हात जोडून, डोळे मिटून, ध्यान लावून मनातल्या मनात उच्चारले तरी तुमच्यासमोर साक्षात स्वामींची मूर्तीच प्रकट झाली आहे, असा भक्तांना भास होतो व ती स्वामींची तेजस्वी मूर्ती डोळ्यांपुढे येताच भक्ताला खात्री वाटते की, स्वामी त्याची जी काय इच्छा आहे ती लवकरच योग्य वेळी पूर्ण करतील. तसेच मनात जी काही संकटांची भीती असेल ती अगदी लांब पळून गेलेली दिसेल. विद्यार्थ्याला त्यांच्या आशीर्वादाने भरपूर अभ्यास करून सुद्धा मनातली जी परीक्षेची भीती होती, ती समूळ नष्ट झालेली दिसते व तो आनंदी मनाने, उत्साहाने पेपर देऊन येतो व आईला मिठी मारून आनंदाने सांगतो, “आई माझा पेपर छानच गं गेला व मी पैकीच्या पैकी मार्क मिळविणार” व तो त्या विश्वासाच्या जोरावर ती परीक्षाही उत्तम देतो व चांगल्या मार्काने पासही होतो. तसेच अनेक आजारी पेशंटही औषधे व्यवस्थित घेऊनही गुण न आल्यामुळे स्वामींकडे साकडे घालतात, नाक घासतात, म्हणतात, “स्वामी माझे काय चुकले असेल, तर कृपा करून माफ करा. पण या सर्व क्लेषातून लवकर बरे करा” व खरोखरच काही दिवसांत औषधपाणी, व्यायाम, चांगले जेवण, निर्व्यसनीपणा व स्वामींच्या उदीरूपी कृपाप्रसादाने लवकरच तो बरा होतो व स्वामींचा नवस फेडायला व स्वामींचे आशीर्वाद घ्यावयास पुन्हा पुन्हा येतो व ताजातवाना होऊन मगच जातो.
महाराष्ट्रात अक्कलकोटच्या स्वामी समर्थांच्या देवळांसारखीच अनेक ठिकाणी देवळे, मठ व मंदिरे छोट्या-मोठ्या भक्तांनी, उद्योगपतींनी एकत्र येऊन, वर्गणी काढून बांधली आहेत व त्या सर्व ठिकाणी भरपूर भक्तांची गर्दी उसळलेली दिसते. अक्कलकोटचे स्वामी समर्थ महाराज हे करोडोंनी आर्त, जिज्ञासू, भक्तांचे, रंजल्या-गांजलेल्या, स्त्री-पुरुष, मुले, गरीब, श्रीमंत, लुळे-पांगळे, अनाथ सर्वांचेच एक आश्रयस्थान आहेत. श्री स्वामींचा अवतार ही परमपूज्य ईश्वराचीच एक अवतारी अशी प्रेमळ लीला आहे आणि सदगुरू अक्कलकोट निवासी राजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक श्रीवल्लभ, विजयदत्त, गुरुदेव भक्त स्वामी समर्थाच्या ठाई झालेला दिसतो. परमात्मा, आत्मा, धर्माचे व मोक्षाचा मूल स्वरूपी संगम परमात्म्याच्या आनंदी रूपाने स्वामी आहेत याची आपल्याला प्रचिती येत राहते. या भक्तीतूनच आयुष्य हळूहळू सर्व सेवाभावाकडे वळू लागते. निर्व्यसनीपणाकडे झुकू लागते. प्रेमळता, बंधुभाव, सहचर्य, दानधर्म, समानता याकडे जास्त कल होऊ लागतो व जास्तीत जास्त सद्गुणी बनण्याचा प्रयत्न करतो. हसून खेळून सर्वांना मदत करून बंधुभावाने राहू लागतो. श्री स्वामींप्रमाणेच परमश्रेष्ट दत्तावतार व श्रीकृष्णाच्या आशीर्वादाप्रमाणे “अनन्यभक्तिभावाने जो कोणी सेवा करील त्याचा सर्व प्रकारचा योगक्षेम मी चालवीनच. तेव्हा वत्सा, भक्ता आता तू कळीकाळाला, संकटाला, जीवनातल्या बिकट प्रसंगांना बिलकुल भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी सर्वशक्तीमान ईश्वररूपच घेऊन उभा आहे” असे सांगून सर्व भक्तांना अभय देणारे थोर महान संत, विभुती, ईश्वरी अवतारच जो नुकताच शेकडो वर्षापूर्वी होऊन गेला तो अजूनही तुमच्याबरोबर आहे. “हम गया नही, अभी भी तुम्हारे सामने जिंदा हैं” असे ठामपणे सांगणारे अवतारी संत म्हणजेच श्री स्वामी समर्थ महाराज.
श्री स्वामी समर्थ म्हणजेच साक्षात ब्रह्मा, विष्णू, महेश ज्यांच्यात समावले आहेत, त्या गुरुदत्ताचाच पुढचा अवतार म्हणजेच नृसिंह सरस्वती महाराज व त्यांच्याही पुढचा अवतार म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराज. सूर्याची किरणे जशी मोजता येत नाहीत. चंद्राची शीतलता जशी वर्णन करू शकत नाही, सागराच्या लाटांची जशी खोली व लांबी मोजता येत नाही. त्याचप्रमाणेच या अजात अक्कलकोट निवासी स्वामी समर्थांची लीला व अगाध महिमा हजार वेळा सांगितला, लिहिला तरी मन भरूनच येत नाही.
विश्व उद्धाराचे कार्य करणारे श्री स्वामी समर्थ हे एक तेजस्वी पैलूचे महान संतच होते. जगत्गुरू श्री स्वामी समर्थ हे जात-पात, उच्च-नीच, धर्म-अधर्म, गरीब-श्रीमंत, स्त्री-पुरुष यांच्या पलीकडे जाऊन कार्य करणारे महान संतच होते. त्यांचे अस्तित्व आजही लोकांना जळी, स्थळी, काष्टी, पाषाणी त्याचे अस्तित्व जाणवत असते. तरीही या अशा तेजस्वी स्वामींचा परिचय आधुनिक जनांना व्हावयास हवाच. तसेच हल्लीच्या इंटरनेटच्या व्यसनांच्या अति माहितींच्या मोहजालात फसलेल्या तरुण, वृद्धांना अशा संत महात्म्यांची माहिती व्हावी म्हणून हा प्रपंच.
स्वामींचा संदेश : दिवाळी ध्वनिप्रदूषणमुक्त, फटाकेमुक्त आनंदाने गरिबांना फराळ वाटून साजरी करा. लक्ष्मीपूजन करा, मातृ-पितृ-बंधू-भगिनी पूजन करा. भाऊबीज आनंदाने साजरी करा.
निःशंक हो, निर्भय हो, मना रे
प्रचंड स्वामीबळ पाठीशी रे
अतर्क्य अवधूत हे स्मरण गामी
अशक्यही शक्य करतील स्वामी ||१||
जिथे स्वामी पाय तिथे न्यून काय
स्वये भक्त प्रारब्ध घडवी ही माय
आज्ञेविणा काळ ना नेई त्याला
परलोकही ना भीती तयाला ||२||
उगाची भितोसी भय पळू दे
जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे
जगी जन्ममृत्यू असे खेळ ज्यांचा
नको घाबरू तू असे बाळ त्यांचा ||३||
खरा होई जागा तू श्रद्धेसहित
कसा होशील त्याविण तू स्वामीभक्त
कितीदा दिला बोल त्यांनीच हात
नको डगमगू स्वामी देतील साथ ||४||
विभूती नमन नाम ध्यानादी तीर्थ
स्वामीच या पंचप्राणाभूतात
हे तीर्थ घेई, आठवी रे प्रचिती
न सोडती तया, जया स्वामी घेती हाती ||५||
vilaskhanolkardo@gmail.com
मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ४०व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने लखनऊ सुपर जायंट्सवर ८ विकेट्सनी विजय…
मुंबई : महाराष्ट्रात पहिली ते पाचवीपर्यंत इंग्रजीबरोबर हिंदी भाषाही सक्तीची करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावर टीकेची…
मुंबई: जम्मू-काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम येथे आज, मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सुमारे २७ जणांचा मृत्यू…
मुंबई : ग्रामीण असो किंवा शहरी भाग, लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागू नये. उन्हाळा…
इंडिया कॉलिंग : डॉ. सुकृत खांडेकर महाराष्ट्रात यापुढे पहिलीपासून हिंदी भाषा शिकवणे अनिवार्य होणार आहे.…
श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी पर्यटक आणि स्थानिकांवर अंदाधुंद गोळीबार केला. या गोळीबारात २७ व्यक्तींचा…