मलिकांना देवेंद्र फडणवीसांचा विरोध
नागपूर : नागपूर येथील विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या (Nagpur winter Session) पहिल्या दिवशी राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक (Nawab Malik) सत्ताधाऱ्यांच्या शेवटच्या बाकावर बसलेले दिसून आले. म्हणजेच त्यांनी अजित पवार (Ajit Pawar) गटाला साथ देत महायुतीत सामील होण्याचा निर्णय घेतला असल्याचे स्पष्ट झाले. मात्र, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मलिकांना सरकारमध्ये सामील करुन घेण्यास विरोध दर्शवला. याबाबत त्यांनी अजित पवारांना पत्र लिहिलं. ‘सत्ता येते जाते, पण देश महत्त्वाचा. मलिकांना देशद्रोहाच्या आरोपाखाली अटक झाली होती त्यामुळे त्यांना महायुतीमध्ये सामावून घेता कामा नये’, असं फडणवीस म्हणाले. शिवाय हे पत्र त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या संमतीने लिहिले असल्याचे सांगितले.
अजित पवार यांना हे पत्र मिळाले असून आता त्यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लिहिलेलं पत्र मी वाचलं. नवाब मलिक हे काल पहिल्यांदाच सभागृहात आले होते. आम्ही महायुती सरकारसोबत गेल्यानंतर ते पहिल्यांदाच बाहेर आले आहेत. अद्याप त्यांनी त्यांचं मत व्यक्त केलं नाही. त्यांची भूमिका काय आहे, ते ऐकल्यानंतरच मी माझी आणि पक्षाची भूमिका स्पष्ट करेन. कोणी कुठे बसायचं हे सांगणं माझा अधिकार नाही, असं अजित पवार माध्यमांशी बोलताना म्हणाले.
त्यामुळे नवाब मलिकांना आता सत्तेत सामील करुन घेतले जाणार का, शिवाय नाही घेतलं तर शरद पवार गट त्यांना पुन्हा सामील करुन घेण्यास संमती दर्शवणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.