नवी दिल्ली : बिल्किस बानो प्रकरणातील (Bilkis Bano case) बलात्कार आणि तिच्या कुटुंबीयांच्या हत्येप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा झालेल्या ११ पैकी नऊ दोषींनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करून आ
त्मसमर्पण करण्यासाठी आणखी वेळ देण्याची विनंती केली होती. या याचिकांवर शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. सर्वोच्च न्यायालयाने बिल्किस बानो प्रकरणातील सर्व ११ दोषींचे अर्ज फेटाळून लावले आहेत. सर्व दोषींना २१ जानेवारीपर्यंत आत्मसमर्पण करण्याची मुदत देण्यात आली आहे.
गुजरात सरकारने या ११ दोषींना माफीच्या आधारावर मुदतपूर्व सुटका करून तुरुंगातून सोडले होते. याविरोधात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर सुनावणी घेतल्यानंतर ८ जानेवारी रोजी सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्ती बी.व्ही. नागरथना आणि न्यायमूर्ती पंकज मित्तल यांच्या खंडपीठाने या दोषींना दोन आठवड्यांत तुरुंगात आत्मसमर्पण करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर दोषींनी आत्मसमर्पण करण्यासाठी वेळ मागितला होता.
दोषी गोविंदभाई नाई याने दाखल केलेल्या अर्जात म्हटले होते की, त्यांचे ८८ वर्षीय वडील आणि ७५ वर्षीय आई आजारी आहेत. त्यांची काळजी घेणारा तो एकमेव माणूस आहे. या आधारावर त्याला आत्मसमर्पण करण्यासाठी आणखी वेळ द्यावा. तर रमेश रुपाभाई चंदना याने त्याच्या मुलाच्या लग्नाचे कारण दिले होते. यासाठी आणखी वेळ द्यावा असे त्याने म्हटले होते. दोषी मितेश चिमणलाल भट्ट आणि जसवंतभाई चतुरभाई नाई या दोघांनी पिकांची कापणी करायची आहे. पिके काढणीसाठी आली आहेत. त्यासाठी त्यांना काही आठवड्यांची मुदत हवी होती. तर प्रदीप रमणलाल मोढिया याची नुकतीच फुफ्फुसाची शस्त्रक्रिया झाली आहे आणि त्याला बरे होण्यासाठी आणखी काही आठवड्यांची मुदत हवी होती. बिपिन चंद कनैयालाल जोशी नुकत्याच झालेल्या पायाच्या शस्त्रक्रियेमुळे अर्धवट अपंग आहे. राधेश्याम भगवानदास शाह याने म्हातारे आई-वडील आणि एक मुलगा महाविद्यालयात आहे. त्यामुळे आत्मसमर्पण करण्यापूर्वी त्याच्या कुटुंबाची आर्थिक व्यवस्था करण्यासाठी त्याला आणखी काही वेळ लागेल. त्यामुळे आणखी काही आठवड्यांची मुदत वाढवून मागितली होती. या दोषींनी दाखल केलेले अर्ज शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळले आहेत. सर्व दोषींना २१ जानेवारीपर्यंत आत्मसमर्पण करण्याची मुदत देण्यात आली आहे.
दोषींना दोन आठवड्यात आत्मसमर्पण करावे लागणार
बिल्किस बानो प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने गुजरात सरकारला फटकारले होते. बिल्किस बानो प्रकरणातील ११ दोषींना शिक्षेतून सूट देण्याचा गुजरात सरकारचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने नुकताच रद्द ठरवला. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या या निर्णयानुसार या प्रकरणातील दोषींना पुन्हा तुरुंगात जावे लागणार आहे. दोषींना दोन आठवड्यात आत्मसमर्पण करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते.