नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मंगळवारी भूतानमध्ये निवडणूक जिंकल्याबद्दल शेरिंग तोबगे आणि पीपुल्स डेमोक्रेटिक पक्षाचे अभिनंदन केले. पंतप्रधान मोदी म्हणाले, ते दोन्ही देश(भारत-भूतान) यांच्यातील मैत्री आणि सहकार्याच्या अनोख्या संबंधांना अधिक मजबूत करण्यासाठी पुन्हा एकत्र मिळून काम करण्यास उत्सुक आहेत.
खरंतर, भूतानमध्ये मंगळवारी झालेल्या निवडणुकीत पीपुल्स डेमोक्रेटिक पक्षाने बहुमत मिळवले आहे. माजी पंतप्रधान शेरिंग तोबगे यांच्या पक्षाने या निवडणुकीत दोन तृतीयांश जागांसह निवडणुकीत विजय मिळवला. तर भूतान टेंड्रेल पक्षाने बाकी सतरा जागांवर विजय मिळवला.
भूतान ब्रॉडकास्टिंग सर्व्हिसनुसार पीडीपीने ४७ नॅशनल असेंबली जागांपैकी ३० जागा जिंकल्या आहेत. भूतान टेंड्रेल पक्षाने १७ जागा मिळवल्या आहेत. सोबतच तोबगे दुसऱ्यांदा भूतानचे पंतप्रधान बनत आहेत.
पंतप्रधान मोदींनी सोशल मीडियावर म्हटले, भूतानमध्ये निवडणुकीत विजय मिळवल्याबद्दल माझे मित्र शेरिंग तोबगे आणि पीपुल्स डेमोक्रेटिक पक्षाचे हार्दिक अभिनंदन. मैत्री आणि सहकार्याच्या आमच्या अनोख्या नात्याला अधिक मजबूत करण्यासाठी पुन्हा एकदा काम करण्यास उत्सुक आहोत.