Monday, July 22, 2024
Homeसंपादकीयअग्रलेखसंसदेतील घुसखोरी; सुरक्षेवर प्रश्नचिन्ह

संसदेतील घुसखोरी; सुरक्षेवर प्रश्नचिन्ह

देशाच्या राजधानीत संसदेचे हिवाळी अधिवेशन चालू असताना दोघेजण प्रेक्षक गॅलरीतून लोकसभेत उड्या मारतात, कामकाज चालू असताना बाकांवरून धावतात आणि आपल्या बुटात असलेल्या स्प्रेचा वापर करून पिवळ्या रंगाचा धूर सोडतात, या घटनेने संसद भवनाची सुरक्षा व्यवस्था किती तकलादू आहे, हे देशापुढे आले. जे चार तरुण सुरक्षा व्यवस्थेचे कवच भेदून धुमाकूळ घालतात, जे दोघेजण लोकसभा सभागृहात घुसून घबराट निर्माण करतात आणि पोलिसांनी पकडल्यावर ‘तानाशाही नही चलेगी’ अशा घोषणा देतात, हे चौघे संसद भवनाच्या परिसरात पोहोचलेच कसे? संसदेचे हिवाळी अधिवेशन चालू असल्याने दोन्ही सदनांचे सर्वपक्षीय खासदार, मंत्री सर्व अतिमहत्त्वाच्या व्यक्ती संसद भवनात असतात. संसद भवनाची सुरक्षा कठोर व कडक असल्याचे सांगण्यात येते मग हे चार तरुण कसे घुसले, लोकसभेत कसे पोहोचले याची उत्तरे चौकशी झाल्यावर मिळतील. पण त्यांच्या कृत्याने काही अघटीत घडले असते, तर त्याला जबाबदार कोण?

सुरक्षा व्यवस्था कितीही मजबूत असल्याचे सांगण्यात येत असले तरी या घटनेने सुरक्षा यंत्रणेचे पितळ उघडले पडले आहे. नवीन संसद भवनात जागा प्रशस्त आहे. सुरक्षा व्यवस्थेचे नियम व निकष लक्षात घेऊन नवीन संसद भवन उभारले आहे. संसदीय लोकशाहीचे सर्वोच्च व्यासपीठ म्हणून देशाची संसद ओळखली जाते. मग तिथे सुरक्षा व्यवस्थेत किंचितही त्रुटी असता कामा नये. २२ वर्षांपूर्वी म्हणजे दि. १३ डिसेंबर २००१ रोजी जुन्या संसद भवनावर दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. तेव्हा अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान होते. पाच दहशतवाद्यांनी लष्करी गणवेषात येऊन संसद भवनात गेट नंबर बारामधून घुसखोरी केली होती. त्यांनी त्यांच्याकडे असलेल्या ‘एके ४७’ मधून चौफेर गोळीबार केला. त्यांच्याकडे हँडग्रेनेडही होते. या हल्ल्यात पाचही दहशतवादी ठार झालेच. पण दिल्ली पोलीस दलाचे सुरक्षा रक्षकही शहीद झाले. दरवर्षी १३ डिसेंबरला जुन्या संसद भवनात दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना सर्व पक्षांचे नेते श्रद्धांजली वाहतात व नंतर संसद भवनात अधिवेशनासाठी येत असतात. ही परंपरा गेली २२ वर्षे चालू आहे.

पंतप्रधान व अन्य मंत्री व नेत्यांनी सकाळी शहिदांना श्रद्धांजली अर्पण केली व काही तासांतच लोकसभेच्या सभागृहात घुसखोरी होण्याची घटना घडली, हे दुर्दैव म्हटले पाहिजे. लोकसभेत घुसून उड्या मारणाऱ्या व पिवळा धूर सोडणाऱ्या दोघांनाही खासदारांनी व सुरक्षा रक्षकांनी पकडले. ही घटना घडली, तेव्हा शून्य तासात खासदार आपले म्हणणे मांडत होते. पश्चिम बंगालमधील भाजपाचे एक खासदार भाषण करीत असतानाच प्रेक्षक गॅलरीतून काही तरी खाली पडल्याचा आवाज आला. तेव्हा पीठासीन अधिकारीही भाजपाचे सदस्य होते. काय पडले हे कळण्याच्या आतच दुसऱ्याने खाली उडी मारली व तेव्हा मात्र खासदारांमध्ये घबराट पसरली. सभागृहात पिवळा धूर पसरू लागल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले. संसदेत घुसखोरी केलेल्यांची नावे अमोल शिंदे व नीलम सिंह अशी आहेत.

अमोल हा महाराष्ट्रातील लातूर जिल्ह्यातील रहिवासी आहे, तर नीलम ही हरयाणातील हिस्सारची निवासी आहे. त्यांचा सहकारी सागर याच्याकडे संसद भवनाच्या प्रवेशाचा पास मिळाला आहे. आश्चर्य याचे वाटते की, या तरुणांना म्हैसूरच्या भाजपाच्या खासदाराने शिफारस करून पास मिळवून दिला. त्यांचा या तरुणांशी काय संबंध आहे, त्यांनी कोणाच्या सांगण्यावरून या तरुणांना संसद भवनात जाण्यासाठी पास मिळावा म्हणून पत्र दिले? या तरुणांची पार्श्वभूमी काय आहे, याची त्यांची शिफारस करणाऱ्या खासदाराला आणि त्यांची तपासणी करणाऱ्या पोलिसांना ठाऊक होती का? अमोल हा २५ वर्षांचा आहे, तर नीलम ही ४२ वर्षांची आहे. यांचे एकमेकांशी काय संबंध आहेत? सागर, अमोल, नीलम हे सर्व एकत्र कसे आले? कशासाठी? नवीन संसद भवनात येण्यापूर्वी ते संसद मार्गावरील परिवहन भवनसमोर आंदोलन करीत होते, अशीही माहिती पुढे आली आहे. हा सर्व परिसर संवेदनशील असून तिथे कधीच गर्दीला परवानगी नसते किंवा आंदोलने होत नाहीत. मग हे तरुण तिथे कसे पोहोचले व नेमके काय करीत होते?

मोदी सरकार केंद्रात सत्तेवर आल्यानंतर विशेषत: कोरोना काळात व नंतर पत्रकारांच्या संसद भवनातील प्रवेशावर अनेक निर्बंध घालण्यात आले. त्याविरोधात पत्रकारांनी आवाज उठवला. पण त्याचा फारसा उपयोग झाला नाही. पत्रकारांच्या सेंट्रल हॉलमध्येही प्रवेशावर निर्बंध लादले गेले. मग जे प्रेक्षक म्हणून अधिवेशन काळात लोक येतात, त्यांची तपासणी, चौकशी केल्याशिवाय ते सहज कसे प्रवेश करू शकतात? संसद भवनावर २२ वर्षांपूर्वी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर निदान या ठिकाणी तरी सुरक्षा व्यवस्थेत किंचितही चूक होऊ नये अशी दक्षता घ्यायला हवी. पण तरीही या व्यवस्थेत त्रुटी असल्याचे ताज्या घटनेने स्पष्ट झाले आहे. खलिस्तानी नेता गुरपतवंत पन्नू याने १३ डिसेंबरला संसदेवर हल्ला करण्याची धमकी दिली होती, याचे गांभीर्य सुरक्षा यंत्रणेला नव्हते का?

आता प्रेक्षक, विद्यार्थी, पत्रकार यांच्या संसद भवन किंवा विधान भवनातील प्रवेशावर निर्बंध येतील. यात काही चांगले भरडले जातील. सुरक्षा यंत्रणेच्या गलथानपणामुळे संसद भवनाची सुरक्षा धोक्यात येऊ शकते तसेच अभ्यासू व चांगल्या लोकांचेही नुकसान होऊ शकते. लोकशाहीत केवळ प्रेक्षक व पत्रकारांच्या प्रवेशावर बंधने घालणे, ही पळवाट ठरेल. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून सुरक्षा व्यवस्थेने डोळ्यांत तेल घालून काटेकोरपणे काम केले पाहिजे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -