नॉस्टॅल्जिया: श्रीनिवास बेलसरे
“कैफी आझमी” यांचे मूळ नाव होते अख्तर हुसैन रिझवी. उत्तर प्रदेशच्या आझमगड जिल्ह्यातील मिजवा या गावात जन्मलेले आझमी वयाच्या ११व्या वर्षापासूनच कविता लिहू लागले. संवेदनशील भावुक मन आणि घरातील पारंपरिक वातावरण यामुळे ते १७व्या वर्षीच साम्यवादी विचारधारेकडे ओढले गेले. मग अतिशय सरळ मनाच्या या कवीने थेट कम्युनिस्ट पक्षाची सदस्यता घेऊन ठरवले की, लेखणीचा उपयोग समतावादी विचार पसरवण्यासाठी करायचा. कम्युनिस्ट पक्षाने त्यांना मुंबईला पाठवले. इथे त्यांनी खास कामगारांसाठी निघणाऱ्या “मजदूर मोहल्ला” नावाच्या उर्दू नियतकालिकाच्या संपादनाची जबाबदारी उचलली.
लेखिका शौकत कैफी आझमींच्या लेखनाने प्रभावित झालेल्या होत्या. परिचय झाला, पुढे त्याचे रूपांतर प्रेमात झाले. स्वत: श्रीमंत असलेल्या शौकत पतीबरोबर खेतवाडीतल्या सार्वजनिक स्वच्छतागृह असलेल्या चाळीत राहिल्या. कैफी आझमी यांना गीतकार म्हणून संधी मिळाली ती १९५१च्या “बुजदिल” या सिनेमात. त्यांची अनेक गाणी आजही रसिकांच्या मनात ताजी आहेत. त्यातली “मिले ना फूसल तो कांटोसे दोस्ती कर ली” (अनोखी रात-१९६८) “या दिलकी सुनो दुनियावालो या मुझको अभी चूप रहने दो” (अनुपमा-१९६६), “चलते चलते, युंही कोई मिल गया था” (पाकीझा-१९७२), “वक्तने किया क्या हंसी सितम, हम रहे ना हम…” (कागजके फूल-१९५९), “जरासी आहट होती है तो दिल पूछता है…” (हकीकत-१९६४), “राह बनी खुद मंजिल” (कोहरा-१९६४), मिलो ना तुम तो हम घबराये…” “ये दुनिया, ये महफिल, मेरे कामकी नही” (हीर-रांझा-१९७०), केवळ अविस्मरणीय ठरतात. “अर्थ” या काहीशा वेगळ्या विषयावरील सिनेमासाठीही त्यांनी ३ अत्यंत भावमधुर गाणी लिहिली. विवाहबाह्य प्रेमातून निरागस जीवांची झालेली घालमेल, भावनिक वाताहत हा सिनेमाचा विषय होता. त्या काळी असा चाकोरीबाहेरचा विषयही महेश भट यांनी इतक्या हळुवारपणे हाताळला की सिनेमा चांगलाच लोकप्रिय झाला.
सिनेमाची कथा महेश भट यांच्या जीवनात घडलेल्या एका घटनेवर आधारित होती, असे म्हणतात. महेशजींनी “अर्थ”साठी निवडलेले कलाकार एकापेक्षा एक होते- शबाना आझमी, रोहिणी हट्टंगडी, स्मिता पाटील, कुलभूषण खरमंदा, दीना पाठक, ओम शिवपुरी, राज किरण! स्वाभाविकपणेच सिनेमाला १० नामांकने आणि ६ पुरस्कार मिळाले! शबाना आझमींना राष्ट्रीय फिल्म पुरस्कार (रजत कमल) आणि सर्वश्रेष्ठ अभिनेत्रीचा फिल्मफेयर पुरस्कार, केशव हिरानी यांना सर्वोत्कृष्ट संकलनाचा राष्ट्रीय पुरस्कार, मधुकर शिंदे यांना बंगाल फिल्म पत्रकार संघटनेचा सर्वोत्कृष्ट कला-दिग्दर्शनाचा पुरस्कार, रोहिणी हट्टंगडी यांना सर्वश्रेष्ठ सहायक अभिनेत्रीचा फिल्मफेयर पुरस्कार आणि महेश भट यांना सर्वोत्त संवाद लेखनाचा फिल्मफेयर पुरस्कार मिळाला!
जगजीतसिंग यांनी गायलेल्या एका हळुवार गाण्याचे आझमी यांनी लिहिलेले शब्द मोठे सुंदर होते. प्रसंग असा होता की, पूजा (शबाना आझमी) आणि पती इंदरमध्ये (कुलभूषण खरमंदा) कवितामुळे (स्मिता पाटील) दुरावा निर्माण झालेला आहे. त्यात मित्र राज (राज किरण) तिच्या एकाकी जीवनात आनंद निर्माण करायचा प्रयत्न करतो. एकदा प्रेमात पोळल्यामुळे पूजा प्रतिसाद देत नाही. ती त्याला सगळे ठीक असल्याचे दाखवण्याचा प्रयत्न करत असते. त्यावेळी राजच्या तोंडी दिलेल्या गाण्याचे शब्द होते –
“तुम इतना जो मुस्कुरा रहे हो,
क्या ग़म है जिसको छुपा रहे हो?
आंखोंमें नमी, हंसी लबोंपर,
क्या हाल है, क्या दिखा रहे हो?”
अनेकदा माणूस आतून दु:खी असताना बाहेरून गरजेपेक्षा जास्त आनंदी असल्याचे दाखवायला जातो आणि त्यानेच त्याचा घात होतो. जवळच्या व्यक्तीला बरोबर कळते की, सगळे मुळीच आलबेल नाही. उलट बरेच काहीतरी नक्कीच बिघडले आहे! राज पुजाला विचारतो, “डोळे तर ओलसर दिसताहेत आणि ओठावर हसू? मनात जे सुरू आहे त्याच्या उलटे दाखवायचा तुझा प्रयत्न सफल होत नाहीये गं!” आणि हो, दु:ख नेहमी मनात दाबून ठेवशील तर एक दिवस तुझ्या आत कोंडलेल्या अश्रूंचेच विष होऊन जाईल! दु:ख असे दाबून ठेवायचे नसते. किमान जवळच्या व्यक्तीजवळ तरी ते व्यक्त करून टाकायला हवे.
“बन जाएंगे ज़हर पीते पीते,
ये अश्क जो पीते जा रहे हो.
जिन ज़ख़्मोंको वक़्त भर चला है,
तुम क्यूं उन्हें छेड़े जा रहे हो?”
राजचे म्हणणे आहे की इंदरसारखे कुणी पुजाच्या जीवनात येणे, त्याने मनापासून असलेल्या प्रेमात धोका देणे, मध्येच निघून जाणे, हे आपले नशीब मानून तिने सोडून द्यायला हवे. नव्याने जीवनाला सामोरे जायला हवे! आयुष्य आनंदाने जगण्याचा निर्णय घ्यायला हवा. म्हणून तो म्हणतो, “झाले गेले ते विधिलिखित होते. ते सोडून दे. स्वत:ला अगतिक समजून तू उगाच स्वत:च्या हातानेच स्वत:चे जास्त दुर्दैवी भविष्य लिहीत आहेस.”
“रेखाओंका खेल है मुक़द्दर,
रेखाओंसे मात खा रहे हो.”
अशाच दुसऱ्या प्रसंगात राज तिला आपल्या प्रेमाची उघड कबुली देतो. अतिशय हळुवारपणे आपला प्रेमाचा प्रस्ताव मांडतो. मात्र सिनेमाचा शेवट कलाटणी देणाराच हवा असा विचार दिग्दर्शकाने केला असावा म्हणून राजचे प्रामाणिक प्रेम शेवटपर्यंत असफलच राहते. त्या गाण्याचे शब्द होते-
“झुकी झुकीसी नज़र बे-क़रार है कि नहीं
दबा दबासा सही दिलमें प्यार है कि नहीं”
राजला माहीत आहे की, पूजाच्या मनात त्याच्याविषयी प्रेम आहे. ती ते मान्य करत नाही म्हणूनच त्याच्या डोळ्यांत डोळे घालून “नाही” म्हणू शकत नाही. तरीही तो तिला समजविण्याचा प्रयत्न करतो आहे. “तू स्वत:च्या मनात डोकावून पाहा, तुलाही पटेल की माझ्यासारखीच तुझ्या मनातही घालमेल आहे. बैचेनी आहे. प्रेम तर तुलाही हवे आहे.”
“तू अपने दिलकी जवाँ धड़कनोंको
गिनके बता,
मेरी तरह तेरा दिल बे-क़रार है कि नहीं?”
खरे तर प्रेमात पोळलेल्या व्यक्तीला प्रेमाची जास्त तहान असते. कारण तिने प्रेमाचे सुख भोगलेले असते आणि ते गेल्यावर मन जास्त अस्वस्थ असते. म्हणून राज विचारतो, “बघ, तुलाही प्रेमाची प्रतीक्षा आहे. आपले मन पुन्हा प्रेमाच्या जादूने मोहरावे असे तर तुलाही
वाटतेच ना?
“वो पल कि जिसमें मोहब्बत जवान होती है,
उस एक पलका तुझे इंतिज़ार है कि नहीं?”
मी तर अवघ्या जगाला ठोकर मारून तुझे प्रेम मिळवायला उत्सुक आहे. तूही जरा मनात चाचपून बघ ना, तुझा स्वत:वर विश्वास आहे का? माझे उत्कट, अनिवार प्रेम स्वीकारू शकशील?
“तेरी उम्मीदपे ठुकरा रहा हूँ दुनियाको
तुझे भी अपनेपे ये एतबार है कि नहीं?”
अशी ही अस्वस्थ करत करत अंतर्मुख करणारी आणि दुखातही दिलासा देणारी गाणी. कधी मधी ऐकलीच पाहिजेत ना?