‘अल्झायमर’ला मराठीत ‘विसरण्याचा आजार’ असे संबोधले जाते. सर्वात आधी या रोगाचे विवरण ‘अलाॅईस अल्झायमर’ यांनी केले. या आजाराच्या लक्षणात स्मरणशक्ती कमी होते व या आजाराने जर गंभीर रूप धारण केले, तर निर्णय घेण्यात असमर्थतता असणे, बोलण्यात अडचण येणे अशा गोष्टी उद्भवतात. त्यामुळे व्यक्तीच्या कौटुंबिक व सामाजिक समस्यांची स्थिती गंभीर होते.
अल्झायमर हा आजार साठ वर्षे जवळपास वय असणाऱ्या लोकांमध्ये उद्भवू शकतो. माणूस जसजसा वृद्धत्वाकडे झुकू लागतो, तसतशी त्याची स्मरणशक्ती व विचार करण्याची क्षमताही कमी-कमी होत जाते. पण याचे गंभीर परिणाम होणे हे अल्झायमरचे सुरुवातीचे लक्षण आहे. हा रोग म्हणजे डिमेंशिया (म्हणजे विस्मरण रोगाचे) सामान्य रूप आहे.
अल्झायमरचा परिणाम निश्चितपणे सामान्य जीवनावर होतो. डिमेंशियाची सर्वात आरंभिक लक्षणे म्हणजे, दिलेल्या सूचना लगेच विसरून जाणे, सामान्य कामकाज करण्यात अवघडपणा जाणविणे. डिमेंशियाने पीडित व्यक्ती दैनंदिन कामकाजातील योजना बनविते व विसरून जाते. त्यामुळे एखादी गोष्टं कार्यान्वित करणे त्या व्यक्तीला खूप जड जाते.
आपल्याला समाजात अशा अनेक व्यक्ती दिसतात की, घरातून बाहेर पडलेला अल्झायमर असलेला माणूस घरी परतताना पत्ता विसरून जातो. तो एखाद्या ठिकाणी कसा आला व घरी कसे परतायचे हे विसरून जातो. अशा वेळी कुटुंबीयांना त्या व्यक्तीला शोधण्यासाठी धाव घ्यावी लागते; परंतु त्या व्यक्तीचा आत्मविश्वास काही प्रमाणात वाढविण्यासाठी त्याच्याजवळ (खिशात) सोबत त्याचे नाव, पत्ता त्याचे कार्ड असणे आवश्यक आहे.
निर्णय घेण्याची क्षमता या व्यक्तींमध्ये कमी होत गेल्याने बहुतांशी वेळा पेशंट गडबडतो, गोंधळतो व कठीण मानसिक कार्यात त्यांना असामान्य त्रास वाटू शकतो. अल्झायमर होण्यामध्ये शास्त्रीय कारण जाणून घेणे आवश्यक आहे. मानवी मेंदूमध्ये शंभर अब्ज कोशिका (न्युराॅन्स) असतात. प्रत्येक कोशिका अन्य कोशिकांबरोबर संवाद करून एक नेटवर्क बनविते. या नेटवर्कचे काम विशेष असते. यातील काही कोशिका विचार करतात, काही शिकतात, काही स्मरणात ठेवतात, तर अन्य काही कोशिका आपल्याला वास घेण्यासाठी, ऐकण्यासाठी मदत करतात. आपापले काम करण्यासाठी मेंदूच्या कोशिका लघू-उद्याेजकासारखे काम करतात. त्या ग्लुकोजचा पुरवठा घेतात व ऊर्जा निर्माण करतात.
अल्झायमर या रोगात कोशिकांचा काही हिस्सा काम करणे बंद करतो. त्यामुळे याचा परिणाम इतर कामांवरही होतो. कोशिकांमध्ये काम करण्याची क्षमता कमी कमी होत जाते व शेवटी त्या मरतात. अल्झायमर्सचे इतर परिणाम म्हणजे व्यक्ती अकारण रडणे, राग करणे किंवा हसणे या गोष्टी दर्शवू लागतो. थोडक्यात हा आजार मेंदूच्या पेशी नष्टं करतो आणि कालांतराने गंभीर होतो. अनेकदा ही व्यक्ती अकारण हसणे, संदेह करणे, टी. व्ही. समोर तासनतास बसणे अशा गोष्टी दर्शवू लागते. कितीतरी कुटुंबात अल्झायमर्स या आजाराबद्दल माहिती नसते. मात्र यातील तज्ज्ञ किंवा चिकित्सक व्यक्ती यांची मदत घेणे नक्कीच आवश्यक आहे. अशा व्यक्तींना कुटुंबीयांनी समजावून घेणे, त्यांच्यावर योग्य ते औषधोपचार करणे, गरज पडल्यास समुपदेशकाची मदत घेणे जरूरीचे आहे.
या आजाराचे गंभीर होत जाणारे परिणाम म्हणजे स्वत:चे घरच विसरणे, घरच्यांचे चेहरे न आठवणे. या न्युराॅलाॅजिकल डिसऑर्डरमध्ये याचा त्रास झालेले व्यक्ती अन्न चावणे, पैसे मोजणे, गोष्टी लक्षात ठेवणे, निवड करणे हेही विसरायला लागतो.
चिडचिड वाढणे, गाढ व शांत झोप न लागणे, नैराश्य येणे, अतिविचार करणे, कुठल्याच गोष्टीत आनंद न वाटणे या गोष्टी कमी अधिक प्रमाणात अल्झायमर्सची व्यक्ती दर्शविते. जगभरात या आजाराचा अभ्यास करून काही ठोकताळे मांडण्यात आले. यूके नॅशनल हेल्थ सर्व्हिसच्या मते, अल्झायमर हा वृद्धापकाळातील आजार म्हणून पाहिला जातो. जसजसे तुमचे वय वाढत जाते, तसतसे शरीराच्या इतर दुर्बल भागांसारखे तुमचे मनही दुर्बल होत जाते. मधुमेह, लठ्ठपणा, व्यसने (मद्यपान, धूम्रपान), नैराश्य, एकटेपणा, उच्च रक्तदाब व उच्च कोलेस्टेराॅल या आजाराचा धोका वाढविण्याचे काम करतात. त्यामुळे व्यक्तीच्या दैनंदिन जीवनशैलीत योग्य आहार व व्यायामाची गरज आहे. अल्झायमर्सचा जास्त धोका-डोक्याला गंभीर दुखापत झालेल्या व्यक्तींना असतो, तसेच डाऊन सिंड्रोम असलेल्या लोकांना तिशीत किंवा चाळिशीत अल्झायमर हा आजार होऊ शकतो. कारण डाऊन सिंड्रोमच्या व्यक्तींमध्ये कारणीभूत असलेल्या अानुवंशिक बदलांमुळे मेंदूमध्ये काही काळानंतर अमायलाॅईड प्लेक्स तयार होतात, त्यामुळे अल्झायमर्स होतो. हा आजार पूर्णपणे बरा होत नाही. पण काही औषधे व उपचारांच्या माध्यमातून आजार स्थिर ठेवता येतो. या व्यक्तींची समाजात ऊठबस, संवाद कमी होणे यातूनही त्यांचे अल्झायमर्सचे प्रमाण वाढते.
जपान या देशाने एका अभिनव सामाजिक प्रयोगाने जगाचे लक्ष वेधून घेतले. जपान हा देश ‘अतिवृद्ध समाज’ या नावाने ओळखला जातो. जपानमध्ये २०२५ पर्यंत पाचपैकी एका व्यक्तीला स्मृतिभ्रंश होण्याचा अंदाज आहे. जपानमध्ये एक रेस्टाॅरंट सुरू केले आहे, ज्याचे नाव ‘रेस्टाॅरंट ऑफ मिसटेकन’ असे आहे. येथील वेटर व वेट्रेस या सर्वांना काही प्रमाणात संज्ञानात्मक कमजोरी आहे. त्यामुळे या रेस्टाॅरंटमध्ये ऑर्डर व डिलिव्हरी कधी-कधी चुकतात. हे रेस्टाॅरंट निर्माते ‘शिरो ओगुनी’ यांनी सुरू केले आहे. येथील वेटर व वेट्रेस प्रत्यक्षात स्वत:साठी स्वयंपाक करू शकतात, स्वच्छता करू शकतात व इतर सामान्य गोष्टी करू शकतात. कपडे धुणे, खरेदी करणे व सामान्य गोष्टी करू शकतात. या रेस्टाॅरंटचा मुख्य उद्देश स्मृतिभ्रंश झालेल्या लोकांशी संवाद साधणे. अनेक लोकांच्या मदतीने हे शक्य झाले आहे. या रेस्टाॅरंटमध्ये एखादा पदार्थ ऑर्डर केला की, रेस्टाॅरंटमधील वेटर व वेट्रेस दुसरे आणतात, दुसरा एखादा स्ट्राॅसोबत गरम काॅफी देतो, मिरीपूड योग्य त्या पदार्थावर पडेल याची खात्री नसते. अशा तऱ्हेने तिथे खायला येणारे लोकही खूप गोष्टी शिकतात. जेव्हा पाहुणे स्मृतिभ्रंश असलेल्या कर्मचाऱ्यांचे हसणे व त्यांच्या कामाला चालना देणारा आनंद पाहतात, तेव्हा काहींना धैर्याची भावना येते, तर काहींना अश्रू येतात. त्यामुळे स्मृतिभ्रंशाची नकारात्मक प्रतिमा सकारात्मक व मजेदार प्रतिमेने बदलली.
अल्झायमरने ग्रस्त व्यक्तींच्या आहारात ब्ल्यू-बेरीज, ब्रोकली, संत्री, सुकामेवा (बदाम, अक्रोड, पिस्ता, काजू) यांचा समावेश करावा. दुग्धजन्य पदार्थ, ताजी फळे, भाज्या यांचा आहारात समावेश असावा. उन्हात फिरणे (व्हिटॅमिन डीसाठी), काॅड लिव्हर ऑइल या गोष्टी डाॅक्टरांच्या सल्ल्याने कराव्यात. या व्यक्तींचे सामाजिक संबंध सुदृढ करणे जरूरीचे आहे, जेणेकरून ते या लोकांना वर्तमानकाळात जगण्यास मदत करतील. अशा व्यक्तींचा राग करण्यापेक्षा त्यांना समजून घेऊन आधार द्या.
मुंबई: "भिऊ नको मी तुज्या पाठीशी आहे" संकट काळात स्वामी समर्थांच हे वाक्य जगण्यासाठी नवी…
शिबानी जोशी जगभरात आज मराठी माणूस पोहोचला आहे. अमेरिका, ऑस्ट्रेलिया यासारख्या देशात शिक्षणाच्या निमित्ताने, नोकरीच्या…
वर्षा फडके - आंधळे जागतिक ऑडिओ-व्हिज्युअल आणि मनोरंजन क्षेत्रातील महत्त्वपूर्ण पर्व ठरणारी ‘वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल…
काश्मीरमध्ये गेले दोन दिवस पावसाने हाहाकार माजवला आहे आणि असे वाटते आहे की, निसर्गाचा कोप…
पंचांग आज मिती चैत्र कृष्ण नवमी शके १९४७. चंद्र नक्षत्र श्रवण. योग शुभ. चंद्र राशी…
किमतीचे नवे सूत्र समिती ठरवणार मुंबई : स्वत:च्या हक्काचे घर घेण्याचे अनेकांचे स्वप्न असते. मात्र…