सगळं होतं पूर्वनियोजित
मुंबई : येत्या जानेवारी महिन्यात भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत (India Vs South Africa Test series) सामील झाला आहे. यात भारताचा स्टार खेळाडू विराट कोहली (Virat Kohli) देखील खेळणार आहे. मात्र, काही दिवसांपूर्वी त्याला कौटुंबिक आपत्तीजन्य परिस्थितीमुळे (Family Emergency) तातडीने भारतात यावे लागल्याचे वृत्त माध्यमांतून प्रसारित करण्यात आले होते. या कारणास्तव तो तीन दिवसीय संघांतर्गत सामनाही खेळला नाही. मात्र विराट मायदेशी परतलाच नाही. तो नेमका कुठे गेला होता याबाबत आता मोठा खुलासा झाला आहे.
विराट कोहली ज्या कारणासाठी संघांतर्गत सामने खेळला नाही ते कारण पूर्वनियोजित होतं आणि बीसीसीआयलाही (BCCI) याबद्दल कल्पना होती. विराट कौटुंबिक कारणामुळे नव्हे तर पूर्वनियोजित अशा लंडन ट्रीपसाठी (London Trip) गेला होता. शिवाय कोहलीने दक्षिण आफ्रिकेतून लंडनला रवाना होण्यापूर्वी तीन दिवस संघासोबत सराव केला होता आणि आता बॉक्सिंग डे कसोटीपूर्वी तो संघात सामीलही झाला आहे. त्यामुळे भारतासाठी यात धक्क्याचं काहीही कारण नाही.
विराट कोहली १५ डिसेंबरला दक्षिण आफ्रिकेसाठी भारतातून रवाना झाला. तो पुढील तीन दिवस संघासोबत होता आणि १९ डिसेंबर रोजी लंडनला रवाना झाला. बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, “विराट कोहली संघांतर्गत सामने खेळणार नव्हता. संघ व्यवस्थापनाला त्याच्या योजना आणि वेळापत्रकाची माहिती होती आणि हे काही एका रात्रीत घडलेले किंवा काही कौटुंबिक परिस्थितीमुळे घडलेले नाही. आपण ज्या खेळाडूबद्दल बोलत आहोत तो विराट कोहली आहे. जेव्हा या गोष्टींचा विचार केला जातो, तेव्हा सर्वकाही नियोजित होते आणि त्याचा लंडनचा प्रवास पूर्वनियोजित होता.
रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखालील भारतीय संघ २४ डिसेंबर रोजी सकाळचे प्रशिक्षण सत्र आणि दोन सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या कसोटीपूर्वी २५ डिसेंबर रोजी दुपारचे सत्र घेईल. यानंतर संघ ३१ डिसेंबरला केपटाऊनला रवाना होईल आणि ३ जानेवारीपासून न्यूलँड्स येथे सुरू होणाऱ्या दुसऱ्या कसोटीसाठी तयारी सुरू करेल.