दरवळ: लता गुठे
अशी संक्रांत साजिरी, तिळ-गुळाचा हलवा
हळदी-कुंकवाचे वाण, माझ्या संस्कृतीचा ठेवा!
माझं बालपण ग्रामीण भागातील नगर जिल्ह्यातील एका छोट्याशा गावात गेलं. त्यामुळे ग्रामीण भागातील सण-उत्सव हे माझ्या मनात बालवयात रुजले. त्यापैकीच माझा सर्वात आवडता सण म्हणजे संक्रांत. शेती व्यवसायाशी आणि ऋतुमानाशी निगडित असलेले सण आपण त्या त्या पद्धतीने साजरे करतो. संक्रांत हा सण १४ किंवा १५ जानेवारीला येतो. कारण त्या वेळेत सूर्य मकर राशीत प्रवेश करतो. उत्तरायण सुरू होतं आणि शेत धनधान्याने फळाफुलांनी भरलेले असते. त्यामुळे संक्रांतीला सूर्यपूजेचं विशेष महत्त्व आहे. भारतामध्ये अनेक ठिकाणी अनेक प्रकारे संक्रांत साजरी करतात. दिल्ली आणि हरयाणामध्ये मकर संक्रांतीला ‘सक्रात’, म्हणतात, तर मध्य प्रदेशात ‘सुकरत’ आणि राजस्थानमध्ये ‘सक्रात’ असे म्हटले जाते. काही ठिकाणी जत्रा, मेले भरतात. काही ठिकाणी पतंग उडवून संक्रांत साजरी करतात, तर काही ठिकाणी नाच, गाणे, नृत्य करून संक्रांत साजरी केली जाते. हा सण सूर्यदेवाच्या पूजेला विशेष महत्त्व आहे आणि तिळ आणि गुळापासून वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ बनवून त्याचा नैवेद्य केला जातो. तो सर्वांना वाटून ‘तिळगूळ घ्या, गोड बोला’ असं म्हटलं जातं. ग्रामीण भागामध्ये संक्रांत कशी साजरी केली जाते ती मी आज तुम्हाला सांगणार आहे.
गावात आमचा मोठा चौकाचा चिरेबंदी वाडा होता. वाड्याच्या आजूबाजूला अनेक घरं होती. संक्रांत पुढे चार-आठ दिवस राहिली की, ब्राह्मण संक्रांत सांगायला वाड्यात कधी येणार ते आधी सांगायचा. त्याप्रमाणे गल्लीतल्या बायकांना निरोप गेलेले असायचे. तो शक्यतो संध्याकाळच्या वेळेला यायचा, कारण दिवसभर स्त्रिया शेतात कामाला गेलेल्या असायच्या. दाराच्या समोर मोठा ओटा होता. त्या ओट्यावर आजी मोठी सतरंजी अंथरायला सांगायची. त्यावर भटजीबुवा मांडी घालून बसायचे. मग हळूहळू गल्लीतील बायका जमा व्हायच्या. ब्राह्मणाला देण्यासाठी एका ताटामध्ये तीळ, तांदूळ, गूळ घेऊन त्या यायच्या आणि ओट्यावर सतरंजीच्या बाजूला बसायच्या. मग भटजीबुवा पिशवीतून पंचांग काढायचे आणि संक्रांत कोणती वस्त्र नेसली आहे, कोणत्या दिशेला चालवली आहे, कशावर बसली आहे असं सर्व काही सांगायचे. त्याचप्रमाणे पूजेचा मुहूर्त कधी आणि कोणत्या रंगाचे कपडे स्त्रियांनी त्या दिवशी घालायचे हेही आवर्जून सांगायचे. सर्व बायका मनोभावे संक्रांत ऐकायच्या आणि ब्राह्मणाच्या पाया पडून त्यांना बरोबर आणलेला शिधा द्यायच्या. हे झालं की, त्यांची आपापसात चर्चा चालायची. ‘सुगडं कधी आणायची बाजाराला जाताना मला बोलव गं!’ असं आवर्जून सांगायच्या. बाजाराच्या दिवशी आजीबरोबर मी मुद्दाम बाजाराला जायची, कारण नवीन कपडे, बांगड्या, मेंदी, नेलपेंट, टिकल्याचं पाकीट असं बरंच काही घ्यायचं असायचं.
संक्रांत हा स्त्रियांचा सण समजला जातो. त्यामुळे वर्षातून एकदा प्रत्येक संक्रांतीला आईला आणि काकूला नवीन साडी चोळी गावातील दुकानातून आजी आणायची. कासार बांगड्या घेऊन यायचा नि सर्व बायका संक्रांतीला नवीन चुडा भरायच्या. मग सर्व बायका मिळून शेजारच्या गावी जाऊन कुंभाराकडून मातीची सुगडं आणायची. त्याला संक्रांतीला सुगडंच का म्हणतात? हा मला नेहमी पडलेला प्रश्न. नंतर मला कोणीतरी सांगितलं, सुघटचा अपभ्रंश होऊन सुगड हा शब्द झाला असावा. आधीच सुगडं आणून देवघराच्या ओट्याखाली सांभाळून ठेवायची. सुगड पडून फुटलं की अपशकुन होतो, असा समज असे.
संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगी असल्यामुळे त्या दिवशी त्या ऋतूत येणाऱ्या सर्व भाज्यांची मिक्स भाजी केली जाते. त्यामध्ये तिळ, शेंगदाणे, खोबरं अशा स्निग्ध पदार्थाचाही वापर करतात कारण, संक्रांती हिवाळ्यामध्ये आलेली असते. या ऋतूमध्ये गहू, ज्वारी हुरड्यात आलेली असते. ओला हरभरा, गाभुळलेली बोरं, ऊस, भुईमुगाच्या शेंगा, गाजर, वांगी, वालाच्या शेंगा, पेरू अशी मिक्स भाजी बाजरीच्या तिळ लावलेल्या भाकरी आणि खिचडी हिरव्या मिरचीचा ठेचा हे सर्व पाहूनच तोंडाला पाणी सुटायचं आणि भरपूर ताव मारायचा. संक्रांतीच्या दिवशी सकाळी आई तिळ वाटून त्यामध्ये हळद आणि बेसन मिसळून त्याचे उटणं बनवायची आणि ते अंगाला लावून गरम पाण्याने अंघोळ घालायची. कारण हिवाळ्यात त्वचा कोरडी होते.
सकाळी लवकर काकू आई उठायच्या आणि आम्हाला उठेपर्यंत घरदार झाडून, पुसून स्वच्छ व्हायचं. अंगणभर शेणाचा सडा टाकून त्यावर सूर्याची रांगोळी काढायची. देवघराच्या समोर पाटावर सुगडं ठेवून त्यामध्ये धनधान्याचं प्रतीक म्हणून त्यात हरभरा, गाजर, ऊस, तीळ, शेंगदाणे, बोरं, तिळगूळ हे साहित्य भरलं जायचं. सुगडावर हळदी कुंकाच्या रेषा ओढून ती छान सजवायची आणि धान्याच्या राशीवर ठेवायची. जी धरणी माता वर्षभर शेतामध्ये भरपूर धनधान्य देते तिची कृतज्ञता मानण्यासाठी तिच्या मातीने बनवलेल्या घटाची ही पूजा स्त्रिया अतिशय श्रद्धेने आजही करतात. पुरणपोळीचा स्वयंपाक आटोपून सकाळी दहा-अकराच्या सुमारास गल्लीतील सर्व बायका नवीन लुगडी नेसून हातात एका ताटामध्ये पदराखाली झाकून वाण-ववसा घेऊन मंदिरात जायच्या. मंदिरात पूजा केली की, एकमेकांना हळदीकुंकू लावायच्या आणि गुलालाने भांग भरायच्या. त्यांच्यासाठी हा आनंदाचा सोहळा असायचा. सर्व मंदिरातून जाऊन येईपर्यंत दुपार उलटून जायची, तोपर्यंत त्यांनी अन्नग्रहण केलेले नसायचे.
जात्यावर दळताना आई संक्रांतीच्या ओव्या म्हणायची…
“चिरेबंदी वाड्यात जमल्या आया-बाया
ववसाया निघाल्या नंदेसंगं भावजया…”
वाड्यात चौकाच्या चारही बाजूंनी मोठं मोठ्या खोल्या आणि चौकात मोठे दोन रांजण रोवलेले. पडवीत चुली असायच्या. एकाच वाड्यात तीन-चार कुटुंबं गुण्यागोविंदाने नांदत होती. बाहेर मोठं अंगण आणि वाड्याच्या समोर लांबलचक चिरेबंदी, दगडाने बांधलेला मोठा ओटा होता. यासाठी वर्णन केलं याचं कारण असं, अनेक सणउत्सव त्या अंगणात ओट्यावर साजरे व्हायचे. संक्रांतीच्या दिवशी वाड्यातल्या बायकांची लगबग सुरू असायची. संध्याकाळी हळदीकुंकवाचा कार्यक्रम असायचा. चुलीवर हंडाभर चहाचं आधण ठेवलेलं असायचं. चहा घेताना एकमेकींना म्हणायचं “नाव घ्या गं…” मग लांबलचक उखाणे सुरू व्हायचे ते ऐकताना काय मौज याची म्हणून सांगू…!
ज्या मुलींची लग्न जमलेली असत, त्यांना त्यांच्या सासरकडून नवीन साडी, बांगड्या, मेकअपचे सामान, तिळाचे लाडू अशा प्रकारे भरगच्च सामान यायचं आणि ते पाहण्यासाठी आजूबाजूच्या सर्व बायकांना बोलावलं जायचं. ती एक वेगळीच उत्सुकता असायची. एकमेकींना हळदीकुंकू लावताना त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद ओसंडून वाहायचा. कोणाच्या पायात चांदीची नवीन जोडवी तर कोणाच्या गळ्यात नवीन मंगळसूत्र दिसायचं. नवीन साडी नेसलेल्या बायका लक्ष्मीसारख्या दिसायच्या.
बदलत्या काळाबरोबर ग्रामीण भागातही बरेच बदल झाले असले तरी अजूनही संक्रांत पारंपरिक पद्धतीने साजरी करतात; परंतु गावातील सर्व मंडळी शेतामध्ये वस्तीवर राहायला गेल्यामुळे तो वाड्यातला अनुभव अनुभवायला येत नाही. तरीही बायकांचा उत्साह तोच जाणवतो. अशा प्रकारे संक्रांत आज परत शब्दांकन करताना त्या लहानपणीच्या दिवसांत घेऊन गेली आणि तो सर्व आनंद पुन्हा अनुभवायला मिळाला.