आडव्या मार्गात अडथळे आल्याने आता करणार उभे खोदकाम
उत्तराखंड : उत्तराखंडातील (Uttarakhand) उत्तरकाशीत निर्माणाधीन सिल्क्यरा बोगद्यात (Uttarkashi Tunnel Collapse) ऐन दिवाळीच्या पहिल्याच दिवशी ४१ मजूर अडकले. या मजुरांना बाहेर काढण्यासाठी युद्धपातळीवर चालू असलेले प्रयत्न कुचकामी ठरत असल्याचे दिसून येत आहे. १२ नोव्हेंबर रोजी अडकलेले या मजुरांची आज पंधराव्या दिवशीदेखील सुटका झालेली नाही. उलट ती अधिक लांबणीवर जाणार असल्याचे समजत आहे. ऑगर मशीनचा वापर अयशस्वी ठरल्यानंतर आता व्हर्टिकल ड्रीलिंग (Vertical Drilling) करुन मजुरांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
मजुरांच्या सुटकेसाठी व्हर्टिकल खोदकाम सुरू असून त्यासाठी कोल इंडिया लिमिटेड (Coal India Limited) नागपूरची चमू सिल्क्यरा येथे दाखल झाली आहे. व्हर्टिकल ड्रीलिंगनंतर मजुरांना वरून बाहेर काढण्याच्या कॅप्सूलचे काम केले जाणार आहे. यात चार तंत्रज्ञांचा समावेश आहे. गेल्या दहा दिवसापासून सुरू असलेल्या रेस्क्यू चमूला त्यामुळे थांबून थांबून अंदाज घेत काम करावे लागत आहे.
अवकाळी पावसामुळे देखील या बचावकार्यात अडथळे येत आहेत. देशातील अन्य भागांतून पाठविलेली यंत्रसामग्री रस्ते मार्गाने सिल्क्यरा येथे पोहचण्यास पावसामुळे प्रचंड विलंब होत आहे. आडव्या मार्गाने पाइप टाकण्यात अडथळे निर्माण होत आहेत. म्हणून उभ्या मार्गाने डोंगरावरून व्हर्टिकल ड्रिलिंग सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे मजुरांना बाहेर येण्यासाठी आणखी काही दिवस लागतील असे म्हटले जात आहे. दरम्यान, मजुरांची प्रकृती ठीक असून त्यांना वेळोवेळी जेवण इतर वस्तू पुरविल्या जात आहेत.