ओंजळ: पल्लवी अष्टेकर
आपल्या प्रत्येकाच्या जीवनात आजी-आजोबांचे स्थान निश्चितच बळकट असते. खासकरून बालपणात हे नाते निष्पाप व निरागस असते. हल्लीच्या काळात आपण अनेक ठिकाणी त्रिकोणी कुटुंब पाहतो. त्यात कित्येक घरात आजी-आजोबा नसतात. ते कुठेतरी गावाकडे असतात. क्वचित कधीतरी येतात. मग प्रत्यक्ष सहवासातून येणारा कौटुंबिक बंधही तिथे राहात नाही. जिथे संयुक्त कुटुंब व्यवस्था आहे, तिथे मुलांना सर्वांच्या प्रेमाबरोबर तडजोडीचीही सवय लागते, जी मुलांच्या भवितव्यासाठीही गरजेची असते. शाळेत, सोसायटीत, सामाजिक कार्यक्रमात, पुढे नोकरीतही या तडजोड करण्याच्या स्वभावाचा चांगला उपयोग होतो. त्यामुळे इतरांशी जुळवून घेण्याची वृत्ती वाढून वादविवाद टळतात.
सुमती आजी-आजोबांची लाडकी नात. त्यांच्या एकुलत्या एका मुलाची प्रल्हादची ती मुलगी. सुमती आजी-आजोबांच्या मायेच्या सावलीखाली मोठी होऊ लागली. आजीची तर ती दुधावरची सायच जणू. सुमतीच्या लहानपणी तिचे आजोबा तिला पाठीवर घेऊन ‘घोडा-घोडा ‘म्हणत खेळवायचे. बागेत आईस्क्रीम, भेळ खायला न्यायचे. सुमतीचे आई-वडील दोघेही नोकरी करायचे, त्यामुळे आपल्या लेकीपाशी त्यांना कमीच वेळ घालवायला मिळे. मग हा वेळ ते सुट्टीच्या दिवशी तिच्यासोबत घालवून भरून काढत. कधी तिला सहलीला तर कधी बालनाटकांना किंवा चित्रपटाला घेऊन जात.
सुमतीला सहवासामुळे आजी-आजोबांचा जास्त लळा लागला. दररोज संध्याकाळी आजी व सुमती देवापुढे समई लावून ‘शुभम् करोति कल्याणम्’ व इतर प्रार्थना म्हणत. हळूहळू बालपण संपून सुमती मोठी झाली, विचारांनी परिपक्व झाली. पण ज्या मायेने आजी-आजोबांनी तिला मोठे केले ते त्यांचे ऋण ती विसरली नाही. ते वयाने थकले तशी त्यांची कामे सुमती सांभाळू लागली. घरातील वाणसामान आणणे, भाजी-पाला, घराची साफसफाई याबाबी ती आत्मविश्वासाने सांभाळू लागली. काळाच्या ओघात आजी-आजोबा निवर्तले तरी त्यांनी केलेले चांगले संस्कार सुमतीला अजूनही स्मरतात व आता त्याचा उपयोग तिच्या वैवाहिक जीवनात होत आहे.
आपल्या प्रत्येकाच्या जीवनात आजी-आजोबांचे स्थान निश्चितच बळकट असते. खासकरून बालपणात हे नाते निष्पाप व निरागस असते. माझ्या लहानपणी मला दोन्हीकडील आजींचे प्रेम भरभरून मिळाले. आईची आई तिच्याकडे सुट्टीला गेल्यावर अंगणातील शेवग्याच्या झाडाच्या पाल्याची भाजी करीत असे. ती भाजी ती इतकी चविष्टं करायची की, त्या भाजीची चव बराच वेळ जीभेवर रेंगाळत असे. मातीच्या माठातल्या थंडगार पाण्यातील तिच्या हातच्या ताकाची चव काही न्यारीच असायची. वडिलांच्या आईसोबत, आजीसोबत मी दररोज अंगणातील तुळशी वृंदावनाच्या आतील महादेवाच्या पिंडीला स्नान घालून मोठा गुळाचा खडाही ठेवत असे. मग नंतर आजी तो गुळाचा खडा माझ्या हातावर ठेवत असे. मी शाळेत जाण्याअगोदर हा आमचा कार्यक्रम नित्यनेमाने चालत असे. तसेच आमच्या घरातील बागेत अनेक गुलाबाची रोपे होती. त्यांना गुलाबाची सुंदर फुले डवरलेली असायची. या रोपांना पाणी घालण्याचे काम मी व आजी खूप वेळा करायचो. लहानपणी आजोबांसोबत त्यांचा हात धरून मारुतीच्या देवळात जाणे, परतून येताना चिरमुरे, फुटाणे घेऊन घरी येणे अशी मज्जा आधुनिक काळातील मुलांना किती अनुभवायला मिळत असेल? तीव्र स्पर्धेच्या या युगात बहुतांशीजण आपल्या मुलांच्या करिअर घडविण्याच्या मागे लागलेले असतात. शाळा, त्यापाठोपाठ भारंभार क्लासेस यात मुले इतकी गुरफटून जातात की, इतर गोष्टींसाठी त्यांना फार कमी वेळ मिळतो.
शहरात अनेकदा नवरा-बायको नोकरी करणारे असले की त्यांचे माय-बाप गावी रहाणे पसंत करतात. मग उपचारापुरते एकमेकांकडे जाणे उरते. अशा घरातील नातवंडे आजी-आजोबांच्या प्रेमाला पारखी होतात. एकूण समाजात वाढत जाणारी विभक्त कुटुंब पद्धती ही चिंताजनक बाब आहे. पूर्वीच्या काळातील एकत्र कुटुंब व्यवस्था पाहता परस्परांत जुळवून घेऊन एकत्र राहण्यात समाजाला जास्त महत्त्व वाटे. आधुनिक काळात स्वतंत्र कुटुंब व्यवस्थेतील पालक अर्थाजनासाठी मुलांना पाळणाघरात ठेवणे जास्त पसंत करीत आहेत. त्यामुळे घरातून मिळणाऱ्या सहजशिक्षण प्रक्रियेला काही मुले पारखी होताना दिसतात.
मध्यंतरी एकदा भाजीमंडईत मला एक भाजी विकणाऱ्या आजीबाई भेटल्या. त्या अतिशय काटकसरीने संसार चालवित होत्या. त्यांना एक नात होती. कोरोना काळात त्यांना आपल्या मुलाला व सुनेला गमवावे लागले होते. आता आजीबाई आपल्या लेकीच्या संसारात आपल्या नातीला घेऊन आल्या होत्या. लेकीची आर्थिक स्थितीही फार चांगली नव्हती. तिच्या संसारात राहताना आजीबाईंना काहीसे परके वाटे. पण त्यांचा जावई भला माणूस होता. त्यामुळे आजीबाईंचे दिवस नातीसह त्यांच्या सगळ्यांच्या सहवासात बरे जात होते. मुलगी आई व भाचीविषयी आपले कर्तव्य पार पाडत होती. आजीबाई आपल्या फावल्या वेळात लेकीच्या संसाराला मदत करण्यासाठी भाजी विकून हातभार लावत होत्या. नातीचे शालेय शिक्षण सुरू होते. आधुनिक काळातही नातवंडे वेगवेगळ्या प्रकारे आजी-आजोबांना मदत करत असतात. आमच्या परिचयातील एका कुटुंबातील एकुलता एक नातू त्याच्या सत्त्याऐंशी वयाच्या आजोबांसोबत राहातो. त्याचे आई-वडील दुसरीकडे राहतात. आपले काॅलेज सांभाळून तो आजोबांना सर्व प्रकारची मदत करतो. सुट्टीच्या दिवशी स्वयंपाकही करतो. त्यामुळे त्याचे आई-वडील काहीसे निर्धास्तपणे जगू शकतात. तो आपल्या आजोबांचे आर्थिक व्यवहारही सक्षमपणे सांभाळतो. त्याचे बँकेचे फाॅर्मस भरणे, घर व्यवस्थापन या गोष्टीही मनापासून सांभाळतो.
रिया आणि प्रिया या दोघी जुळ्या बहिणी. त्यांची आजी एकटीच फ्लॅटमध्ये राहते. दोघीही काॅलेजात शिकतात. त्या नियमितपणे वृद्ध आजीला सोबत म्हणून आलटून-पालटून तिच्याजवळ झोपण्यास जातात. मुलींची आई दररोज त्यांच्यासोबत जेवणाचा डबा पाठविते. आजीला आपल्या नातींचे खूप कौतुक वाटते. आपल्या नाती तिला आपल्या म्हातारपणाची काठी वाटतात. नातींनी आजीला मोबाइलचा वापर कसा करायचा हेही शिकविले आहे. थोडा वेळ वृत्तपत्र वाचन, थोडा वेळ मोबाइलवर गाणी ऐकणे यात आजीचा जातो. कधी त्या आपल्या आजीला बागेत फिरायलाही नेतात.
आकाशवाणीवर अधे-मधे प्रसारित होणारे हे सुंदरसे गीत आयुष्याच्या सांजवातीला अनेकांना अंतर्मुख करते,
“मधू मागशिना सख्या परी
मधुघटची रिकामे स्थानी
ढळला रे ढळला दिन सख्या
संध्याछाया भिववती हृदया
आता मधूचे नाव कासया
लागले नेत्र रे पैलतीरी”
गीतकार भा. रा. तांबे यांचे हे गीत स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी आपल्या आर्त आवाजाने सजविले आहे. प्रत्येकाच्या आयुष्यात सांजवात येते, त्यासाठी आपल्या मनाची तयारी करणे तर आवश्यक आहेच, तसेच त्यामुळे आपला सहवास इतरांना सुखकारक ठरेल, याचीही ती नांदी ठरेल.