संवाद: गुरुनाथ तेंडुलकर
एका राजाच्या दरबारात दोन माणसं गेली आणि म्हणाली, “आम्ही चोर आहोत. साधे सुधे चोर नाही तर अट्टल चोर. चोरी करणं हा आमचा खानदानी पेशा आहे, आमचा तो वडिलोपार्जित धंदा आहे.” राजा चमकलाच. दोन तरुण राजदरबारात सर्वांसमक्ष सांगतात की, “आम्ही चोर आहोत. खानदानी चोर…?” “होय महाराज, आम्ही खरोखरीच चोर आहोत. चोरी ही आम्ही एक कला समजतो.” “काय!, चोरी ही कला?” महाराजांनी आश्चर्यानं विचारलं. “होय महाराज. चोरी करण्यासाठी देखील कौशल्य लागतं आणि आम्ही अभिमानानं सांगतो की आम्ही चोर आहोत. तुम्हाला आमची कला पाहायचीय?”
आता मात्र राजा चक्रावलाच. “ठीक आहे. माझ्या राजवाड्यात चोरी करून दाखवाल?” “अहो महाराज राजवाड्यातच कशाला, अगदी तुमच्या डोळ्यांतलं काजळ जरी चोरायला सांगाल ना, तरी ते आम्ही चोरू शकतो. बोला तुमच्या अंगावरचा अंगरखा चोरून दाखवू?”
“अं… अं… नको नको.” राजा गडबडला.
इतक्या आत्मविश्वासानं बोलताहेत तर कदाचित खरोखरीच अंगरखा चोरला तर? उगाचच लाज जायची.
“नको नको, अंगरखा नको. त्यापेक्षा तुम्ही माझ्या पायातले जोडे चोरून दाखवा.” राजानं चोरांना आव्हान दिलं. “ठीक आहे महाराज. एक दिवसाची मुदत द्या. चोवीस तास. उद्या सकाळी दरबारात तुमच्या पायात असलेले हेच जोडे आम्ही हजर करू.” त्या दोन चोरांनी राजाचं आव्हान स्वीकारलं आणि निघून गेले.
राजदरबारात मात्र अस्वस्थता पसरली. जर खरोखरीच महाराजांचे जोडे चोरले तर? नाही म्हटलं तरी राजादेखील थोडासा धास्तावलाच. न जाणो… छे ! असे कसे जोडे चोरतील? आज मी पायातून जोडे काढणारच नाही. मग तर झालं… राजानं मनोमन ठरवलं. दिवसभर राजानं ते जोडे पायात बाळगले, पण… पण संध्याकाळी मात्र… दररोज संध्याकाळी शहराबाहेरच्या टेकडीवर असलेल्या गणेश मंदिरात राजा अगदी न चुकता जायचा. दररोज संध्याकाळी. कुणातरी नामवंताचं कीर्तन, प्रवचन ऐकायचा. हा नेम त्यानं अगदी गेली अनेक वर्षं सांभाळला होता. आज मात्र… कारण देवळात जायचं तर जोडे बाहेर काढूनच जायला हवं… छे छे! असं कसं होईल. जोडे चोरीला जातील म्हणून काय देवळात जाण्याचा नियम मोडायचा? चोराच्या भीतीनं देवाचं दर्शन टाळायचं. ते काही नाही. आजही देवळात जायचंच. निश्चय करून राजा देवळात गेला. जोडे बाहेर काढले आणि एका सेवकाला त्या जोड्यावर पाय ठेवून उभं राहायला सांगितलं. देवळात प्रवेश करण्यापूर्वी राजानं त्या सेवकाला बजावलं, “हे बघ, हे जोडे सांभाळ. त्यावर पाय देऊन उभा राहा. कोणत्याही परिस्थितीत जोड्यावरचे पाय उचलू नकोस.”
नोकराला सूचना देऊन राजा देवळात गेला. कीर्तन ऐकण्यात रमला. त्या दिवशी अंगारकी असल्याकारणानं देवळात गर्दी ओसंडून वाहत होती. इकडे बाहेर तो सेवक राजाच्या जोड्यावर पाय ठेवून उभा होता. कीर्तन संपलं. आरती सुरू झाली आणि आरती संपल्यानंतर देवळात प्रसाद वाटण्याचं काम सुरू झालं. देवळाच्या बाहेर पायरीवर एक पुजारी प्रसादाचं ताट घेऊन जमलेल्या गर्दीला पेढ्यांचा प्रसाद वाटत होता. जोड्यावर पाय ठेवून उभा असणाऱ्या सेवकानं प्रसादासाठी हात पुढे केला पण तो प्रसाद वाटणारा पुजारी वरच्या पायरीवर असल्यामुळे त्या सेवकाचा हात तिथपर्यंत पोहोचू शकत नव्हता. पुजारी प्रसाद वाटत होता. गर्दीतली सगळी माणसं हात उंचावून प्रसाद घेत होती. त्या सेवकाचा हात मात्र तिथपर्यंत पोहोचत नव्हता. एक साधारण फुटभर अंतर होतं. सेवकानं अगदी सहजतेनं एक पाय उचलला आणि एका पायावर शरीर तोलून अंग पुढे झुकवलं. हात पुढे करत प्रसाद मिळवला. प्रसादाचा पेढा तोंडात टाकला. मात्र आणि त्याच्या लक्षात आलं की, त्यानं प्रसादासाठी, हात लांब करताना डावा पाय उचलला. त्या पायाखालचा राजाचा जोडा गायब झाला होता आणि तो पेढे वाटणारा पुजारीदेखील आता कुठं दिसत नव्हता.
सेवकाची पाचावरधारण बसली. आता काय होणार? महाराजांना हे कसं सांगायचं. ते काय म्हणतील? कोणती शिक्षा फर्मावतील? प्रसादाच्या एका पेढ्यासाठी आपण आपलं कर्तव्य कसं विसरलो. सेवकानं भीत भीतच राजाच्या कानावर हा प्रकार घातला. राजा संतापला. पण प्रधानानं त्याची समजूत घातली. सेवकाची चूक झाली होती ही गोष्ट खरीच, पण आता त्यातून काहीतरी मार्ग काढायला हवा होता. कारण उद्या जर राजदरबारात त्या दोन चोरांनी राजाचा चोरलेला जोडा हजर केला तर… तर महाराजांची अब्रू जाण्याची पाळी. प्रजाजनांच्या मनात राजाबद्दल वाटणारा आदर व विश्वासाला तडा गेला असता. लोक म्हणाले असते, “हा कसला राजा, जो राजा स्वतःच्या पायातला जोडा सांभाळू शकत नाही तो राजा प्रजेचं काय रक्षण करणार…? नाही नाही. असं होता कामा नये. काहीतरी करायला हवं.” राजानं प्रधानाबरोबर विचारविनिमय केला. “काय करायचं?”
“महाराज आपण असं केलं तर…” चुटकी वाजवून प्रधान एकदम म्हणाला. “काय केलं तर…?” “महाराज, आपल्या डाव्या पायातला जोडा त्या चोरांनी चोरलाय. उजव्या पायातला जोडा अद्याप आपल्याजवळच आहे. हा जोडा ज्या चांभारानं बांधला होता त्याच चांभाराकडून तशाच प्रकारचा, अगदी त्याच धाटणीचा, तेवढाच झिजलेला, अगदी हुबेहूब दिसणारा डाव्या पायाचा एकच जोडा बनवून घेतला तर…” “अगदी बरोबर. रातोरात तसा जोडा बनवायला सांगा. मात्र हे काम गुपचूप व्हायला हवं होतं. कुणालाही पत्ता लागता कामा नये.” झालं. महाराज राजवाड्यावर परतले आणि स्वतः प्रधानजी त्या चांभाराकडे गेले. महाराजांच्या उजव्या पायातला जोडा त्या चांभाराजवळ दिला आणि म्हणाले, “हा उजव्या पायाचा जोडा. अगदी याच मापाचा, याच्याच सारखा, एवढाच झिजलेला, अगदी हुबेहूब दिसणारा डाव्या पायातला जोडा रातोरात बनवायचा. हे काम अगदी गुप्ततेनं व्हायला हवं. या घे शंभर मोहरा. काम मात्र अगदी हुबेहूब व्हायला हवं.” “जी सरकार. रातच्या रातीच बनवतो. उद्या उजाडायच्या आत जोडा तयार करतो.” चांभारानं आश्वासन दिलं.
प्रधानजी सुटकेचा निश्वास टाकून राजवाड्यावर परतले आणि महाराजांना काम फत्ते होणार याची खात्री दिली. साधारण तासभर झाला असेल नसेल, सैनिकांचा पोशाख केलेली दोन माणसं त्या चांभाराजवळ पोहोचली. चांभारानं उजव्या पायाच्या मापानं डाव्या पायासाठी चामडं कापून ठेकायला सुरुवात केली होती. तेवढ्यात हे दोन सैनिक तिथं पोहोचले आणि म्हणाले, “मघाशी प्रधानजींनी तुम्हाला जे काम सांगितलं होतं ते ताबडतोब थांबवा. डाव्या पायातला जोडा आता बनवण्याची गरज नाही. डाव्या पायाचा हरवलेला जोडा सापडला. हा बघा.” त्या सैनिकांपैकी एकानं डाव्या पायातला जोडा काढून दाखवला आणि पुढं म्हणाला. “तुम्हाला त्रास दिल्याबद्दल प्रधानजींनी शंभरपैकी दहा मोहरा ठेवून बाकीच्या नव्वद मोहरा आणि उजव्या पायातला जोडा परत द्यायला सांगितलाय.” चांभाराकडून नव्वद मोहरा आणि उजव्या पायातला जोडा घेऊन ते ‘दोन सैनिक’ निघून गेले.
दुसऱ्या दिवशी सकाळी ते दोन चोर दरबारात हजर झाले. त्यातला एक पुजाऱ्याच्या वेषात होता आणि दुसरा सैनिकाच्या… या कथेतल्या त्या दोघा चोरांचं खरोखरीच कौतुक करावसं वाटतं. केवढं कौशल्य? केवढी बुद्धिमत्ता? केवढा आत्मविश्वास? आम्ही सांगून काहीही चोरू शकतो. आम्ही खानदानी चोर आहोत याचं केवढं भूषण? पण खरोखरीच जरा अंतर्मुख होऊन विचार केला, तर त्या चोरांनी आपली बुद्धी चोरी करण्याऐवजी एखाद्या विधायक कार्यासाठी वापरली असती तर? आज आपण आपल्या देशात प्रतिदिनी वाढणारी गुन्हेगारी, ढासळणारी मूल्यं आणि र्हास पावणारी समाजव्यवस्था यांची कारणं शोधण्याचा प्रयत्न केला, तर आपल्या ध्यानी येईल की बुद्धिमंतांची बुद्धी बहुतेक वेळा त्यांच्या वैयक्तिक स्वार्थासाठी, कार्यासाठी वापरली जात आहे.
ज्या बुद्धीचा वापर करून विधायक कार्य पार पाडायची तीच बुद्धी विपरीत वापरून विघातक कार्य केली जात आहेत. आपण जे काम करतोय, त्यातून थोडाफार लाभ होईलही, पण या स्वार्थी कार्याचे राष्ट्रावर दूरगामी काय परिणाम होतील याचा विचार बुद्धिमंतांनीच करायला हवा. अशा प्रकारचा दूरगामी विचार न करता केवळ “आजचा आपला फायदा झाला म्हणजे मिळवलं.” या भावनेनं बुद्धीचा वापर केला, तर त्या व्यक्तीची जरी तात्पुरती उन्नती झाली तरी समाजाची अधोगती ही ठरलेलीच. पण दुर्दैवाची गोष्ट म्हणजे सर्वसामान्य माणसं बहुतेक वेळा चांगली वागतात, पण ज्यांना विशेष बुद्धी लाभलीय अशीच माणसंच गुन्हेगारीकडे वळताना आपल्याला आढळतात. अगदी आजूबाजूला जरा नजर टाका.
सायबर गुन्हे करणारे, कडेकोट बंदोबस्तातला पासवर्ड तोडून दुसऱ्याच्या संगणकात शिरून धुमाकूळ घालणारे तरुण काय कमी बुद्धिमान असतात? अर्थव्यवस्थेतील फटीत शिरून, तिथल्या त्रुटींचा अभ्यास करून, काही वरिष्ठांना हाताशी धरून आर्थिक गुन्हे करणारे हर्षद मेहता, केतन पारीख ही काय सामान्य बुद्धीची माणसं आहेत का? ११ सप्टेंबर २००१ रोजी अमेरिकेतील जागतिक व्यापार केंद्र आणि पेंटागॉनच्या इमारतीत विमानं घुसवून हजारो माणसं मारण्याचा आणि करोडो डॉलर्सची मालमत्ता क्षणात उध्वस्त करणायाची कल्पना ज्या मेंदूतून जन्माला आली तो माणूस काय कमी बुद्धीमान म्हणायचा?
रामाला कांचनमृगाच्या मागे पाठवून सीतेला पळवून नेणारा रावणाची बुद्धी काय कमी दर्जाची होती? जरासंधाच्या हाडांचे फासे बनवून द्यूतात कपटानं डाव खेळून पांडवांचं सर्वस्व लुबाडणारी दुर्योधन आणि शकूनी काय कमी बुद्धीमान होते? पण… पण त्यांची बुद्धी विपरित दिशेनं धावली.बुद्धी विपरित दिशेनं धावू लागली करी विनाश जवळ आलाच म्हणून समजावा. “विनाशकाले विपरित बुद्धी.” म्हणतात ते काही खोटं नाही. आजही आपल्या आजूबाजूला समाजात जी विघातक कृत्यं आपण पहातो त्यामागे बुद्धीमंतांचीच बुद्धी आढळते. याच माणसांनी आपलं बुद्धीकौशल्य पणाला लावून जर काही समाजउपयोगी उपक्रम हाती घेतले तर? केवळ “मी आणि माझं” हा व्यक्तिगत विचार झटकून “समाज आणि राष्ट्र” असा व्यापक विचार केला तर? तर मला वाटतं पृथ्वीचं नंदनवन व्हायला वेळ लागणार नाही. एका तत्त्वज्ञाचं वचन आहे. “कुशाग्र बुद्धिमत्ता ही एक ईश्वरी देणगी आहे. तिचा वापर ईश्वरी कार्यासाठीच करायला हवा.”