Wednesday, April 23, 2025
Homeताज्या घडामोडीएसटी महामंडळ ११ ते २५ जानेवारी दरम्यान "सुरक्षितता अभियान" राबविणार!

एसटी महामंडळ ११ ते २५ जानेवारी दरम्यान “सुरक्षितता अभियान” राबविणार!

मुंबई : दरवर्षीप्रमाणे नवीन वर्षाच्या सुरूवातीला एसटी महामंडळ सुरक्षित प्रवासाच्या दृष्टीने एसटी कर्मचाऱ्यांमध्ये जाणीव जागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने सुरक्षितता अभियान राबविते. यंदा हे अभियान एसटीच्या मध्यवर्ती कार्यालयापासून सर्व आगार पातळीवर एकाच वेळी ११ जानेवारी ते २५ जानेवारी दरम्यान राबविण्यात येत आहे.

रस्ते वाहतूकीमध्ये सुरक्षित प्रवासाला अनन्य साधारण महत्व आहे. गेल्या ७५ वर्षात “सुरक्षित प्रवास” हा एसटी महामंडळाचा मुख्य हेतू राहिलेला आहे. त्यामुळे एसटीने सर्वसामान्य प्रवाशांच्या मनामध्ये विश्वासार्हतेची व सुरक्षित प्रवास होणार ही भावना निर्माण केली आहे. वर्षभर अपघात टाळण्यासाठी प्रशिक्षण, प्रबोधन, विविध वैद्यकीय चाचण्या अशा विविध उपक्रमातून एसटीच्या चालकांना विनाअपघात बस चालविण्याचे प्रोत्साहन दिले जाते. या बरोबरच ०५ वर्ष, १० वर्ष, १५ वर्ष विनाअपघात एसटी बस चालविणाऱ्या चालकांचा यथोचित सत्कार केला जातो. तसेच २५ वर्ष पेक्षा जास्त विनाअपघात एसटी बस चालविणाऱ्या चालकांचा रु.२५ हजाराचा धनादेश, प्रमाणपत्र, स्मृतीचिन्ह देऊन सपत्नीक सत्कार केला जातो.

अपघात टाळण्यामध्ये चालक हा महत्वाचा घटक असला तरी, प्रवासात त्याला सहकार्य करणारा वाहक व यांत्रीकदृष्टया सुस्थितीतील बस पुरविणाऱे यांत्रीक कर्मचारी हे घटक देखील तितकेच महत्वाचे असतात, हे लक्षात घेऊन एसटी महामंडळाचे यांत्रीक कर्मचारी व वाहक यांचे देखील चालकांप्रमाणे वेळोवेळी प्रशिक्षण व प्रबोधन केले जाते. म्हणून गेली कित्येक वर्ष रस्त्यावरील इतर खाजगी वाहनाच्या तुलनेत एसटीच्या अपघातांची संख्या अत्यंत कमी आहे.

या सुरक्षितता अभियानाच्या माध्यमातून यंदा देखील चालकांबरोबर यांत्रीक कर्मचारी व वाहक यांना देखील अपघात विरहित सेवेसाठी प्रोत्साहीत केले जाणार आहे. या बरोबरच पुर्ण वर्षभरात प्रवाशांना सुरक्षित प्रवास घडविण्याचे “अभिवचन” एसटी महामंडळ देत आहे. या अभियानाची सुरूवात दि. ११ जानेवारी रोजी सकाळी ११:३० वाजता मुंबई सेंट्रल येथे एसटी महामंडळाचे नुतन उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर यांच्या ‍उपस्थितीत महाराष्ट्र पोलीस महासंचालक कार्यालयाचे अरविंद साळवे, पोलीस अधिक्षक (वाहतूक) यांच्या ‍हस्ते होणार असल्याचे एस.टी. महामंडळाचे जनसंपर्क अधिकारी अभिजीत भोसले यांनी सांगितले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -