Sunday, March 23, 2025
Homeसाप्ताहिककोलाजएण्टरटेन्मेंट... अेटरटेनमेंट... एंटरटेनमेण्ट...!

एण्टरटेन्मेंट… अेटरटेनमेंट… एंटरटेनमेण्ट…!

विशेष: भालचंद्र कुबल

तीन दिवसांचं शंभरावं नाट्य संमेलन संपलं आणि सर्वसामान्य नाट्य रसिकांना यातून काय मिळालं? याचा विचार करत मी मुंबईत परतलो. ज्यावेळी सभामंडपात प्रवेश करत होतो, तेव्हा रस्त्याच्या दुतर्फा असलेली गर्दी प्रत्येकात सेलिब्रिटी शोधत होती. थोडासा जरी परिचित चेहरा दिसला तरी… “तो बघ… तो बघ…” व्हायचे. गर्दीला त्यांची नावं आठवंत नव्हती; परंतु पडद्यावर दिसलेला चेहरा लाइव्ह बघायला मिळाल्याचे समाधान होतं. गर्दीचे मोबाइल, कॅमेरे सेल्फीसाठी किंवा शूटिंगसाठी चालू होतेच. गर्दी, मोहन जोशींना मोहन आगाशे करत होती, तर सिद्धार्थ जाधवला भरत जाधव…! आणि मग आठवली ती राज ठाकरे यांची याच संमेलनात दीपक करंजीकरांनी घेतलेली मुलाखत. राज ठाकरे म्हणाले होते की, “मराठी नाटक आणि फिल्म इंडस्ट्रीत एकही ‘स्टार’ नाही, जे अन्य सर्व भाषांमध्ये आहेत.” फारच जहरीलं आणि लाज वाटायला लावणारं विधान होतं ते…! परंतु नाईलाजानं खरंही होतं.

१८४३ काय किंवा १९३२ काय मराठी माणसाने सुरू केलेल्या नाटक-सिनेमांचा इतिहास सांगून खरं तर दमायला झालंय. १८० वर्षांच्या या प्रदीर्घ कालावधीमध्ये मराठी नाटक, दर्जा म्हणून कुठेही का असेना, प्रेक्षकांना ते लार्जर दॅन लाइफ का वाटलेलं नाही? मराठी नाटकांचा वार्षिक टर्नओव्हर किती? मराठी नाटकांना हल्ली ‘अच्छे दिन’ आल्याचं बोललं जातंय, पण अच्छे दिन म्हणजे नेमकं काय? यासारखे अनेक प्रश्न डोक्यात नाट्ययात्रा आणि दिंडी संपल्या संपल्याच सुरू झाले.
संमेलनाचा पहिला दिवस ५ जानेवारी, पुणेकरांनी साजरा करायचा ठरल्याने गणेश स्टेडियमला पर्याय नव्हता, शिवाय पुणेकरांसाठी मध्यवर्ती आणि सोयीचे ठिकाण असल्याने सर्व कार्यक्रम एकाच स्थळावर अगदी भोजन व्यवस्थेसह केंद्रित झाले होते. त्यामुळे जरी निमंत्रकांची निवास व्यवस्था पुढील दोन दिवसांसाठी १५/२० किलोमीटरवर असलेल्या पिंपरी-चिंचवडला केली असली तरी एकदा का मुख्य मंडपात पोहोचल्यावर एकाच स्थळी राहण्यावाचून प्रेक्षकांना पर्याय नव्हता.

दुसऱ्या दिवशीच्या पिंपरी-चिंचवडची कार्यक्रम स्थळे मात्र ८ विखुरलेल्या ठिकाणी आणि ४/५ किलोमीटरच्या अंतरावर होती. त्यातही भोजन व्यवस्था अशा जागी ठेवण्यात आली होती की, ट्राफिक जाम झालाच पाहिजे. शिवाय जेवायचे असेल, तर मुकाट्याने झक मारत “सुखी भवनला या…!, तुम्हाला कार्यक्रम स्थळावर जेवण पोहोचवले जाणार नाही.” मग व्हीव्हीआयपींपासून ते हौशी पुणेकरांपर्यंत सगळेच, पंगतीसाठी सुखी भवन शोधताना दिसत होते. मुख्य मंडपापासून सुखी भवन ज्येष्ठांसाठी नक्कीच गैरसोयीचे होते. त्यामुळे गाड्या, रिक्षा, दुचाक्या आणि बसेस बिचाऱ्या येत्या-जात्या पुणेकरांना असह्य करीत होत्या. त्यामुळे प्रत्येक घासामागे शिव्याशाप खाण्याचे भाग्यही निमंत्रितांच्या वाट्याला आले.

बालसाहित्य किंवा शाळकरी वृत्तांताप्रमाणे हा वृत्तांत प्रकाशित करायलाच हवा होता का? असे बाह्या सरसावत या लेखाबाबत पुणेकर विचारायला पुढे येतीलही; परंतु १००व्या अर्धविजयी संमेलनाच्या अर्ध अपयशाची कारणमीमांसा होणे अत्यंत गरजेचे आहे. कारण सर्वाधिक नाट्य संमेलने आयोजित करण्याचा अनुभव केवळ पुणेकरांना आहे. या निकषावर जर अखिल भारतीय नाट्य परिषदेने ही जबाबदारी पुणे आणि पिंपरी-चिंचवड शाखेवर टाकणे चुकीचे नव्हतेच. त्यामुळे अनुभवी संघाने माती खाल्ल्यावर जे ऐकू येते, तेच पिंपरी-चिंचवड शाखेला ऐकावे लागणार आहे.

तसं पाहायला गेलं, तर सर्व रंगमंचावरील सर्वच कार्यक्रम सुंदर सादर झाले; परंतु त्याचे श्रेय आयोजकांनी घेतले आणि व्यवस्थेचा बोजवारा उडाला. कार्यक्रम संपल्यावर तुम्ही जर आयोजकांपैकी कुणालाही विचारले असते की, “अहो मला मुख्य मंडपात जायची किंवा जेवायला जायची काही सोय आहे का?” उत्तर यायचे, “ते राहू द्या हो, कार्यक्रम कसा झाला ते सांगा…!” संमेलनास आलेल्यांचे दोन दिवसांत अक्षरशः हजारो रुपये प्रवासासाठी लुटले गेले. काही ठिकाणांहून तर लोकांना दीड-दोनशे रुपये खर्च करून तेलकट जैन भोजनासाठी यावे लागले. म्हणजे एखादी पर्टिक्युलर सोय का नाही? हे विचारणेच अतर्क्य असल्याची जाणीव आयोजक करून देत होते, नव्हे तो एक छुपा अजेंडा असावा, हे सिद्ध करत होते. ६ तारखेला गंमतच झाली. दुपारच्या जेवणाला आम्ही पत्रकार थोडे वेळे अगोदरच भोजनकक्षी पोहोचलो.

अभानापच्या पिंपरी-चिंचवड शाखेचे कार्याध्यक्ष राजेशकुमार साकला आणि त्यांचे सहकारी, भोजन व्यवस्थेची पाहणी करण्यासाठी जमले होते. आम्हाला अगत्याने जेवणाच्या क्वालिटीबाबत विचारण्यात आले. जेवण कसेही असले तरी नावं का ठेवा? आम्ही छान आहे म्हटले, पण तितक्यात आमच्यापैकी एका वरिष्ठ पत्रकाराने ताकाची मागणी केली. साकला साहेबांनी इकडे-तिकडे पाहत दुसऱ्या हाॅलमध्ये चाललेल्या लग्नातले ताक आमच्यासाठी मागवले. त्यांच्या तत्परतेचे कौतुक करत आम्ही ताक ग्लास ग्लास भरून प्यायलो आणि ही कार्यकारिणी पुढील दोन दिवस आपली अशीच काळजी घेणार या अपेक्षेने भरून पावलो. या प्रसंगाची “ताक आणि टाक” नामक चौकट दुसऱ्या दिवशीच्या वर्तमानपत्रात छापूनही आली. त्यामुळे कार्यकारिणीदेखील कृतकृत्य झाली… आणि कार्यक्रम सुरू झाले.

यंदाच्या संमेलनात सर्व भर मनोरंजक कार्यक्रमांवर देण्यात आला होता. प्रत्येक नगरीत आणि थिएटरवर सध्या सुरू असलेल्या व्यावसायिक, प्रायोगिक व बालनाट्यांचे प्रयोग सुरू होते. शिवाय प्रयोग विनामूल्य असल्याने प्रत्येक थिएटर हाऊसफुल्ल होते. नाही म्हणायला दोन परिसंवाद झाले. पहिला पुण्यातील गणेश स्टेडियमवर व दुसरा विष्णुदास भावे मंडपात. पहिल्या परिसंवादाचा विषय होता, ‘नाटक माझ्या चष्म्यातून’. उल्हासदादा पवार, श्रीनिवास पाटील, तृप्ती देसाई यांच्यासारखी राजकीय मंडळी संवादक रमेश दामले यांच्या प्रश्नाला बगल देऊन भलतेच बोलत होती. त्यामुळे चष्मे राहिले बाजूला आणि नाटकाबाबत सर्वसाधारण सामान्य माणसांची मतेच ऐकावी लागत होती. तीच गत दुसऱ्या दिवशीच्या ‘आर्टिफिशिअल इंटेलिजन्समुळे नाट्यक्षेत्रावर व कलाक्षेत्रावर होणारा परिणाम’ या विषयावरील परिसंवादाची. सुनील बर्वे, नीरज शिरवईकर व विजय केंकरे यांना बोलते केले अजित भुरे यांनी. विजय केंकरेंमुळे निदान ही चर्चा सुसह्य झाली. तरी या विषयाचा अजिबात अभ्यास न करता तिघेही वेळ मारून नेत होते.

आर्टिफिशिअल इंटेलिजन्स आणि कलाक्षेत्र किंवा नाट्यक्षेत्रावर तुम्ही जेव्हा बोलायला लागता, तेव्हा त्याचा कॅनव्हास आणि आवाका किती मोठा आहे, याचा विचारच झाला नाही. शेवटी नाटक ही अभिव्यक्ती असून त्याचे सादरीकरण जिवंत असल्याने ए.आय.चा या माध्यमावर काहीही परिणाम होणार नाही, या सकारात्मक भरतवाक्याने सांगता झाली. बौद्धिक भूक भागविणारे एवढे दोनच इंटर्व्हल नाट्यकर्मींच्या वाट्याला आले, पैकी पुण्याचा परिसंवाद तर का घेतला गेला? याचे उत्तर बहुधा आयोजकही शोधत असतील. लोकांचा सहभाग अपेक्षित असेल, तर व्हरायटी ‘एंटरटेन्मेंट’ असलीच पाहिजे हा एकदा माइंडसेट तयार झाला की, संमेलनाचे स्वरूप महोत्सवी कसे होते, याचे हे उत्तम उदाहरण होते.

बाकी दोन यात्रा, दोन उद्घाटने आणि एक हस्तांतरण कार्यक्रमांचा औपचारिकपणा राजकीय पटलाला साजेसा होता. ९९व्या संमेलनाचे मावळते अध्यक्ष प्रेमानंद गज्वींनी ५ वर्षांचा पदभार डाॅ. जब्बार पटेलांवर सोपवला आणि ९ कोटी कितीतरी लाख देऊन सुद्धा नाटकवाल्यांच्या वतीने “भाकर वाढा गे माय…!”चा प्रयोग सुरू झाला. गज्वींनी मांडलेल्या मागण्या अभामनापने मान्य केल्या असल्याने त्यांच्या भाषणातून अजून काही नव्या मागण्या समोर आल्या. मग डाॅ. जब्बार पटेलांची उत्स्फूर्त भाषणाची पाळी होती. नाट्य प्रशिक्षणाच्या मुद्द्यावर केलेल्या मागण्या मुख्यमंत्री कशा पुऱ्या करू शकतील? हा प्रश्नच आहे. दुसऱ्या दिवशीच्या भाषणात प्रशांत दामले यांनी अध्यक्ष झाल्यावर “मला मुख्यमंत्री झाल्यासारखं वाटतंय” असं विनोदी विधान केलं होतं, डाॅ. जब्बार पटेलांच्या मागण्या ऐकून मुख्यमंत्र्यांना विद्यापीठाचा कुलगुरू झाल्यासारखं नक्कीच वाटलं असेल. १००व्या संमेलनाच्या निमित्ताने राज्यात मे २०२४ पर्यंत ५ विभागीय संमेलने घेण्यात येणार आहेत. त्यासाठीचा हस्तांतरण सोहळा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी टोमण्यांना टोमणे मारून गाजवला. भाषणातील विधाने माध्यमातून कशी गाजतील आणि विरोधकांच्या कशी जिव्हारी लागतील याची स्क्रिप्ट उपमुख्यमंत्र्यांनी सांस्कृतिक कार्यमंत्र्यांच्या साथीने टाळ्या मिळवून गेली. एकंदरीत इथेही ‘अेंटरटेनमेण्ट’चाच प्रयोग पाहावा लागला.

अनेक बाबींचा संमेलन आयोजकांनी न केलेला विचार या सोहळ्याला पूर्ण यशाकडे नेऊ शकला नाही. ते यश अर्धेच राहिले. बऱ्याच कलाकारांची निवास व्यवस्था, वाहतूक व्यवस्था, शिष्टाचार व्यवस्था, माहिती आणि जनसंपर्क विभाग आपापल्या कार्यात अपयशी ठरले. “बग्ज स्टाॅप्स हिअर…!” या उक्तीचा प्रत्यय भाऊसाहेब भोईर आणि त्यांच्या टीमला शेवटपर्यंत देता आला नाही. शिवाय “टीका ही होतच राहणार हो… आपण आपलं काम करायचं…!” असं चुका नजरेआड करण्याचं समीकरण पुण्यातल्या राजकारण्यांना व्यवस्थित जमतं. झालेल्या चुकांचे सिंहावलोकन संमेलनाचे आयोजक करणार नाहीत, हे गृहीत धरलेच आहे. मात्र पुढच्यास ठेच लागलीय, तर मागच्याने तरी शहाणं व्हावं हीच पुढल्या महिन्यात होणाऱ्या विभागीय नाट्य संमेलनाकडून अपेक्षा…!

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -