मुंबई: राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी(state government employee) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिवाळीच्या तोंडावर आनंदाची बातमी आणली आहे. राज्य सरकारकडून कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात दोन टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतला जाणार आहे.
याआधी काही महिन्यांपूर्वी सरकारने या महागाई भत्त्यात ४ टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर पुन्हा २ टक्के वाढ करण्याचा निर्णय सरकार घेणार आहे. यामुळे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांची दिवाळी जोरात असल्याचे दिसत आहे.
बुधवारी होणाऱ्या कॅबिनेटच्या बैठकीत याबाबत निर्णय होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. याआधी महागाई भत्त्यात ४ टक्क्यांची वाढ केल्यानंतर कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता ४२ टक्के इतका झाला होता. आता शिंदे सरकराकडून यात आणखी २ टक्क्यांची वाढ केली जाणार आहे.
याआधी जून महिन्यामध्ये सरकारने महागाई भत्त्यात वाढ केली होती. त्यानुसार ४२ टक्के महागाई भत्ता झाला होता. त्यानंतर आता २ टक्क्यांची वाढ होणार असून हा भत्ता ४४ टक्के होणार आह. बुधवारी राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडणार आहे. यात याबाबतचा निर्णय होण्याची शक्यता आहे.
सरकारकडून वर्षातून दोन वेळा कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ केली जाते. याआधी जूनमध्ये ही वाढ करण्यात आली होती. दरम्यान, केंद्र सरकारकडूनही कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ केली आहे. महागाई भत्त्यात वाढ केल्यानंतर केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांचा भत्ता ४६ टक्के इतका झाला आहे.