नवी दिल्ली: छत्तीसगड(chattisgarh) आणि मिझोरममध्ये(mizoram) आज विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होत आहे. एकीकडे छत्तीसगडमध्ये पहिल्या टप्प्यात २० जागांसाठी मतदान होत आहे तर दुसरीकडे मिझोरमच्या सर्व ४० जागांसाठी आज मतदान पार पडणार आहे. छत्तीसगडच्या या जागांवर आज मतदान होत आहे त्यातील अनेक जागा नक्षलग्रस्त आहेत. पहिल्या टप्प्यात मतदान यशस्वी करण्याची जबाबदारी २५,४२९ निवडणूक कर्मचाऱ्यांच्या खांद्यावर आहे.
छत्तीसगडच्या १० जागांवर मोहला-मानपूर, अंतागढ, भानुप्रतापनगर, कांकेर, केशकाल, कोंडागाव, नारायणपूर, दंतेवाडा, बिजापूर आणि कोंटामध्ये मतदान सकाळी ७ ते दुपारी ३ वाजेपर्यंत असणार आहे. उरलेल्या १० जागा खैरागड, डोंगरगड, राजनांदगाव, डोंगरगाव, खुज्जी, पंडरिया, कवर्धा, बस्तर, जगदलपूर आणि चित्रकोटमध्ये मतदान सकाळी ८ वाजल्यापासून ते संध्याकाळी ५ पर्यंत राहणार आहे. ज्या २० जागांवर मतदान होणार आहे त्यातील १९ जागा काँग्रेसच्या ताब्यात आहेत. पक्षाने या १९ पैकी दोन जागा पोटनिवडणुकीत जिंकल्या होत्या.
४० लाखाहून अधिक मतदार करणार मतदान
पहिल्या टप्प्यात २२३ उमेदवार रिंगणात आहेत. यात २५ महिला आहे. या टप्प्यात राज्यातील ४० लाख ७८ हजार ६८१ मतदार मतदान करतील. यातील १९ लाख ९३ हजार ९३७ पुरूष आणि २० लाख ८४ हजार ६७५ महिला आहेत. याशिवाय ६९ तृतीयपंथी महिलाही आहेत. मतदानासाठी पहिल्या टप्प्यात ५,३०४ मतदान केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत. यात २५ हजाराहून अधिक कर्मचारी असतील.
संवेदनशील भागांमध्ये हेलिकॉप्टरने पाठवले दल
सुकमा, बिजापूर, दंतेवाडा, कांकेर आणि नारायणपूर जिल्ह्यात १५६ मतदान दलांना हेलिकॉप्टरने पाठवण्यात आले. बाकी जिल्ह्यांमध्ये ५१४८ लोकांना बसने पाठवण्यात आले. पोलिसांच्या माहितीनुसार नक्शलग्रस्त भागातील १२ विधानसभा क्षेत्रांमध्ये सीएपीएफच्या ४० हजार जवानांसह एकूण ६० हजार सुरक्षारक्षक तैनात करण्यात आले आहे.