Tuesday, July 23, 2024
Homeसंपादकीयविशेष लेखसंसदेवरील हल्ला योगायोग का प्रयोग?

संसदेवरील हल्ला योगायोग का प्रयोग?

प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी (माजी आमदार)

देशाचे सर्वोच्च सभागृह असलेल्या संसदेवर १३ डिसेंबर २००१ आणि १३ डिसेंबर २०२३ या दोन दिवशी हल्ला झाला. या दोन्ही वेळा पंतप्रधान हे भारतीय जनता पार्टीचेच होते. २००१ साली स्व. अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान होते. तर सध्या नरेंद्र मोदी आहेत. मग हा योगायोग आहे की प्रयोग आहे?

लोकसभेत काही तरुणांनी प्रेक्षक गॅलरीतून उड्या मारून बुटात लपवलेले गॅस स्टीक काढून पिवळ्या रंगाचा गॅस सोडून खासदारांमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न केला. अशा रंगीत गॅस स्टीक सैन्यदल किंवा सुरक्षा रक्षक हे सिग्नल देण्यासाठी वापरतात. पण ते तांबड्या रंगाचा गॅस असलेल्या स्टीक वापरतात. संसदेत काढलेल्या गॅस स्टीकमधून पिवळ्या रंगाचा गॅस पसरलेला आपण सर्वांनीच बघितला. फॉस्फरसपासून तयार होणाऱ्या पिवळ्या रंगाचा गॅस श्वसन व त्वचेसाठी घातक असतो. पण श्रीराम कृपेने कोणाला काही झालं नाही. पण मला सांगायचं आहे ते वेगळेच. सन २००१ च्या संसदेवरील हल्ल्याच्या दिवशी सकाळी संसदेच्या दोन्ही सभागृहांचे कामकाज सुरू झाले. त्यावेळी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी या लोकसभेच्या खासदार असल्याने सभागृहात होत्या. पण काही वेळातच त्या सभागृहातून बाहेर पडून थेट घरीच गेल्या. त्या घराकडे निघून अर्ध्या रस्त्यात गेल्यावर संसदेच्या आवारात घुसत अतिरेक्यांनी गोळीबार सुरू केला. लोकसभेच्या कामकाजात भाग घेण्यासाठी आलेल्या सोनिया गांधी अचानक घरी का गेल्या? त्या घरी गेल्यावरच अतिरेक्यांनी हल्ला कसा काय केला? त्या संसदेच्या आवारात किंवा संसद भवनात असताना हल्ला का केला नाही? याची उत्तरं फक्त सोनिया गांधीच देऊ शकतात.

लोकसभेत जेव्हा तरुणांनी उड्या मारून पिवळा गॅस सोडला, तेव्हाही सोनिया गांधी लोकसभेत आलेल्याच नव्हत्या. लोकसभेचे कामकाज सुरू असताना अचानक तरुणांनी सभागृहात उड्या मारल्या तेव्हा सर्वचजण भांबावले होते. मात्र काँग्रेसचे नेते राहुल गांधी हे आपल्या जागी उभे राहून शांतपणे हे सगळं बघत होते. आकस्मिकपणे घडलेल्या या घटनेचा कोणताच परिणाम त्यांच्या देहबोलीतून दिसत नव्हता. जणू काही चित्रपटातील दृष्य आपण बघतोय, अशा आर्विभावात ते शांतपणे तरुणांचे उड्या मारणे, बुटातून गॅस स्टीक काढून गॅस सोडणे, खासदारांनी त्यांना धरण्यासाठी पळापळ करणे, पकडल्यावर धुलाई करणे या सगळ्याच घटना राहुल गांधी शांतपणे आपल्या जागेवर उभे राहून बघत होते. या घटनेचे त्यांना जराही आश्चर्य वाटले नाही तर त्यांना धक्का बसणे तर दूरच! अशा प्रतिक्रिया येण्यासाठी फक्त दोनच गोष्टी कारणीभूत असतात, एक म्हणजे आपण त्यातले नाही, जे चाललंय त्याच्याशी आपल्याला काहीच देणं-घेणं नाही. अन् दुसरी म्हणजे घडणाऱ्या घटनेची पटकथा त्या व्यक्तीला अगोदरपासूनच माहिती असते.

आता राहुल गांधी यांच्याबाबत यातील कोणती शक्यता खरी वाटते, ते विचार करून ज्याचं त्यानं ठरवायचे आहे. आणखी एक सन २००१ साली सोनिया गांधी संसदेतून बाहेर पडल्यावर अतिरेक्यांनी संसदेवर हल्ला केला होता. आताही सोनिया गांधी लोकसभेच्या सदस्या असूनही ही घटना घडली तेव्हा त्या सभागृहात नव्हत्या. सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या प्रतिक्रिया या योगायोग आहेत, का प्रयोग! झालेल्या कालच्या घटनेची पांळंमुळं खणून काढायला मोदीजी आणि गृहमंत्री अमित शहा आणि त्यांचे संसदेतील सहकारी सक्षम आहेतच. माझाच नव्हे; तर आज देशाचा विश्वास मोदी यांच्यावर आहे. आपल्या तपास आणि सुरक्षा यंत्रणेवरही माझा पूर्ण विश्वास आहे. हा खरोखर बेरोजगारांचा आक्रोश होता, की षडयंत्र आहे हे देशासमोर आणतीलच हा माझा विश्वास आहे.

आपण भारतीय लोक खूपच संवेदनशील, भावनिक आहोत. जे समोर दिसतंय म्हणजे चॅनेलवर जे दाखवलं जातंय तेच आपण खरं मानून विचार करतो आणि आपलं मत बनवतो. चॅनेलवर सर्व खरं कधीच न दाखवता चॅनेलच्या सोयीनुसार दाखवलं जात नाही हेही तितकचं खरं आहे. चॅनेलवरच बघून आपण आपलं मत तयार करतो अन् नंतर पश्चाताप करण्याची वेळ आपल्यावर येते. संसदेवरील सन २००१ सालचा हल्ला झाल्यानंतर आपण अवघ्या तीन वर्षांतच आपल्याला त्याचा विसर पडला. लोकसभेच्या २००४ च्या निवडणुकीत देशवासीयांनी कोणालाच स्पष्ट बहुमत दिलेलं नव्हतं. त्यामुळेच सोनिया गांधी यांनी अन्य पक्षांच्या मदतीने केंद्रातील सत्ता हस्तगत केली. त्यानंतर दहा वर्षे देशात कसा कारभार झाला, तो सर्वांनीच अनुभवला आहे. अगदी ‘हिंदू अतिरेकी’ करण्यापर्यंत सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने मजल मारली होती. धाडसी शहीद तुकाराम ओंबळे यांनी तसं घडू दिलं नाही.

सन २००४ ते २०१४ या काळात काँग्रेसच्या नेतृत्वाखाली केंद्रात सरकार असताना संसदेवर हल्ला कधीच झाला नाही. मात्र संसदेबाहेर अनेक ठिकाणी बॉम्बस्फोट झाले. मुंबईत लोकलमध्ये बॉम्बस्फोट, मुंबईवर २६ / ११ ला हल्ला झाला त्यावेळी केंद्रात अन् राज्यात काँग्रेस व मित्रपक्षांचेच सरकार होते. देशाच्या इतर राज्यात अशाच काही घटना घडल्या होत्या, हे विसरून चालणार नाही. आजही तशीच वेळ आहे. पंतप्रधान मोदी यांना भाजपाला सत्तेतून खाली खेचून पुन्हा सत्ता काबीज करण्यासाठी सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियांका वाड्रा हे साम, दाम, दंड, भेद सगळ्यांचा वापर करत आहेत. लोकसभेच्या निवडणुका तीन महिन्यांवर आलेल्या आहेत. त्यामुळे आता जे होणार आहे ते महाभारत असेल. महाभारत हे धर्मस्थापनेसाठीचे युद्ध होते. त्यात प्रत्येकाला एक पक्ष घ्यावाच लागतो. जो तटस्थ आहे, असे म्हणतो तो धर्माच्या विरुद्ध असतो असे भगवान श्रीकृष्णांनीच सांगितलं आहे.

स्व. वाजपेयी यांच्या वेळी लोकसभेच्या निवडणुका तीन वर्षांनी झालेल्या होत्या. आता तीन महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. निकाल त्यावेळी जसा लागला तसा आताही लावायचा का? याचा निर्णय देशातील मतदारांनी करायचा आहे. सन २००४ साली काँग्रेसला सत्तेत बसवून त्यावेळी आपण आपल्या कुटुंबातील पुढच्या पिढीचे म्हणजे कुटुंबात त्यावेळी असलेल्या पंधरा वर्षांच्या वरील मुलांचे भविष्य कसे रंगवले हे आठवून बघा, आताच निर्णय घ्या. त्यासाठी संसदेवरील हल्ल्याची घटना पुरेशी बोलकी आहे! सन २००१ आणि २०२३ चा संसदेवरील हल्ला हे माझ्या मते तरी योगायोग नसून प्रयोगच आहेत. तुम्हाला काय वाटतं ?(लेखिका भाजपा महिला मोर्चाच्या राष्ट्रीय उपाध्यक्ष आहेत)

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -