- गोलमाल : महेश पांचाळ
“मी सायबर क्राइमच्या कार्यालयातून बोलतोय. तुमच्या आधार कार्डाचा गैरवापर करण्यात आला असून त्या आधारावर तीन बँक खाती उघडण्यात आली आहेत.”, पवईत राहणाऱ्या आणि एका बहुराष्ट्रीय वित्तीय कंपनीत विश्लेषक म्हणून काम करणाऱ्या एका २५ वर्षीय तरुणीला आलेला हा फोन. या फोननंतर ती घाबरलेली होती. त्यानंतर त्या व्यक्तीने जे सांगितले त्याप्रमाणे तिने त्याला सहकार्य करण्याचे ठरविले. पण सायबर पोलिसांच्या नावाने फोन करणाऱ्या त्या व्यक्तीने तिच्या बचत खात्याच्या तपशिलांची ऑनलाइन पडताळणी केली. त्याच बहाण्याने तिला तिच्या नेट बँकिंगमध्ये लॉग इन केले आणि तिचे पैसे हस्तांतरित करण्यापूर्वी त्वरित कर्जाच्या पर्यायावर क्लिक केले. आणि तिच्या खात्यातील पैसे वळते करत ४.८३ लाख रुपयांची फसवणूक केली.
काही मिनिटांचा खेळ होता. काय झाले माहीत नाही. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर या प्रकरणी मुंबई पोलिसांनी १३ नोव्हेंबर रोजी गुन्हा नोंदवला. याबाबत तपास करताना पोलीस अधिकाऱ्यांच्या ही बाब लक्षात आली की, तोतया सायबर चोराने पैसे ज्या बँकेत जमा केले, त्या बँकेकडून तपशील मागवला आहे. यावेळी तोतया सायबर चोराने एक नवीन मोडस ऑपरेंडी वापरली. ज्यामध्ये त्याने तरुणीला त्वरित कर्जावर क्लिक करून लाभार्थी खाते उघडण्याच्या त्यांच्या सूचनांचे पालन करण्यास भाग पाडले. तीन वेगवेगळी बँक खाती उघडण्यासाठी तिच्या आधार कार्डचा वापर केला होता. तसेच हे बेकायदेशीर कृत्ये केली जात असल्याचे तिला सांगत तिच्या खात्यावरील पैसे हस्तांतरित करण्यात आले.
फसवणूक करणाऱ्या सायबर चोराने प्रथम कुरिअर फर्मच्या कर्मचारी असल्याचे बोलून महिलेला फोन केला. तिच्या नावावर एक पार्सल आहे. जे तैवानमधून आले आहे. जे मुंबई सायबर क्राइम पोलिसांच्या रडारखाली आहे, अशी माहिती दिली. पहिला कॉल कुरिअरच्या व्यक्तीने केला. तो कॉल डिस्कनेक्ट केल्यानंतर, मुंबई सायबर क्राइम पोलीस अधिकारी असल्याचा दावा करत आणखी एका व्यक्तीचा दुसरा कॉल आला होता. माझे आधार कार्ड तीन बँक खाती उघडण्यासाठी वापरले गेले, अशी माहिती फिर्यादी तरुणीने त्या कथित पोलिसाला दिली होती.
फिर्यादी तरुणीला स्काईप अॅप डाऊनलोड करायला लावले आणि व्हीडिओ कॉलमध्ये सहभागी होण्यास सांगितले. “स्क्रीनवर दिसणाऱ्या व्यक्तीने मला माझे आधार तपशील सत्याकिंत करण्याच्या बहाण्याने सामायिक करण्यास सांगितले. नंतर, मला माझ्या ऑनलाइन बँकिंग खात्यात लॉग इन करण्यास सांगितले गेले. मी संपूर्ण संभाषणात प्रतिक्रिया देऊ शकले नाही आणि फसवणूक करणाऱ्याच्या सूचनांचे पालन करत राहिले. ज्याने मला त्वरित कर्जावर क्लिक करण्यास सांगितले आणि माझ्या खात्यात तीन लाख रुपये जमा झाले. त्यानंतर मला लाभार्थी खाते तयार करण्यास सांगितले गेले. त्यानंतर त्यांनी मला माझ्या खात्यातील १ लाख ८३ हजार रुपयांच्या बचतीसह तीन लाख रुपये हस्तांतरित करण्यास सांगितले.”
एका बहुराष्ट्रीय कंपनीत काम करणाऱ्या तरुणींबाबत असा फसवणुकीचा गुन्हा घडत असेल, तर सर्वांनी सावध राहण्याची गरज आहे. आपल्या बँक खात्याबाबत, आधार कार्ड, पॅन कार्डबाबत अनोळखी व्यक्तींना माहिती देण्यापूर्वी विचार करावा. एखाद्या घटनेबाबत संशय आल्यास, संबंधित व्यक्तीशी प्रत्यक्ष पाहिल्याशिवाय कृती केल्यास महाग पडू शकते, हे वरील उदाहरणावरून दिसून आले आहे.
maheshom108@ gmail.com