Friday, January 17, 2025
Homeसंपादकीयविशेष लेखहैदराबाद होणार भाग्यनगर...

हैदराबाद होणार भाग्यनगर…

इंडिया कॉलिंग : डॉ. सुकृत खांडेकर

तेलंगणामध्ये विधानसभा निवडणुकीसाठी ३० नोव्हेंबरला मतदान होणार आहे. मतमोजणी ३ डिसेंबरला होणार आहे. तेलंगणा हे दक्षिणेकडील राज्यांचे कर्नाटकनंतर दुसरे प्रवेशद्वार ओळखले जाते. तेलंगणामध्ये भारत राष्ट्र समिती (बीआरएस) या प्रादेशिक पक्षाचे सरकार आहे. (पूर्वीची तेलंगणा राष्ट्र समिती) हा पक्ष विजयाची हॅटट्रिक करणार का आणि के. चंद्रशेखर राव हे सलग तिसऱ्यांदा मुख्यमंत्री होतील का? हाच या निवडणुकीतील कळीचा मुद्दा आहे. ‘बीआरएस’कडून सत्ता खेचून घेण्यासाठी काँग्रेस व भाजपाने आपली ताकद पणाला लावली आहे. तेलंगणातील तिरंगी लढतीत भाजपा किती मुसंडी मारील, याकडे सर्व देशाचे लक्ष आहे. भारतीय जनता पक्ष सत्तेवर आल्यावर ‘हैदराबाद’ हे राजधानीचे नाव ‘भाग्यनगर’ करण्यात येईल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा तसेच भाजपाच्या काही केंद्रीय मंत्र्यांनी निवडणूक प्रचारात ठणकावून सांगिल्याने तेलंगणातील चुरस वाढली आहे.

के. चंद्रशेखर राव यांना व त्यांच्या बीआरएस पक्षाला या निवडणुकीत अँटी इन्कबन्सीचा मोठा धोका आहे. त्याचा लाभ काँग्रेसला मिळता कामा नये म्हणून भाजपाने रणनिती पणाला लावली आहे. बीआरएस विरुद्ध काँग्रेस अशी लढत न होता, बीआरएस, काँग्रेस व भाजपा अशी तिरंगी लढत झाली तर त्याचा भाजपाला निश्चित फायदा होऊ शकतो. एकेकाळी राज्यात काँग्रेस नंबर १ होती, नंतर भाषिक अस्मितेला साद घालत तेलंगणा राष्ट्र समिती नंबर १ झाली. आता भाजपा नंबर १ होणार की भाजपाची ताकद किती पटीने वाढणार हे या निवडणुकीत ठरणार आहे. मोदी, शहा, नड्डा, राजनाथ सिंह यांनी निवडणूक प्रचारात बीआरएस व काँग्रेसवर तुफानी हल्ले चढवले. भाजपाचे महाराष्ट्रातील आमदार नितेश राणे हे महिनाभर तेलंगणात ठिय्या मारून बसले होते. त्यांनी भाजपाच्या प्रचाराला तिथे वाहून घेतले होते. त्यांची मेहनत पाहून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही त्यांचे जाहीरपणे कौतुक केले. भाजपा-काँग्रेस यांचे निवडणूक प्रचारात एकच टार्गेट दिसले ते म्हणजे के. चंद्रशेखर राव. तेलंगणाचे फार्म हाऊस मुख्यमंत्री अशी त्यांची संभावना केली गेली. मुख्यमंत्री कार्यालयात न जाता ते फार्म हाऊसवर बसून सरकार चालवतात, अशी त्यांच्यावर टीका झाली. तेलंगणात भाजपाची लोकप्रियता वाढत आहे, हे केसीआर यांच्या अगोदरच लक्षात आले. त्यांनी दिल्लीला जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटून भाजपाशी युती करण्याचीही तयारी दर्शवली होती. पण मोदींनी त्याला साफ नकार दिला. स्वत: मोदींनी हा किस्सा प्रचारात सांगितला. मोदी म्हणाले, केसीआरची ऑफर आम्ही धुडाकावून लावली. मला शिव्या घालण्याची ते एकही संधी सोडत नाहीत. मी त्यांना भाजपाच्या जवळपासही येऊ देणार नाही… तेलंगणात बीआरएसची बोट बुडणार असे भाकीत मोदींनी व्यक्त केले आहे. काँग्रेसला मत म्हणजे केआरएसला मत, एक आजार संपवताना दुसरा आजार आणू नका, असे भाजपाने मतदारांना आवाहन केले आहे. माजी पंतप्रधान नरसिंह राव यांचा त्यांच्या मृत्यूनंतरही काँग्रेसने कसा अवमान केला होता, याची आठवण मोदींनी मतदारांना करून दिली आहे.

केंद्रीयमंत्री व तेलंगणाचे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष जी. किशन रेड्डी यांनी आपल्या प्रचार सभांतील भाषणातून भाजपा सत्तेवर आल्यावर हैदराबादचे नामांतर भाग्यनगर करणार असे जाहीर केले. आसामचे मुख्यमंत्री हिम्मत बिस्व सरमा यांच्या सभांनाही जोरदार प्रतिसाद मिळाला. त्यांनीही भाजपा राज्यात सत्तेवर आल्यानंतर तीस मिनिटांत हैदराबादचे नामांतर भाग्यनगर करणार असे जाहीर केले. बॉम्बेचे मुंबई, मद्रासचे चैन्नई, गुवाटीचे गुवाहाटी, कलकत्ताचे कोलकाता झाले, मग हैदराबादचे भाग्यनगर का बरे होणार नाही, असा प्रश्न भाजपाच्या नेत्यांनी प्रचारात विचारला. राजधानी दिल्लीतील राजपथचे कर्तव्य पथ किंवा रेसकोर्स रोडचे लोककल्याण मार्ग असे नामांतर मोदीजी केंद्रात आल्यावरच झाले. याचीही भाजपाचे नेते व केंद्रीयमंत्री आठवण करून देत आहेत. हैदर कोण होता, त्यांच्या नावाने हैदराबाद हवेच कशाला? असा प्रश्न या निवडणुकीत विचारला गेला. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सभांनाही मोठा प्रतिसाद दिसला. त्यांनीही इथे देवी भाग्यलक्ष्मी आहे, म्हणूनच हैदराबादचे भाग्यनगर आम्ही करणार असे जाहीर केले. एवढेच नव्हे तर महाबूबनगरचे ‘पलामुरू’ करू असेही सांगून टाकले. तेलंगणात बीआरएस सरकारने मुस्लिमांना ४ टक्के आरक्षण दिले आहे. भाजपा सत्तेवर आल्यावर धर्माच्या नावावर दिलेले आरक्षण तत्काळ रद्द केले जाईल, असे भाजपाने जाहीर केले आहे. हेच आरक्षण एससी-एटीला देण्यात येईल, असेही म्हटले आहे.

भाजपाने हैदराबादचे भाग्यनगर करणार या मुद्द्यावर प्रचारात भर दिला, त्याचा परिणाम काँग्रेस, बीआरएस आणि एआयएमआयएम हे तीनही पक्ष बिथरले. स्मार्ट सिटी, बुलेट ट्रेन, पंधरा लाख कुठे आहेत, शहरांची व रस्त्यांची नावे बदलणे हाच विकास का, असा प्रश्न ओवेसी भाजपाला विचारत आहेत. मुख्यमंत्री केसीआर यांनी आपला पक्ष सत्तेवर आल्यावर केवळ मुस्लिमांसाठी हैदराबादमध्ये आयटी पार्क उभारणार असे जाहीर केल्यामुळे शेवटच्या टप्प्यात तुष्टीकरणाच्या मुद्द्यावर आरोप – प्रत्यारोपाला धार चढली आहे. मुस्लीम व्होट बँकेसाठी केसीआर यांना अशा घोषणा कराव्या लागतात, ही त्यांची दुर्बलता आहे, असे कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी. के. शिवशंकर यांनी म्हटले आहे. सोशल मीडियावर तर केवळ मुस्लिमांसाठी आयटी पार्क म्हणजे हैदराबादमध्ये दहशतवाद्यांचा अड्डा उभारायचाय का? असेही प्रश्न विचारले गेले. गेल्या पंधरा वर्षांत झालेल्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीत तेलंगणामधील राजकीय परिस्थिती वेगाने बदलत आहे, असे प्रमुख पक्षांना मिळालेली मते व त्यांचे विजयी झालेले उमेदवार यांची आकडेवारी पाहिली तर लक्षात येते.

तेलंगणा राष्ट्र समितीची स्थापना के. चंद्रशेखर राव (केसीआर) यांनी केली, तेच राज्याचे मुख्यमंत्री आहेत. तेलुगू देशम पक्षातून बाहेर पडून त्यांनी सन २००१ मध्ये तेलंगणा राष्ट्र समिती (टीआरएस) हा पक्ष स्थापन केला व स्वतंत्र तेलंगणा राज्याच्या निर्मितीसाठी आंदोलन उभारले. टीआरएस पक्षाने २००४ मध्ये पहिली निवडणूक लढवली व नंतर २००९ मध्येही विधानसभेची दुसरी निवडणूक लढवली. पण या दोन्ही निवडणुकांमध्ये टीआरएसला मोठे अपयश आले व काँग्रेस आणि तेलुगू देशमनंतर तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. तेलंगणाची निर्मिती झाल्यानंतर टीआरएसचे भाग्य उजळले आणि पक्षाचा मोठा विस्तार झाला. सन २०१४ व २०१९ च्या निवडणुकीत टीआरएसच्या मतांची टक्केवारी व विजयी उमेदवारांची संख्या विलक्षण वाढली आणि या पक्षाने लागोपाठ दोन वेळा सत्ता काबीज केली. सन २०१४ च्या तुलनेने टीआरएसला २०१८ च्या निवडणुकीत प्रचंड यश मिळाले. २०१४ नंतर काँग्रेसमध्ये काहीच बदल झाला नाही. केंद्रातील व राज्यांतील पराभवानंतर काँग्रेसने काहीही बोध घेतलेला नाही. दुसरे महत्त्वाचे कारण म्हणजे २०१८ च्या निवडणुकीत तेलुगू देशमने निवडणूक केवळ उपचार म्हणून लढवली. विधानसभेच्या ११९ जागांपैकी केवळ १३ जागा तेलुगू देशमने लढवल्या. २०१३ मध्ये तेलुगू देशमने ७२ जागा लढवल्या होत्या. तेलुगू देशम पक्षाची व्होट बँक काँग्रेसकडे न वळता टीआरएसकडे वळली त्याचा परिणाम टीआरएसला ७३ टक्के जागा व ४६ टक्के मते मिळाली. सन २०१९ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपाचे तेलंगणात ४ खासदार निवडून आले. काँग्रेसपेक्षा एक जास्त खासदार भाजपाचा निवडून आला. याचा दुसरा अर्थ तेलंगणातील मतदारांनी नंबर दोनचा पक्ष म्हणून काँग्रेसपेक्षा भाजपाला पसंती दिली. तेलंगणात पक्ष विस्तारासाठी भाजपाने अटोकाट प्रयत्न चालवले आहेत. हैदराबाद महानगरपलिकेच्या निवडणुकीत भाजपाने जवळपास पन्नास जागा जिंकून शहरी मतदारांना आपलेसे करून दाखवले.

३० नोव्हेंबर रोजी होणाऱ्या निवडणुकीत बीआरएस आणि भाजपा हे एकमेकांवर कशी मात करतात, हा मुद्दा आहे. मोदींच्या सभांना सर्वत्र मोठी गर्दी होती. करीमनगरच्या सभेत मोदी गर्दीला उद्देशून म्हणाले, ‘आपण माझे एक वैयक्तिक काम कराल का? घाबरू नका, माझे व्यक्तिगत काम आहे, निवडणुकीसंबंधी नाही. आपण इथून निघाल्यावर घरांघरात जाऊन सांगा, मोदीजी करीमनगरला आले होते, त्यांनी आपल्याला नमस्कार सांगितला आहे. मला आशीर्वाद मिळतील, माझी ऊर्जा वाढेल…

[email protected]
[email protected]

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -