष खड्डे, सांड पाणी व्यवस्थापन, घनकचरा व्यवस्थापन ही कामे ‘नमामि चंद्रभागा’ प्रकल्पाअंतर्गत हाती घेण्यात आली होती. मात्र, या योजनेचा बट्ट्याबोळ झाला. लाखो वारकऱ्यांना चंद्रभागेच्या शुद्ध पवित्र पाण्यात स्नान करण्याचा आनंद केव्हा घेता येईल, असा सवाल येथे येणारा वारकरी उपस्थित करत आहे.

विठ्ठलाच्या दर्शनाला जेवढं महत्व आहे, तितकेच चंद्रभागेच्या स्नानाला देखील महत्त्वं आहे. मात्र या चंद्रभागेची अवस्था दयनीय झाली आहे. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २०१४ मध्ये पंढरपूर येथे येऊन ‘नमामि चंद्रभागा’ (Namami Chandrabhaga) प्रकल्पाची घोषणा केली होती. मात्र, हा प्रकल्प कागदावरच राहिल्याने चंद्रभागेची दुरवस्था झाली आहे.

चंद्रभागा सफाईसाठी नगरपालिका आणि मंदिर समितीकडून खर्च केला जात असल्याचे सांगितले जाते. मात्र, वारकऱ्यांच्या नशिबी दुर्गंधी असलेल्या पाण्यात स्नान आणि घाणीने भरलेल्या वाळवंटात भजन करण्याची वेळ येत आहे. बेकायदा वाळू उपशामुळे आधीच वाळवंट उजाड बनले असताना आता त्याचा उकिरडा होऊ लागला आहे. दिवसेंदिवस चंद्रभागेची अवस्था अधिक वाईट होत आहे आणि प्रशासन याकडे सपशेल दुर्लक्ष करताना दिसत आहे.

माणसाच्या मृत्यूनंतर होणारा दशक्रिया विधी चंद्रभागेच्या पवित्र वाळवंटात व्हावा म्हणून देशभरातून मयताच्या नातेवाईकांची इथे मोठी गर्दी असते. दशक्रिया विधी नंतर केस, ब्लेडची पाने, कपडे तसेच पिंडदान केलेले भाताचे गोळे असेच उघड्यावरती वाळवंटात पडलेले दिसतात. मृतांच्या अस्थी, कपडे, वस्तू चंद्रभागेत सोडून दिले जात असल्याने चंद्रभागा आणखी प्रदूषित होत आहे. चंद्रभागेत दशक्रिया विधी करण्याची भावना असली तरी यासाठी वेगळी व्यवस्था करण्याची जबाबदारी प्रशासनाची आहे. मात्र याकडे प्रशासन डोळेझाक करीत असल्याने भाविक संतप्त आहेत.

पंढरपूरसाठी करोडो रुपयाच्या योजनांच्या घोषणा होत असताना याची पूर्तता करणेही गरजेचे असून विकासकामे करताना भाविकांच्या गरजेचा विचार केला तर असे प्रश्न तयार होणार नाही. किमान आता तरी चंद्रभागेच्या स्वच्छ पात्र आणि सुंदर वाळवंट देण्यासाठी राज्य सरकारने एखादी योजना बनविण्याची मागणी वारकरी करीत असून तोपर्यंत शासनाने रोज चंद्रभागा सफाईचे आदेश द्यावेत अशी भाविकांची माफक अपेक्षा आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -