मायभाषा: डॉ. वीणा सानेकर
नव्या पिढीपर्यंत साहित्य पोहोचवणे हे मोठे आव्हान आहे. त्याकरिता विविध प्रयोग करत राहणे गरजेचे आहे. काव्यगंध या कार्यक्रमाच्या माध्यमातून सोमैया संकुलातील विद्यार्थ्यांना कवी, गीतकार, पटकथालेखक, ग. दि. माडगूळकर व त्यांचे साहित्य मुलांपर्यंत पोहोचले. मुलांनी कवितावाचन केले. गीतांचे सादरीकरण केले. निवेदनाची संहिता तयार केली. मुले गदिमांचे अक्षरसाहित्य जगली. समजण्यास अत्यंत सहजसोपी शैली हे गदिमांचे वैशिष्ट्य. भक्तिगीतं, भावगीतं, लावणी अशी विविध प्रकारची गीते रचणारे गदिमा शीघ्रकवी होते. त्यांचे गीतरामायण महाकाव्य म्हणून सर्वदूर पोहोचले. गीतरामायणाचे अनुवादही झाले.
“स्वये श्रीरामप्रभू ऐकती, कुशलव रामायण गाती” या शब्दांनी सर्वांना मोहून टाकले. गदिमा हे मोठेे कवी यात शंकाच नाही. ‘ज्योतीने तेजाची आरती’ ही ओळ या ताकदीतूनच जन्माला आली. सांगोला आटपाडी रस्त्यावरील छोटे टुमदार गाव म्हणजे माडगुळे. स्वातंत्र्यलढ्यात या गावाचे योगदान महत्त्वाचे होते. क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या चळवळीतील क्रांतिकारकांना या गावाने आश्रय दिला. स्वातंत्र्यापूर्वी हे गाव औंध संस्थानाचा भाग होते. औंधचे संस्थानिक पंतप्रतिनिधी यांच्या आठवणी या गावाने जपल्या होत्या. गदिमा यांनी लिहिलेल्या ‘दो आँखे बारह हाथ’ या चित्रपटाच्या पटकथेची इथे आठवण होते. १९५७मध्ये हा चित्रपट प्रदर्शित झाला. ही कथा औंधच्या पंतप्रतिनिधींनी कैद्यांच्या हृदयपरिवर्तनाबाबत केलल्या खुल्या कारागृहाच्या प्रयोगावर आधारित होती. ‘प्यासा’ या गुरुदत्तच्या चित्रपटाची कथादेखील गदिमांची होती. हे दोनच संदर्भ त्यांच्या संवेदनशीलतेची जातकुळी स्पष्ट करते. मानवी मूल्यांवरची दृढ श्रद्धा त्यांच्या लेखनातून स्पष्ट होते.
घटाघटाचे रूप आगळे
प्रत्येकाचे दैव वेगळे
तुझ्याविना ते कोणा न कळे…
किंवा
पोटापुरता पसा पाहिजे नको पिकाया पोळी
देणाऱ्याचे हात हजारो दुबळी माझी झोळी…
यासारख्या ओळी याचे उत्तम उदाहरण आहेत.
पु. ल. देशपांडे यांनी असे म्हटले आहे, “माडगूळकरांनी लावलेल्या साहित्याच्या मळ्यात मी मनसोक्त हिंडलो आहे. माडगूळकरांनी मराठी भाषेला अस्सल देशीकार लेणी चढवली.” पुलंसारख्या चोखंदळ लेखकाने हे उद्गार काढावे, यात गदिमांचे मोठेपण निश्चित आहे. कविता ही प्रथम स्तरावर नि गीत दुय्यम ही धारणा जपणारा समाज, हे गदिमांचे दु:ख होते. गदिमांना ही वेदना व्यथित करत रााहिली. ‘आधुनिक वाल्मिकी’ म्हणून त्यांचा गौरव केला गेला, पण तरी गीतकार म्हणून प्रामुख्याने गदिमा परिचित झाले. १९७७ साली गदिमांचे निधन झाले. त्यानंतर आज इतकी वर्षे झाली. पण आजही जेव्हा एखादा समीक्षक ताशेरे ओढतो की, गदिमा हे गीतकार होते नि कवी म्हणून ते मोठे नव्हते, तेव्हा वाईट वाटते. गीत म्हणजे कविता नसते? आपल्या डोक्यातल्या या चौकटी केव्हा निखळणार आहेत?