Wednesday, September 17, 2025

भीषण आगीत २ महिलांसह ९ जणांचा होरपळून मृत्यू

भीषण आगीत २ महिलांसह ९ जणांचा होरपळून मृत्यू

हैदराबाद : दिवाळीच्या (Diwali) दिवशीच हैदराबादमध्ये (Hyderabad) एका निवासी इमारतीखाली असलेल्या गोडाऊनला लागलेल्या भीषण आगीत २ महिलांसह ९ जणांचा होरपळून मृत्यू झाला. आग इतकी भीषण होती की, काही वेळातच आग चौथ्या मजल्यापर्यंत पोहोचली.

सेंट्रल झोनचे डीसीपी व्यंकटेश्वर राव यांनी घटनेसंदर्भात माहिती देताना सांगितले की, हैदराबाद येथील बाजारघाट, नामपल्ली येथील एका अपार्टमेंट कॉम्प्लेक्समध्ये असलेल्या गोदामाला लागलेल्या आगीत ९ जणांचा होरपळून मृत्यू झाला. त्यात २ महिलांचा समावेश आहे. तर १६ जण किरकोळ जखमी झाले आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चार मजली अपार्टमेंटच्या तळमजल्यावर असलेल्या गॅरेजमध्ये ही आग लागली. आग त्वरीत दुसर्‍या खोलीत पसरली जिथे रासायनिक आणि डिझेल ड्रम साठवले गेले होते आणि तळघरासह संपूर्ण अपार्टमेंट आगीने व्यापले. या आगीत तळघर आणि अपार्टमेंटसमोर उभी असलेली अनेक वाहने जळून खाक झाली.

तेलंगणाचे मुख्यमंत्री केसी राव यांनी नामपल्ली आगीत झालेल्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त केला आहे. मुख्यमंत्र्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने सर्व उपाययोजना करण्याचे आदेश दिले आहेत.

डीजी (अग्निशमन सेवा) नागी रेड्डी यांनी सांगितले की, "इमारतीमध्ये केमिकल्सचा बेकायदेशीररीत्या साठा करण्यात आला असावा. इमारतीच्या स्टिल्ट एरियामध्ये केमिकल्सचा साठा करण्यात आला होता आणि या केमिकल्समुळे आग लागली. एकूण २१ जणांना बाहेर काढण्यात आले, त्यापैकी ९ जणांचा मृत्यू झाला आहे, तर अन्य सर्व लोकांना अपार्टमेंटमधून बाहेर काढण्यात आले आहे."

पोलिसांकडून घटनेची कसून चौकशी सुरू असून नेमकी आग कशी लागली याचा पोलिसांकडून शोध घेतला जात आहे.

पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, सर्वात आधी आगीची सुरुवात कार रिपेयरिंग करत असताना स्पार्क झाल्याने झाली. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून याप्रकरणी चौकशी सुरू आहे.

Comments
Add Comment