नवी दिल्ली : इंडिया आघाडीच्या (INDIA Alliance) बैठकीनंतर समोसा चांगलाच चर्चेत आला आहे. जेडीयू खासदाराने बैठकीत समोसा नसल्याने जाहीर नाराजी व्यक्त केली आहे.
इंडिया आघाडीची चौथी बैठक (INDIA Alliance meeting) मंगळवारी दिल्ली येथे पार पडली. या बैठकीत अनेक मुद्द्यांवर थातूरमातूर चर्चा झाली परंतू कोणताही ठोस निर्णय झालेला नाही. तर काही मुद्दे चर्चा करून तसेच तडजोडीतून सोडवण्यावर उपस्थित नेत्यांनी केवळ माना डोलावून होकार दिला. मात्र एक जेडीयू नेते माध्यमांशी बोलताना चांगलेच संतापले होते.
जेडीयू खासदार सुनील कुमार पिंटू (Sunil Kumar Pintu) यांनी मंगळवारी झालेली इंडिया आघाडीची बैठक निष्फळ असल्याचे म्हटले आहे. अशा प्रकारे त्यांनी पुन्हा एकदा नितीश कुमार आणि पक्षाविरोधात बंडाची भूमिका घेतली आहे. त्यांनी विरोधी आघाडीच्या बैठकीबाबत म्हटले की, आधी मीटिंगमध्ये समोसा मिळत होता. यावेळी केवळ चहा बिस्किटांवर बैठक संपवली.
#WATCH | On INDIA Alliance meeting, JD(U) MP Sunil Kumar Pintu says, “In the meeting yesterday, big leaders of several parties had come for sharing in the alliance. But no discussion on the same could be done. Yesterday’s meeting was restricted to tea biscuits…because Congress… pic.twitter.com/7PCaaeUANF
— ANI (@ANI) December 20, 2023
पिंटू यांनी सांगितले की, आधीच्या बैठकांमध्ये चहा बिस्किटांसोबत समोसेही असायचे. मात्र आता काँग्रेस म्हणत आहे की, त्यांच्याकडे निधीची कमतरता आहे. पक्षाकडे फंड नाही. लोकांनी देणगी द्यावी, ते १३८ रुपये, १३८० रुपये किंवा १३,८०० रुपये देणगी मागत आहेत. त्यामुळे मंगळवारची मीटिंग केवळ चहा-बिस्किटांवर संपली, या बैठकीत समोसा दिला नाही, असे म्हणत त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
दरम्यान, पुढच्या वर्षी मार्च एप्रिल महिन्यात लोकसभा निवडणुकीची घोषणा होऊ शकते. याच्या तयारीसाठी सर्व विरोधी पक्ष एकाच छताखाली येण्यासाठी प्रयत्न करत आहेत. पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीत चार राज्यात पराभव झाल्यानंतर इंडिया आघाडीने पुन्हा बैठक आयोजित केली होती. १९ डिसेंबर रोजी २८ पक्षांचे प्रतिनिधी बैठकीसाठी उपस्थित होते. मात्र या बैठकीतील चर्चांबरोबरच’ समोसा’ ही चर्चेत आला आहे.