रंगभूमी म्हणजे प्रत्येक रंगकर्मीसाठी जिव्हाळ्याचा विषय. मराठी रंगभूमीला तर अनेक वर्षांचा समृद्ध इतिहास लाभला आहे. विष्णुदास भावे यांनी ५ नोव्हेंबर १८४३ साली ‘सीता स्वयंवर’ हे पहिले मराठी नाटक सादर केले. त्यानंतर शंभर वर्षांनी १९४३ साली वि. दा. सावरकर यांच्या अध्यक्षतेखाली ५ नोव्हेंबर या दिवसाचे महत्त्व जाणून तो ‘मराठी रंगभूमी दिन’ म्हणून घोषित करण्यात आला. आज याच रंगभूमी दिनानिमित्त आपण मुंबईतील काही प्रसिद्ध नाट्यगृहांची सफर करणार आहोत.
श्री शिवाजी मंदिर हे मुंबईतील सर्वांत जुने आणि प्रसिद्ध नाट्यगृह आहे. हे नाट्यगृह ३१ डिसेंबर १९४३ रोजी स्थापन झाले असून श्री छत्रपती शिवाजी स्मारक मंडळ, मुंबईतर्फे चालविले जाते. दादर पश्चिमेला रेल्वे स्थानकापासून फक्त १० मिनिटांच्या अंतरावरील एन. सी. केळकर मार्गावर असलेल्या या नाट्यगृहात अनेक मराठी नाटकांच्या शुभारंभाचे प्रयोग झाले आहेत. श्री शिवाजी नाट्य मंदिर आज दादरमधील ओळखीचे ठळक ठिकाण झाले आहे. आजही शिवाजी मंदिरबाहेर नाटकांच्या जाहिराती दिसल्या की नाटकप्रेमींची पावले थबकतात आणि नाट्यगृहात जाऊन थांबतात.
दादरसारख्या मध्यवर्ती ठिकाणी आणि रेल्वे स्टेशनच्या जवळच असल्याने या नाट्यगृहात प्रेक्षकांची पहिल्यापासूनच गर्दी पाहायला मिळते. काशिनाथ घाणेकर, प्रभाकर पणशीकर, श्रीराम लागू असे अशा अनेक नटांना शिवाजी मंदिरच्या रंगभूमीने मोठे होताना पाहिले आहे. मराठी रंगभूमीवरील अनेक मोठमोठ्या नटांच्या या नाट्यगृहाशी आठवणी जुळलेल्या आहेत. म्हणून आजही अनेक रंगकर्मी वेळ काढून केवळ शिवाजी मंदिरला भेट देण्यासाठी देखील येत असतात.
देशभरातील विविध शहरांमध्ये रवींद्रनाथ टागोर यांच्या नावाने सभागृहांची उभारणी केली जात असताना सुरु झालेले रवींद्र नाट्य मंदिर सुरुवातीला सांस्कृतिक कार्य संचालनाच्या अखत्यारीत होते. काही काळानंतर दादासाहेब फाळके चित्रनगरी यांच्यामार्फत याचे कामकाज पाहिले जाऊ लागले. २००३ मध्ये नूतन वास्तूचे उद्घाटन करण्यात आले. यातील मुख्य नाटयगृहात ९२३, तर मिनी थिएटरमध्ये १९९ आसनक्षमता आहे.
रवींद्र नाट्यमंदिर आणि पु. ल. देशपांडे कला अकादमी येथील जागा प्रशस्त आहे. त्यामुळे अनेक रंगकर्मी येथे असणार्या पुलंच्या पुतळ्याखाली बसून तालमी करतात. तर रवींद्र नाट्यमंदिरच्या इमारतीतही भाड्याने तालमीसाठी जागा दिली जाते. जवळच सिद्धीविनायकाचे मंदिरदेखील आहे. त्यामुळे राज्यभरातून येणारे रंगकर्मी हमखास सिद्धीविनायकाचे दर्शन घेऊन प्रयोगाला सुरुवात करतात. केवळ रंगकर्मीच नव्हे तर इथल्या प्रेक्षकाच्यांही मनात रवींद्र नाट्यमंदिरने जागा मिळवली आहे. या ठिकाणी असलेल्या उत्सव हॉटेलमधला वडा खाण्यासाठी रंगकर्मी खास नाटकाची तिकीटे बुक करतात. नाटकाच्या मधल्या वेळेत इथला बटाटावडा खाणं हे प्रेक्षकांसाठी जणू समीकरणच झालं आहे. सध्या रवींद्र नाट्यमंदिर आणि परिसर नूतनीकरणाच्या कामासाठी ते दसऱ्यापासून सुमारे तीन महिने बंद राहणार आहे.
दादर आणि माटुंगा यांच्या मधोमध असलेलं यशवंत नाट्यमंदिर हे रंगकर्मींसाठी आधुनिक सोयीसुविधांनी सुसज्ज असं नाट्यगृह आहे. इथला संपूर्ण कर्मचारी वर्ग जुना आणि अनुभवी आहे. अनेक महाविद्यालयीन एकांकिका स्पर्धांच्या आयोजनासाठी हक्काचं असं हे नाट्यगृह आहे. कोरोना काळात या नाट्यगृहाचे नुतनीकरण करण्यात आले. ५ ऑगस्टला ‘व्हॅक्युम क्लीनर’ या नाटकाच्या प्रयोगाने पुन्हा एकदा हे नाट्यगृह प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाले. तर दुसरीकडे प्रेक्षकांच्याही तिकीट खिडकीवर रांगा लागायला सुरुवात झाली आहे.
प्रभादेवी स्थानकापासून पूर्वेला साधारण दहा मिनिटांच्या अंतरावर असणारं दामोदर नाट्यगृह हे लोककलावंतांसाठी हक्काचं असं नाट्यगृह आहे. १९२२ साली निर्माण झालेलं हे नाट्यगृह जवळपास शंभर वर्षे कार्यरत आहे. लोककला सादरीकरणासाठी वाजवी दरातील हे नाट्यगृह असल्याने अनेक कोकणातील मंडळांची स्नेहसंमेलने, शाळांची स्नेहसंमेलने, शक्ति तुरा सामने, हौशी कलावंतांची नाटके, राज्य नाट्य स्पर्धा, एकांकिका स्पर्धा, वाद्यवृंद, नमन, तमाशा या ठिकाणी हमखास होत असतात.
मात्र, १ नोव्हेंबरला हे नाट्यगृह काही वर्षांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. नाट्यगृहाचे नुतनीकरण करण्यात येणार असून ते साधारण तीन ते चार वर्षांनी पुन्हा रंगकर्मींसाठी उपलब्ध होईल. आपल्या जवळच्या जागेपासून चार वर्षे दुरावा सहन करावा लागणार असल्याने अनेक रंगकर्मी भावूक झालेले या निमित्ताने पाहायला मिळाले.
मार्च २००० मध्ये या नाट्यगृहाचे उद्घाटन बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले होते. २२ वर्षांपासून हे नाट्यगृह अविरतपणे रसिकांचे मनोरंजन करत आहे. बोरीवली आणि आसपासच्या भागांतील सांस्कृतिक चळवळीत मोलाचे योगदान देत आहे. आज हे नाटयगृह उपनगरांतील रंगकर्मींचे हक्काचे स्थान बनले आहे. त्यामुळेच उपनगरामध्ये जास्तीत जास्त नाटके या नाट्यगृहात होतात. मराठी नाटकांच्या जोडीला इथे गुजराती नाटकेही होतात. २०० आसनक्षमता असलेले इथले लघुनाट्यगृह प्रायोगिक नाटकांसाठी खूप उपयुक्त आहे.
या नाट्यगृहाची जमेची बाजू म्हणजे तत्कालीन नाट्य संमेलनाध्यक्ष गंगाराम गवाणकर आणि प्रदीप कबरे यांच्या प्रयत्नांमुळे इथल्या लघुनाट्यगृहांमध्ये प्रायोगिक नाटकांसाठी भाड्यामध्ये ५० टक्के सवलत देण्यात येत आहे. या नाट्यगृहामध्ये चार रिहर्सल हॅाल्स आहेत. यामुळे उपनगरातील रंगकर्मींच्या नाटकाची तालीम करण्याचा प्रश्न उद्भवत नाही. इथले मेकअप रुम्स, खुर्च्या, वातानुकूलित यंत्रणा, व्हिआयपी रुम्स, टॅायलेट्स चांगल्या स्थितीत असून स्वच्छतेला प्राधान्य दिले जाते. त्यामुळे इतर नाट्यगृहांच्या तुलनेत प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृहात फार समस्यांना सामोरं जावं लागत नाही, असं मत रंगकर्मी नेहमीच व्यक्त करताना दिसतात.
आज अनेक रंगकर्मींच्या खर्चाचे गणित जुळत नसल्याने मराठी नाटकांचे प्रयोग काही प्रमाणात शिथिल झाले आहेत. केवळ आठवड्याचे शेवटचे दोन दिवस नाटकांचे प्रयोग लागतात, पण प्रत्येक प्रयोगाला म्हणावी तितकी गर्दी जमत नाही. नाटक हा एक जीवंत अनुभव आहे आणि प्रत्येकाने आपल्या व्यग्र वेळापत्रकातून एकदा तरी तो घ्यायलाच हवा. त्यामुळे आजच्या रंगभूमी दिनानिमित्त नाटक पाहण्याचा संकल्प करुन मराठी रंगभूमीचा अनेक वर्षांचा समृद्ध वारसा जपूयात, तरच रंगभूमीला पुन्हा एकदा सोन्याचे दिवस येतील. सर्व रंगकर्मी व रसिक प्रेक्षकांना ‘दैनिक प्रहार’तर्फे मराठी रंगभूमी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ४०व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने लखनऊ सुपर जायंट्सवर ८ विकेट्सनी विजय…
मुंबई : महाराष्ट्रात पहिली ते पाचवीपर्यंत इंग्रजीबरोबर हिंदी भाषाही सक्तीची करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावर टीकेची…
मुंबई: जम्मू-काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम येथे आज, मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सुमारे २७ जणांचा मृत्यू…
मुंबई : ग्रामीण असो किंवा शहरी भाग, लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागू नये. उन्हाळा…
इंडिया कॉलिंग : डॉ. सुकृत खांडेकर महाराष्ट्रात यापुढे पहिलीपासून हिंदी भाषा शिकवणे अनिवार्य होणार आहे.…
श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी पर्यटक आणि स्थानिकांवर अंदाधुंद गोळीबार केला. या गोळीबारात २७ व्यक्तींचा…