अजितदादांची अमोल कोल्हेंवर नाव न घेता टीका
मुंबई : शिरुर लोकसभा मतदारसंघाचे खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनी राष्ट्रवादीत फूट (NCP split) पडल्यानंतर शरद पवार (Sharad Pawar) यांची साथ दिली. त्यांना काहीच दिवसांपूर्वी लोकसभेतून निलंबित (Suspended from Loksabha) करण्यात आलं. अमोल कोल्हे हे एक अभिनेतेदेखील (Actor) आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी आज अमोल कोल्हेंवर नाव न घेता टीका केली. ‘त्यांच्याविरोधात उभा केलेला उमेदवार आम्ही निवडून आणणारच’, असा विश्वास अजितदादांनी अमोल कोल्हें विरुद्ध व्यक्त केला आहे.
अजितदादा म्हणाले, एक खासदार एक दीड वर्षापूर्वी माझ्याकडे आला होता की मला राजीनामा द्यायचा आहे. त्या खासदाराला उमेदवारी कोणी दिली? त्या खासदाराला निवडून आणण्यासाठी जिवाचं रान मी आणि दिलीप वळसे पाटलांनी केलं आहे. त्या खासदाराला आणि आम्हाला खासगीत समोरासमोर बोलवा. आता त्याचं सगळं चालू आहे, मात्र मधल्या काळात ते सहाही विधानसभा मतदारसंघात फिरत नव्हते. त्यांनी पूर्णपणे दुर्लक्ष केलं होतं.
पुढे अजितदादा म्हणाले, त्यांनी मला आणि त्यावेळच्या आमच्या वरिष्ठांनाही सांगितलं होतं की मी राजीनामा देत आहे. मी एक कलावंत आहे, माझ्या सिनेमावर परिणाम व्हायला लागला आहे. मी काढलेला एक सिनेमा शिवाजी महाराजांवर असूनही तो चालला नाही. माझ्या एकंदर प्रपंचावर आणि आर्थिक गोष्टींवर याचा परिणाम होत आहे, असंही ते म्हणाले होते. मी हे कधी बोलणार नव्हतो, परंतु त्यांना आता उत्साह आला आहे. निवडणुका आल्या आहेत ना जवळ त्याच्यामुळे कोणाला एकेक पदयात्रा तर कोणाला संघर्षायात्रा सुचतेय. हे चालायचंच”, असं अजित पवार म्हणाले.
“उमेदवारी देत असताना योग्य पद्धतीनं उमेदवारी दिलेली होती. ते वक्ते उत्तम आहेत, वत्कृत्त्व चांगलं आहे, उत्तम कलाकार आहेत, संभाजी महाराजांची भूमिका उत्तम साकारली होती. महाराष्ट्रातील जनतेला त्यांच्या भूमिकेनं खिळवून ठेवण्याचं काम त्यांनी केलेलं. पण काळजी करू नका, त्यांच्याविरोधात दिलेला उमेदवार, मी आज सांगतो की, निवडून आणून दाखवेन.”, असं अजित पवार म्हणाले.
अजित पवार उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेत असताना अमोल कोल्हे त्या ठिकाणी उपस्थित होते. मात्र, त्यावेळी आता नेमकं काय होणार आहे याची आपल्याला कल्पना नसल्याचं त्यांनी सांगितलं होतं. शपथविधी पार पडल्यावर त्यांनी शरद पवारांसोबत असल्याची त्यांची भूमिका जाहीर केली.