कोकणी बाणा: सतीश पाटणकर
नाटळ गाव हे सह्याद्रीच्या पायथ्याशी आहे. यामुळे गावामध्ये आणि लागून असलेल्या सह्याद्रीमध्ये जैवविविधता विपुल प्रमाणात आहे. नाटळ गाव डोंगराळ प्रदेश म्हणजेच दुर्गम भागात येतो. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील साळशी देवस्थानाशी जी ८४ खेड्यांतील देवस्थाने जोडलेली आहेत, त्या प्रमुख देवस्थानांपैकी नाटळचे श्री रामेश्वर मंदिर हे एक देवस्थान आहे. येथील रामेश्वर मंदिरात चारी मुक्तिधाम व बारा ज्योतिर्लिंग यांचा समावेश असल्याचे भाविक मानतात. नवसाला पावणारे व हाकेला धावणारे कोकणातील जागृत देवस्थान म्हणजे श्री रामेश्वर मंदिर नाटळ, कणकवली, जिल्हा सिंधुदुर्ग. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील साळशी देवस्थानाशी जी ८४ खेड्यांतील देवस्थाने जोडलेली आहेत, त्या प्रमुख देवस्थानांपैकी नाटळचे श्री रामेश्वर मंदिर हे एक देवस्थान आहे.
नाटळ गावामध्ये आणि लागून असलेल्या सह्याद्रीमध्ये जैवविविधता विपुल प्रमाणात आहे. नाटळ हे गाव सह्याद्रीच्या पायथ्याशी वसलेले असून डोंगराच्या अगदी जवळ आहे. या मंदिराला शिवलिंगाच्या आकाराचा घुमट असून येथील निसर्गसौंदर्यामुळे त्याच्या सौंदर्यात अधिक भर पडते. त्यावरील बेलाची पाने, वर आपल्या पाचही फणा उभारून डौलदारपणे बसलेला पंचधातूचा शेषनाग, मंदिराच्या सभोवतालचे स्वच्छ व सुबक फरशी काम, बैठक व्यवस्था आदी गोष्टी एवढ्या नजरेत भरणाऱ्या आहेत की, दर्शनास येणारे लोक मंत्रमुग्ध होतात. सूर्याच्या प्रथम किरणांचा स्पर्श शिवलिंगावर होतो. तेव्हा साक्षात सूर्यनारायण आपल्या सहस्त्र किरणांनी भगवान कैलासाधिपतीवर अभिषेक करत असल्याचा भास होतो. पूर्वाभिमुख असणाऱ्या या मंदिरासमोर खाली झेपावत रामेश्वराचा चरणस्पर्श करणारे पंचमहाभुतांचे प्रतीक असलेले कुसुरुंडोवझर, पाळणोवझर, रत्नोवझर, धोंडगोवझर, मुसळोवझर असे पाच ओझर आहेत. येथे मनमोहक निसर्गसौंदर्य असल्यामुळे नेहमीच प्रसन्न वातावरण असते.
नाटळ हा गाव ४०० वर्षांपूर्वी रानवट जंगलाचा भाग होता. घाटपायथ्याशी असलेल्या या गावासाठी दळणवळणाची कोणतीच साधने नव्हती. खाली तळकोकण व डोंगर चढून गेल्यावर कोल्हापूर जिल्हा लागतो. येथे वाघ, बिबळ्यांचा वावर होता. डोक्यावर तत्कालीन मुस्लीम राजवटीचे (मुघल साम्राज्य) सावट होते. एकूण येथील जीवनच असुरक्षित होते. अशा परिस्थितीत रयतेतील तणाव कमी होऊन समाज एकसंध व्हावा व सृष्टी शक्ती वाढावी या हेतूने येथील मूळपुरुष शंकरदेव (शंकरसा) यांनी रयतेला एकत्र करून ‘बारा-पाचांची’ गावरहाटी चालू केली. त्यांना वेतन देऊन गावकीची कामे त्यांच्याकडे सोपवली.
भुताखेतांची भीती त्यावेळी लोकांच्या मनातून जात नव्हती. त्यामुळे समाजबळ आणि आत्मबळ वाढवण्यासाठी येथे देऊळ बांधण्यात आले. या देवळात पूजा आणि उत्सव होऊ लागले. त्यामुळे लोक एकत्र जमू लागले. गावरहाटीने समाजमन विकसित होत गेले. पुढे धार्मिक व सांस्कृतिक महत्त्व वाढू लागल्याने देऊळ परिसरात गोंधळ, दहिकाला, दशावतारी नाट्य, सप्ताह अशा कल्पना पुढे येऊ लागल्या. माघ शुद्ध नवमीपासून रामेश्वर मंदिरात दरवर्षी हरिनाम सप्ताहाचे आयोजन केले जाते. अखंड हरिनामाखेरीज येथे नौबती, भजन, कीर्तन, दिंड्या, मंगलवाद्याचा गजर या गोष्टी ग्रामदेवतेच्या जागरार्थ होत असतात. यावेळी देवाला साकडं घालून कौल मागितला जातो. रामेश्वराच्या दर्शनासाठी दूरदूरचे भाविक येथे येत असतात.
या मंदिराला शिवलिंगाच्या आकाराचा घुमट असून येथील निसर्गसौंदर्यामुळे त्याच्या सौंदर्यात अधिक भर पडते. मंदिराच्या सभोवतालचे स्वच्छ व सुबक फरशी काम, बैठक व्यवस्था आदी गोष्टी एवढ्या नजरेत भरणाऱ्या आहेत की, दर्शनास येणारे लोक मंत्रमुग्ध होतात. गोंधळ, दहीकाला, दशावतारी नाट्य, सप्ताह अशा कल्पना पुढे येऊ लागल्या. माघ शुद्ध नवमीपासून रामेश्वर मंदिरात दरवर्षी हरिनाम सप्ताहाचे आयोजन केले जाते. अखंड हरिनामाखेरीज येथे नौबती, भजन, कीर्तन, दिंड्या, मंगलवाद्याचा गजर या गोष्टी ग्रामदेवतेच्या जागरार्थ होत असतात. यावेळी देवाला साकडं घालून कौल मागितला जातो. रामेश्वराच्या दर्शनासाठी दूरदूरचे भाविक येथे येत असतात.
सिंधुदुर्ग येथे पोहोचण्यासाठी मुंबई-गोवा महामार्ग जो कणकवली, कुडाळ व सावंतवाडी या तीन मुख्य शहरांतून जातो. कोकण रेल्वेच्या कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ व सावंतवाडी यापैकी कोणत्याही स्थानकावरून प्रवास करू शकता. सिंधुदुर्ग जिल्हा मुख्यालय सिंधुदुर्ग रेल्वे स्थानकापासून ४-५ कि.मी. अंतरावर आहे, सिंधुदुर्ग येथे पोहोचण्यासाठी रत्नागिरी, गोवा किवा बेळगाव येथून विमानप्रवास करू शकतो. जिल्हा मुख्यालय ते तीनही विमानतळ साधारण १०० कि.मी. अंतरावर आहेत.(लेखक मुख्यमंत्र्यांचे माजी माहिती अधिकारी आहेत.)