
गडचिरोली जिल्ह्याला पुढील वर्षासाठी ५०० कोटी रुपये मंजूर; जिल्ह्याचा होणार विकास
गडचिरोली जिल्हा नियोजनाच्या बैठकीत देवेंद्र फडणवीस यांनी दिली माहिती
नागपूर : राज्यांतील धार्मिक स्थळांवर होणारे अतिक्रमण हा एक गंभीर विषय आहे. भाजपा आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी अनेकदा हा विषय सरकारच्या निदर्शनास आणून दिला आहे. तसेच अशी कृत्ये करणाऱ्यांच्या विरोधात कठोर भूमिकाही घेतली आहे. या अतिक्रमणांबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी काल भाष्य केले. राज्यातील ऐतिहासिक आणि धार्मिक (Historical and religious places) स्थळांवरील अतिक्रमण टप्प्याटप्प्याने हटविले जाईल, असं ते म्हणाले. काल फडणवीस यांनी नागपूर विभागीय आयुक्त कार्यालयात गडचिरोली जिल्हा नियोजनाच्या घेतलेल्या बैठकीत पत्रकारांशी बोलताना ही माहिती दिली.
कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्यातील पन्हाळगडाला लागून असलेल्या पवनगडावरील अतिक्रमण हटविण्यात आले आहे. याबाबत फडणवीस यांना विचारले असता ते म्हणाले की, राज्यातील सर्व ऐतिहासिक किंवा धार्मिक स्थळांवरील अतिक्रमणे टप्प्याटप्प्याने हटवली जातील.
गडचिरोली जिल्ह्याचा करणार विकास
गडचिरोली (Gadchiroli) जिल्हा हा आदिवासीबहुल आहे. शासनाकडून तेथे विविध उद्योग सुरू करण्यात आले आहेत. हा जिल्हा आता औद्योगिक केंद्र बनण्याच्या विचारात आहे. हे लक्षात घेऊन या जिल्ह्यासाठी जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून देण्याचा राज्य शासनाचा प्रयत्न असेल. गडचिरोली जिल्ह्यात विमानतळ सुरू करण्याचा प्रयत्न आहे. त्या ठिकाणी सर्वेक्षण पूर्ण झाले आहे, असं त्यांनी सांगितलं.
ते पुढे म्हणाले की, भूसंपादनाचे काम लवकरच सुरू होणार आहे. या जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयही सुरू करण्यात येणार आहे. आम्ही जून २०२४ पासून तेथे प्रवेश कसा सुरू करता येईल याचा प्रयत्न करणार आहोत. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत वनविभागाच्या जमिनीसंदर्भातील प्रश्नांवर चर्चा करून सोडवण्यात आली. तसेच विद्युत विभागाच्या समस्यांवरही चर्चा करण्यात आली. गतवर्षीच्या जिल्हा निधीपैकी ९९ टक्के निधी खर्च झाला आहे. चालू वर्षातील ६० टक्के खर्च आधीच पूर्ण झाला आहे. उर्वरित खर्च पुढील टक्केवारीत असेल. गडचिरोली जिल्ह्याला पुढील वर्षासाठी ५०० कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. या जिल्ह्याच्या विकासासाठी अधिकाधिक निधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जाईल. कोंडसरी प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचे काम लवकरच सुरू होणार असून २० हजार कोटी रुपयांच्या दुसऱ्या प्रकल्पाची पायाभरणीही होणार असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.