
कसं असेल आजचं हवामान?
मुंबई : गेल्या काही दिवसांत ऐन हिवाळ्याच्या मोसमांत देशभरात (Winter) काही ठिकाणी अवकाळी पावसाची (Unseasonal Rain) हजेरी पाहायला मिळाली होती. दक्षिणेकडील राज्यांत तर पावसाने हाहाकार माजवला. तर महाराष्ट्रात देखील कोकणात अवकाळी पावसामुळे आंबा, काजूसराख्या पिकांचे नुकसान झाले. त्यामुळे शेतकरी पुन्हा एकदा चिंतेत सापडला होता. मात्र, भारतीय हवामान विभागाने (IMD) दिलेल्या माहितीनुसार, राज्यासह देशातील नागरिकांना अवकाळी पाऊस आणि थंडीपासून दिलासा मिळणार आहे.
अरबी समुद्रात तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्र आणि वेस्टर्न डिस्टबर्न्सचा परिणाम देशातील हवामानावर पाहायला मिळणार आहे. आता देशातून थंडीचा जोर कमी होणार आहे. गारठलेल्या उत्तरेकडील नागरिकांना थंडीपासून दिलासा मिळणार आहे, तर दक्षिणेकडील तामिळनाडू आणि लक्षद्वीपमध्ये हलक्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
उत्तरेकडे कसं असेल आजचं हवामान?
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, उत्तरेकडील राज्यांत पुढील ६ ते ७ दिवस तापमानात किंचित वाढ पाहायला मिळेल. आजपासून दिल्लीसह उत्तर प्रदेशमध्ये तापमान २० अंशांवर जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यानंतर तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. असं असलं तरी, पहाटे आणि रात्री थंडीचा प्रभाव दिसून येईल. पर्वतीय भागातील कमी बर्फवृष्टीमुळे यावेळी हिवाळा जास्त काळ टिकणार नाही, असंही आयएमडीने म्हटलं आहे.
मात्र, हवामान खात्याने थंड वातावरणात उत्तर भारतात दाट धुक्याचा इशारा जारी केला आहे. आज आकाश निरभ्र असेल, सकाळी हलके धुके असेल. दुपारनंतर अंशत: ढगाळ वातावरण असेल. हवामान खात्याच्या माहितीनुसार, आतापासून उत्तर-पश्चिम भारतात थंडीचे दिवस आणि कडक थंडीचे प्रमाण कमी होणार आहे. पुढील चार ते पाच दिवस सकाळी आणि रात्री दाट धुके कायम राहण्याची शक्यता आहे.
दक्षिणेकडे पावसाची शक्यता
देशाच्या बहुतांश भागात कोरडं वातावरण राहणार असून हवामानात फारसा बदल होणार नाही. काही भाग वगळता जवळपास संपूर्ण देशात कोरडे हवामान राहील. काही ठिकाणी थंडी, धुके, काही ठिकाणी दंव आणि अंशतः ढगाळ आकाश राहील. आज दक्षिण तामिळनाडू आणि लक्षद्वीपमध्ये काही ठिकाणी हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे.
आजचं हवामान कसं असेल?
उत्तर राजस्थानमध्ये सकाळी काही ठिकाणी दाट धुके पडण्याची शक्यता आहे. पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, आसाम, मेघालय, मिझोराम, त्रिपुरा, जम्मू विभाग, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, उत्तर मध्य प्रदेश, ओडिशा, बिहार, पश्चिम बंगाल आणि सिक्कीममध्ये काही ठिकाणी दाट धुके पडू शकते. पंजाब, उत्तर प्रदेश आणि राजस्थानमध्ये काही ठिकाणी थंडीची शक्यता आहे