ओंजळ: पल्लवी अष्टेकर
“हायाची इकिरो” हे नाव आपण कधी इतिहासात ऐकले आहे का? १९१५ मध्ये सोमा कुटुंबाच्या घरात, आतील बागेतील अलिप्त खोलीत त्यांचा मुक्काम होता. तेथून त्यांनी भूमिगत होऊन भारताच्या स्वातंत्र्य चळवळीला पाठिंबा दिला. १९१८ मध्ये त्यांनी तोशिकोशी लग्न केले व १९२३ मध्ये त्यांनी जपानी नागरिकत्व संपादन केले. सोमा कुटुंबाच्या नाकामुराया बेकरीच्या व्यवस्थापनातही ते गुंतले. नाकामुरायाशी जोडलेल्या कॅफे मेनूमध्ये त्यांना “भारतीय करी”ची ओळख करून द्यायची होती. यांनी बनविलेल्या अप्रतिम करीने तेथील सारेजण अचंबित झाले. त्यांचे खरे नाव होते “रासबिहारी बोस”.
रासबिहारी बोस यांचा जन्म २५ मे १८८६ रोजी पालाशय बिघाती या हुगळी नदीच्या किनाऱ्यावर वसलेल्या गावात झाला. रासबिहारी राहात असलेले चंद्रनगर हे गाव ब्रिटिश व फ्रेंच या वसाहतींमध्ये दोन्ही प्रदेशांच्या सरसीमेवर वसलेले होते. मुख्य म्हणजे या सरसीमेच्या नेमक्या मध्यभागी त्यांचे घर होते. त्यामुळे त्यांच्या घराच्या पुढची, बैठकीची खोली ब्रिटिशांच्या हद्दीत, तर मागचे स्वयंपाकघर व पडवी फ्रेंचांच्या हद्दीत येत होती. “ना इकडचा, ना तिकडचा पण दोन्हीकडून परका” असे अद्भुत घर संपूर्ण जगात एकमेव असावे; परंतु चंद्रनगर ही वसाहत फ्रेंचांच्या अमलाखाली येत असल्यामुळे रासबिहारींना एक महत्त्वाचा फायदा झाला. या वसाहतीत शस्त्रनिर्बंध नव्हते. त्यामुळे शस्त्रं हाताळणे, बंदुकी-पिस्तुलाने सराव करण्यात अडचण आली नाही. पुढे बाॅम्ब बनवून स्फोट करण्याचे शिक्षणही त्यांनी या भागात घेतले.
कलकत्त्यात पुढे त्यांनी क्रांतिकारी संघटनेमार्फत बाॅम्बविद्या शिकून घेतली. रासबिहारी यांनी सिमला येथील सरकारी प्रिटिंग प्रेसमध्ये नोकरी धरली. नंतर डेहराडून येथे त्यांनी खासगी शिकवण्या घेतल्या. त्यात प्रमंथा टागोर यांची मुले होती. गंमत म्हणजे हेच नाव त्यांनी आपल्या पासपोर्ट मिळवण्यासाठी घेतले व या नावाच्या पासपोर्टवर त्यांनी जपानला पलायन केले. पुढे केमिकल लॅबोरेटरीत असिस्टंट म्हणून काम करण्याचा फायदा त्यांना बाॅम्ब बनविण्याच्या प्रक्रियेत झाला. ते अनुशीलन समिती या क्रांतिकारी संघटनेशी गुप्तपणे संधान साधून होते. जतेंद्रनाथ बॅनर्जी, चंद्र घोष, अमरेंद्रनाथ चॅटर्जी अशा अनेक साथीदारांशी त्यांची चर्चा होऊन पुढील कार्याची दिशा ठरविली गेली.
अनुशीलन समितीची स्थापना १९०२ मध्ये सतीशचंद्र बासूंनी केली. ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून मुक्तता व देशासाठी स्वातंत्र्य मिळवणे हे या संघटनेचे ध्येय होते. या ध्येयपूर्तीसाठी निधी उभारणे, प्रसंगी सरकारी खजिन्यांवर डाका घालणे, देशप्रेमाने प्रेरित झालेल्या तरुणांना शस्त्रास्त्र शिक्षण देणे, शस्त्रे मिळविणे व बाॅम्ब तयार करून ब्रिटिश सरकारवर हल्ला करणे व इंग्रज सत्ता हटविणे अशा विविध कार्यांसाठी ही संघटना काम करीत होती.
ब्रिटिश साम्राज्याची सत्ता खिळखिळी करण्यासाठी बाॅम्बहल्ल्याची धाडसी योजना रासबिहारी यांनी आखली. दिल्लीतील प्रसिद्ध चांदणी चौकातून मिरवणूक जाणार होती. तेथील रस्ता ऐंशी फूट रुंद व मैलभर लांब होता. रस्त्यावर दुतर्फा झाडे, उंच घरे व छोट्या-छोट्या गल्ल्या होत्या. त्यामुळे लपण्यास व पोलिसांना गुंगारा देण्यास चांगली जागा होती. या भागात टाऊन हाॅल व क्लाॅक टाॅवरच्या जवळच एक तीन मजली इमारत होती. तळमजल्यावर पंजाब नॅशनल बँकेचे कार्यालय होते. मिरवणूक पाहायला येणाऱ्या स्त्रियांची खास व्यवस्था करण्यात आली होती. रासबिहारींनी अतिशय सतर्कपणे योजना आखली. या ठिकाणी वसंतकुमार विश्वासांनी बुरखाधारी स्त्री-वेष धारण करायचा असे ठरविले व तिचे पती म्हणून रासबिहारी जवळच थांबणार होते.
व्हाॅइसराॅयची मिरवणूक इमारतीसमोर येताच लाॅर्ड हार्डिंजवर बाॅम्बहल्ला करायचा असे ठरले. यदाकदाचित वसंतकुमारांचा निशाणा चुकलाच तर अवधबिहारींनी दुसरा बाॅम्ब तयार ठेवून लाॅर्ड हार्डिंजवर फेकायचा अशी पर्यायी व्यवस्था करायला रासबिहारी विसरले नाहीत. बालमुकुंद हे अवधबिहारींच्या समवेत मदतीला राहणार होते. २३ डिसेंबर १९१२ चा दिवस. मिरवणुकीच्या मार्गावर सत्ताधाऱ्यांनी कमानी उभारल्या होत्या. रंगीबेरंगी पताका फडकविण्यात आल्या होत्या. दिल्लीच्या सीमेवर पदकांनी सजलेला लाॅर्ड हार्डिंग्ज उतरताच त्यांना ३१ तोफांची सलामी देण्यात आली. लाॅर्ड हार्डिंज आपल्या पत्नीसह सोन्यामोत्याने मढवलेल्या हत्तीवरील चांदीच्या अंबारीत स्थानाप्पन्न झाले. क्लाॅक टाॅवर टाऊन हाॅल ओलांडत व्हाॅईसराॅय बसलेला गजराज पंजाब नॅशनल बँकेच्या इमारतीसमोर आला व कानठळ्या फोडणारा प्रचंड स्फोटाचा आवाज झाला. पूर्वनियोजनानुसार लाॅर्ड हार्डिंज टप्प्यात आल्यावर वसंतकुमारांनी नेम धरून बाॅम्ब फेकला. व्हाॅईसराॅय लाॅर्ड हार्डिंज बेशुद्ध झाले. त्यांना इंग्रज अधिकाऱ्यांनी दवाखान्यात दाखल केले. सर्व क्रांतिकारक वेगवेगळ्या मार्गांनी पसार झाले.
काही कालावधीनंतर रासबिहारी स्वस्थ बसल्यासारखे दिसत असले तरी त्यांचे विचारचक्र जोरात सुरू होते. अवधबिहारी, बालमुकुंद यांच्याशी सल्लामसलत करून त्यांनी लाहोर गेटजवळील माँटेगोमरी क्लबमध्ये बाॅम्बस्फोट करून उच्चपदस्थ इंग्रज अधिकाऱ्यांची हत्या करण्याचे ठरविले. रासबिहारी यांनी तिथे बाॅम्बस्फोट करण्यासाठी, एक बाॅम्ब पेटीसह वसंतकुमार व अवधबिहारी यांच्याकडे पोहोचता केला. माँटेगोमरी हाॅलच्या प्रवेशद्वाराजवळ मोठ्या खुबीने त्यांनी तो ठेवला; परंतु इंग्रज उच्चपदस्थ नेमके दुसऱ्या गेटने प्रवेश करते झाले. रात्री उशिरा एका सुरक्षा सैनिकाच्या पायाचा धक्का लागून मोठा बाॅम्बस्फोट झाला व त्यात तो सुरक्षा अधिकारी मरण पावला.
आता इंग्रजांनी क्रांतिकारकांच्या धरपकडीचे सत्र आरंभले. बाॅम्बहल्ल्याची चौकशी चालू करताना इंग्रजी अधिकाऱ्यांना हिंदुस्थानच्या स्वातंत्र्य चळवळीसंबंधी व ब्रिटिश राजवटीविरोधी लिबर्टी (स्वातंत्र्य) या पत्रकाच्या प्रती सापडल्या. त्याचा मागोवा घेत त्याचे धागेदोरे लाहोर बाॅम्बस्फोट व क्रांतिकारक दीनानाथ यांच्यापर्यंत मिळवण्यात पोलिसांना यश मिळाले. दीनानाथ यांनी पोलिसांची मारहाण असह्य होऊन लाहोर बाॅम्बस्फोटातील क्रांतिकारकांची नावे घेतली. याची चौकशी करता करता पोलीस लाॅर्ड हार्डिंजवरील बाॅम्बहल्ल्यापर्यंत येऊन पोहोचले. पोलिसांनी अमीरचंद यांचा दत्तकपुत्र सुलतानचंद याला अटक करून त्याच्याकडून गुप्त पत्रव्यवहार व दिल्ली बाॅम्बस्फोटाचे महत्त्वाचे धागेदोरे हस्तगत केले. त्यानुसार त्यांनी अवधबिहारी, वसंतकुमार विश्वास, मास्टर अमीरचंद, बालमुकुंद अशा अनेक क्रांतिकारकांना अटक केली. फक्त रासबिहारी त्यांच्या हाती लागले नाहीत.
त्यांनी चातुर्याने जपानला पलायन केले. इंडियन नॅशनल आर्मी (नंतरची “आझाद हिंद फौज”) उभारण्यासाठी रासबिहारी, कॅप्टन मोहनसिंग, कॅप्टन राघवसिंग, नेताजींचे विश्वासू ज्ञानेश्वर देशपांडे इ.अहोरात्र घेतलेले कष्टं फळास आले. ११ मार्च १९४३ रोजी बर्लिन (जर्मनी) मधून नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी “हिंदुस्थान” या स्वतंत्र सार्वभौम राष्ट्राची घोषणा केली. त्याला जर्मनी, इटली, जपान इ. सात राष्ट्रांनी मान्यता दिली. रासबिहारी यांच्या निमंत्रणावरून दि.२ जून १९४३ रोजी जर्मन पाणबुडीने नेताजी सुभाषचंद्र टोकियोत आले. जपान सरकारनेही या त्यांचे स्वागत केले. या ऐतिहासिक भेटीत रासबिहारी यांनी सुभाषबाबूंना इंडियन नॅशनल आर्मीचे सुप्रीम कमांडर व लीगचे मुख्य अध्यक्ष म्हणून प्रभार घेण्याची विनंती केली.
२१ जानेवारी १९४५ रोजी रासबिहारी यांचे देहावसान झाले. अतिशय धावपळ, खडतर आयुष्य याने त्यांची प्रकृती खालावली. ज्या स्वातंत्र्यासाठी त्यांनी संपूर्ण आयुष्य वेचले, तो भारत स्वतंत्र पाहण्याचे भाग्य त्यांना लाभले नाही. जपान सम्राटांनी त्यांच्या अंत्ययात्रेसाठी राजरथ पाठविला. जपानच्या सम्राटांनी त्यांना “सेकंड ऑर्डर ऑफ दि रायझिंग सन” हा सन्माननीय किताब देऊन त्यांचा गौरव केला.