नॉस्टॅल्जिया: श्रीनिवास बेलसरे
सुमारे ४०/४५ वर्षांपूर्वी संगीताच्या जगात एक जमाना येऊन गेला. गझलांच्या लाँग-प्ले रेकॉर्ड्सचा जमाना! पाकिस्तानातून गुलाम अली नावाचे गायक भारतात आले आणि त्यांचे कार्यक्रम अनेक ठिकाणी झाले. हिंदी फिल्म जगतानेही त्यांना उचलून धरले आणि रसिकांनी तर त्यांना अक्षरश: डोक्यावर घेतले होते. आजही जुन्या दर्दी लोकांना त्या गझला आठवतात, त्या काळाबद्दल एक अनामिक हुरहूर जाणवते.
आज तंत्रज्ञानामुळे जगण्याला जो बेफाम वेग आला आहे, कधी सकाळ झाली आणि कधी दिवस संपला, कधी आपण ‘न्यू इयर’ साजरे केले आणि लगेच पुन्हा वर्ष कसे संपत आले तेही कळत नाही, असे त्याकाळी नसे. जगण्याचा वेग पुष्कळ सुसह्य होता. आजसारखा जीवघेणा नव्हता! त्यामुळे शांतपणे काही ऐकणे, लिहिणे, त्याचा आस्वाद घेणे शक्य होते.
गझल हे मुळात तबियतीने आस्वाद घ्यायचे काव्य! त्यात तरलपणे व्यक्त केलेल्या भावना, हळुवारपणे खुलवलेल्या नाजूक कल्पना यांचे एक वेगळेच विश्व असते. गझलेचा स्वभाव जीवनाच्या त्या काळच्या सुखद, डौलदार वेगाशी जुळणारा होता. म्हणून हिंदी/उर्दू समजणाऱ्या सर्वच भागात गझलांचा त्या काळी बोलबाला होता. गुलाम अलींनी गायलेल्या –
‘ये दिल, ये पागल दिल मेरा,
क्यो बुझ गया? आवारगी’
‘फासले ऐसे भी होंगे,
ये कभी सोचा न था’
‘कुछ दिन तो बसो
मेरी आंखोमे,
फिर ख्वाब अगर
बन जाओ तो क्या?’
अशा अनेक गझलांनी युवकांना अक्षरश: वेड लावले. त्यांनी गायलेल्या हसरत मोहानी यांच्या अशाच एका गझलेनेही अनेक रसिकांना कितीतरी वर्षे अस्वस्थ ठेवले आहे. तसे पाहिले, तर ही गझल अशा श्रोत्यांसाठी होती ज्यांनी यौवनाचा भारलेला प्रदेश आधीच ओलांडला आहे! तारुण्याचा बहर ओसरला असला तरी त्या बेधुंद जगण्याच्या आठवणीतून मन बाहेर यायलाच तयार नाही. त्यांच्या भावना कवीने फार सुंदरपणे व्यक्त केल्या होत्या. गंमत म्हणजे ही गझल तरुणातही खूप लोकप्रिय झाली. त्या हळव्या रचनेचे शब्द होते –
चुपके चुपके रातदिन,
आँसू बहाना याद है.
हमको अबतक आशिक़ीका,
वो ज़माना याद हैं…
हसरत मोहानीसाहेब यौवनातील त्या काळाला ‘आशिकीका जमाना’ म्हणतात. म्हणजे मन त्यावेळी तारुण्यसुलभ बेफाट, बेधुंद भावनांच्या अगदी आधीन झाले होते. मात्र प्रेमातील अपयशामुळे आलेले अश्रूही इतरांना दिसणार नाहीत याची काळजी घ्यावी लागे.
प्रियकर प्रेयसीला म्हणतोय, तुला भेटल्यावर मनातील सगळा संकोच निघून जाऊन मी किती बेधडक होऊन जायचो ना? आणि मला पाहून तुझे ते लाजून बोट दातात हळूच दाबणे अजूनही आठवत राहते…
तुझसे मिलतेही
वो कुछ,
बेबाक़ हो
जाना मेरा…
और तेरा दातोंमें वो,
उँगली दबाना याद है!
हमको अबतक आशिक़ीका…
कवीला एकेक प्रसंग जसाच्या तशा आठवतोय. तो म्हणतो, ‘तू कशी आपल्या संकेतस्थळी मला भेटायला चोरून यायचीस ना? इतकी वर्षे झाली तरी मला अजून ती जागा स्पष्टपणे आठवत राहते.
चोरीचोरी हमसे तुम,
आकर मिले थे जिस जगह…
मुदद्तें गुज़री, पर अबतक
वो ठिकाना याद है!…
त्याला आठवते, तिचा चेहरा पाहण्यासाठी तो तिच्यासमोरील पडद्याचे टोक अचानक ओढायचा आणि ती घाबरून दुपट्ट्यानेच तोंड झाकून घ्यायची! तो हळलतो, ‘कसे होते ना ते गंमतीदार दिवस, त्या चोरीच्या भेटी?’
खिंच लेना वो मेरा,
पर्देका कोना दफ़अतन.
और दुपट्टेसे तेरा,
वो मुँह छुपाना याद है.
हमको अबतक आशिक़ीका…
कवी म्हणतो, ‘मी बोलावले तर कडक उन्हातही तू अनवाणी पायांनी मला भेटायला यायचीस. केवढे अनावर, निर्मळ, निरागस प्रेम होते ते! प्रिये, मला अजून ते आठवत राहते गं!…
दोपहरकी धूपमें,
मेरे बुलानेके लिए,
वो तेरा कोठेपे,
नंगे पाँव आना याद है…
हमको अबतक…
माझी नजर सारखी तुझ्या घराकडेच लागलेली असायची आणि तुझे ते गच्चीवरच्या झरोक्यातून हळूच बघणे किती गोड वाटायचे!
बारबार उठना उसी जानिब
निगाह-ए-शौक़का,
और तेरा ग़ुर्फ़ेसे वो
आँखें लड़ाना याद हैं…
‘आपल्या प्रेमासाठी कसला तो कठीण काळ होता ना? सगळ्या गोष्टींचे भान ठेवत, तू कधीमधी एकटी असायचीस तेव्हा, तुला गाठून मनाची अवस्था तुला कशीबशी सांगायची. बाप रे, किती कठीण काम होते ते!’
तुझको जब तनहा कभी पाना,
तो अज़-राह-ए-लिहाज़,
हाल-ए-दिल बातोंही बातोंमें,
जताना याद हैं!
आणि मग घरच्यांच्या मर्जीविरुद्ध, सगळ्यांची नजर चुकवून ‘तुझे ते रात्री-अपरात्री भेटायला येणे! अनंत अडचणीतून झालेल्या त्या भेटीच्या वेळी चुकून जरी परत जाण्याबद्दल उल्लेख निघाला तरी तू किती रडायचीस?’ आणि मग मलाही किती रडवायचीस!
ग़ैरकी नज़रोंसे बचकर,
सबकी मर्ज़ीके ख़िलाफ़,
वो तेरा चोरी-छुपे रातोंको आना याद हैं!
आ गया गर वस्लकी,
शब भी कहीं ज़िक्र-ए-फ़िराक़,
वो तेरा रोरोके मुझको भी, रुलाना याद हैं…
कवीचा हा संवाद खरे तर स्वत:शीच सुरू आहे. आता ती आसपास नाही. बहुतेक प्रेमकथांप्रमाणे कदाचित ही कथाही शोकांतिकाच ठरली असेल. कवी मात्र मनातल्या मनात तिच्या आठवणी घोळवून तिच्याशी बोलतोय –
‘आजपर्यंतच्या आपल्या त्या गुप्त भेटीतले हितगुज, त्यातला तुझा शब्द-न-शब्द, मला आठवतो. ती दृश्ये माझ्या डोळ्यांपुढून जातच नाहीत. तुझा निरोप आणि माझे ते काहीही करून संकेतस्थळी पोहोचणे अजूनही आठवत राहते.
आजतक नज़रोंमें हैं वो
सोहबत-ए-राज़-ओ-नियाज़,
अपना जाना याद है, तेरा बुलाना याद हैं!
हसरत मोहानींची शैली किती चित्रमय आहे ते आपल्याला जेव्हा त्यांच्या प्रेमकथेतील एकेक प्रसंग आपल्याही डोळ्यांसमोर उभा राहतो तेव्हा प्रकर्षाने जाणवते –
‘तू मला निराश झालेले पाहिलेस की कशी समजवायचीस आणि ते करताकरता स्वत:च कशी रुसून बसायचीस… सगळे सगळे आठवत राहते गं!’
देखना मुझको जो बरगश्ता
तो सौ सौ नाज़से,
जब मना लेना तो फिर,
ख़ुद रूठ जाना याद हैं…
ते प्रियेला म्हणतात, ‘हौसेने मेहंदी लावल्यामुळे तुझे दोन्ही हात ओले असत. मग मी तुझ्या त्या अडचणीचा फायदा घेऊन तुला कशा गुदगुल्या करायचो तेही मला अजून आठवते…
‘शौक़में मेहंदीके वो बे-दस्त-ओ-पा होना तेरा,
और मेरा वो छेड़ना, वो गुदगुदाना याद है…’
कधी कधी, अशी गाणी ऐकल्यावर तो ‘अशिकीचा जमाना’, ते लपून छपून अश्रू ढाळणे, प्रेमातले ते चढउतार, ते हळवे उत्कट प्रसंग, कशाबशा झालेल्या भेटी आठवून श्रोत्याला किती अस्वस्थ वाटू लागते नाही? पण त्यात अस्वस्थ करणारी हुरहूर असली तरी एक सुप्त आनंद असतोच की!