Wednesday, January 15, 2025
Homeसंपादकीयअग्रलेखउपराष्ट्रपतींचा अपमान ही तर लोकशाहीची विटंबना

उपराष्ट्रपतींचा अपमान ही तर लोकशाहीची विटंबना

जगातील सर्वांधिक मोठे लोकशाही राष्ट्र म्हणून आपल्या देशाचा उल्लेख होत असल्याने आपणच आपली पाठ थोपटून घेत असतो. सभागृह मग ते ग्रामपंचायतीचे असो अथवा राज्यसभा- लोकसभेचे असो. सभागृहाचा वापर विकासासाठी, जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी आणि जनतेला सुविधा मिळवून देण्यासाठी करायचा असतो. सभागृह चालविण्याची जबाबदारी ही सत्ताधाऱ्यांची आणि तितकीच विरोधकांचीही असते. सभागृहाचा मान-सन्मान टिकविण्याची, गौरव वाढविण्याची जबाबदारीदेखील सभागृहातील सर्वांचीच असते. पण अलीकडच्या काळात सभागृहात गोंधळ घालून प्रसिद्धी माध्यमांचा फोकस आपणाकडे वळवून प्रसिद्धी मिळविण्याची अपप्रवृत्ती लोकप्रतिनिधींमध्ये वाढीस लागली आहे. पूर्वीच्या काळात लोकसभा-राज्यसभा, त्या त्या राज्याची विधानसभा, विधान परिषदेची अधिवेशने जनतेमध्ये जिव्हाळ्याचा विषय असायची. सभागृहात काय विषय झाले, सभागृहात कोणते निर्णय झाले, विरोधकांनी कोणत्या विषयावरून सरकारला कोंडीत पकडले. सभागृहाचे कामकाज सुरू झाल्यापासून ते सभागृहातील अधिवेशन कामकाजाचे सूप वाजेपर्यंत लोकांच्या नजरा कामकाजावर खिळलेल्या असायच्या. पण अलीकडच्या काळात तसा प्रकार राहिलेला नाही.

गोंधळ घालणे, सभागृहाचे कामकाज चालू न देणे, घोषणाबाजी करणे, चिखलफेक करणे, आरोप करणे याच घडामोडी वाढत चालल्या आहेत. मुळात सभागृहाचा वेळ मौल्यवान असतो, याचे भानच लोकप्रतिनिधींना राहिलेले नाही, आपल्या देशाच्या लोकशाहीची एक शोकांतिकाच मानावी लागेल. सभागृहात कामकाज होणे गरजेचे आहे. अधिवेशन कालावधीत निर्णय घेता आले पाहिजेत. समस्या आणि सुविधा यावरही विचारमंथन झाले पाहिजे, याचे गांभीर्यही लोकप्रतिनिधींना समजत नाही. त्यामुळे अधिवेशन काळात केवळ गोंधळ, सभात्याग, कामकाजावर बहिष्कार, निलंबन यापुरतेच अधिवेशनाचे कामकाज दुर्दैवाने सीमित राहिले आहे.

सध्या सुरू असलेल्या संसदेच्या अधिवेशनादरम्यान लोकसभा आणि राज्यसभा कामकाजात विरोधी पक्षांच्या खासदारांनी गोंधळ घातल्याने कामकाज चालविण्यासाठी आणि सभागृहातील कामकाजातील गदारोळ, घोषणाबाजी याला आळा घालण्यासाठी पिठासीन अधिकाऱ्यांना गोंधळी खासदारांना निलंबित करण्यात आले. या अधिवेशनात लोकसभा आणि राज्यसभा मिळून जवळपास १४६ खासदारांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली. अर्थांत शाळेतील उनाड मुलांना शिक्षक शिक्षा देतात, तसाच लोकशाहीमध्ये सभागृहात गोंधळ घालणाऱ्या, कामकाजात अडथळे आणणाऱ्या लोकप्रतिनिधींना काही काळाकरिता निलंबित केले जाते. हा प्रकार १९५२ ला सभागृह अस्तित्वात आल्यापासून सुरू आहे. अधिवेशनात इतक्या मोठ्या संख्येने लोकप्रतिनिधींना निलंबित करावे लागले, याचा अर्थ या लोकप्रतिनिधींच्या गोंधळाची कल्पना यावी. देशातील जनतेने त्यांना गोंधळ घालण्यासाठी पाठविले आहे का, याचाही विचार राज्यांतील त्या त्या मतदारसंघातील जनतेने आता करावयास हवा. अधिवेशनात लोकसभा कामकाजदरम्यान सभागृहाच्या प्रेक्षक गॅलरीतून काही युवकांनी केलेल्या कृत्येप्रकरणी विरोधी पक्षांच्या सदस्यांनी गदारोळ घालत सभागृह डोक्यावर घेतले. अर्थात गोंधळ घालण्यासारखा अथवा राजकीय चिखलफेक करण्यासारखा हा विषय नव्हता.

केवळ गोंधळ घालून प्रसिद्धी माध्यमांचे लक्ष वळविणे आणि अत्यंत महत्त्वाच्या विषयावर प्रगल्भता न दाखविता सभागृहातील कामकाजात अडथळे आणण्याचा प्रकार विरोधी पक्षांतील खासदारांकडून दाखविण्यात आला. निलंबन केल्यावर दिलगिरी व्यक्त करून पिठासीन अधिकाऱ्यांकडे निलंबन मागे घेण्याची विनंती करणे अथवा न्यायालयात जाऊन सत्ताधारी चुकीची कारवाई करत असल्याचे सांगत दाद मागणे हे पर्याय गोंधळी खासदारांपुढे उपलब्ध होते. पण गोंधळ घालणाऱ्या खासदारांकडून प्रगल्भतेची अपेक्षा करणे व्यर्थ आहे. त्यांना जर सुरक्षेचे गांभीर्य समजले असते तर त्यांनी राज्यसभा व लोकसभेत गोंधळ घातलाच नसता. संसदेच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान निलंबित करण्यात आलेले विरोधी पक्षांच्या खासदारांनी संसदेच्या परिसरात या निर्णयाविरोधात निदर्शने केली. यावेळी त्यांनी घोषणाबाजी करत महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर धरणेही धरले. यावेळी तृणमूल काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी यांनी राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांची नक्कल केली.

विशेष म्हणजे खासदार कल्याण बॅनर्जी संसद परिसरात धनखड यांची मिमिक्री करत असताना काँग्रेस नेते राहुल गांधी हसत-हसत व्हीडिओ तयार करत होते. संसदेच्या सुरक्षिततेच्या मुद्द्यावरून केंद्रातील भाजपा सरकारला घेरणारा काँग्रेस पक्ष, या मिमिक्री प्रकरणामुळे स्वतःच अडचणीत आला आहे. टीएमसी खासदार कल्याण बॅनर्जी यांनी केलेल्या मिमिक्रीवरून राज्यसभा सभापती जगदीप धनखड जबरदस्त भडकले आहेत. खरे तर, महत्त्वाचे म्हणजे, यानंतर आता, उपराष्ट्रपती धनखड यांनी या मुद्द्यावरून राहुल गांधी यांना लक्ष करत जबरदस्त सुनावले आहे. मुळात टीएमसी खासदार कल्याण बॅनर्जी यांनी राज्यसभेचे सभापती व देशाचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांची मिमिक्री करावयास नको होती. त्याहून कळस म्हणजे असा चुकीचा प्रकार घडत असताना संबंधितांना समज देण्याऐवजी काँग्रेस नेते राहुल गांधी हे बॅनर्जी करत असलेल्या मिमिक्रीचे स्वत:च्या मोबाइलमध्ये चित्रीकरण करत होते.

बॅनर्जी व राहुल गांधी यांनी धनखड यांचा अपमान केला नाही तर राज्यसभा सभापती आणि उपराष्ट्रपती या देशातील महत्त्वपूर्ण असणाऱ्या पदांचा अपमान केला आहे. आपण काय चुकीचे करत आहोत, याचे भानही त्यांना त्यावेळी राहिले नाही. केलेल्या कृत्याबाबत माफी मागून विषय मिटविण्याऐवजी त्यांनी याबाबत कानाडोळा केला आहे. त्यांच्या या वागणुकीवरून त्यांच्यावर करण्यात आलेली निलंबनाची कारवाई योग्यच असल्याची प्रतिक्रिया आता भारतीय जनतेकडून व्यक्त केली जात आहे. मिमिक्रीचे चित्रीकरण केल्याने राहुल गांधी हे देशवासीयांच्या संतापाचे धनी बनले आहेत. आपल्या कृत्यातून त्यांनी धनखड यांचा नाही तर राज्यसभा सभापती, उपराष्ट्रपती या पदाचा अपमान करताना लोकशाहीचीदेखील विटंबना केली आहे. भारत जोडो यात्रेमुळे राहुल गांधींबाबत निर्माण झालेली सहानुभूतीही त्यांनी चित्रीकरण करण्याच्या कृत्यामुळे गमविली आहे. अशा गोष्टींना आळा बसला पाहिजे. आपण संसदेत काय माणसे पाठवित आहोत, याचेही भान यानिमित्ताने मतदारांनीही दाखविणे आवश्यक आहे. हा प्रकार भारतीय जनता कदापि विसरणार नाही. आधीच विरोधी पक्षनेते पद मिळविण्याइतपतही खासदार विरोधी पक्षांना निवडून आणता आलेले नाही. या प्रकारांनी विरोधी पक्षाच्या खासदारांना सभागृहात पाठवायचे तरी कशाला?

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -